काल झालेल्या आषाढी एकादशी निमित्त, आज ही वाचू या काही विठ्ठल रचना…
— संपादक
१. विठू माऊली…
डोळे पाहती वाटुली
कधी भेटेल माऊली
पंढरीच्या वाटेवरी
दिंडी चालली चालली
नाद टाळ मृदंगाचा
घुमे नाद चिपळ्यांचा
सर्वामुखी जयघोष
फक्त विठ्ठल नामाचा
धरी आज जीव ठेका
हरे सारीच हो चिंता
नाचे झेंडा नि पताका
तोच कर्ता करविता
सारी भजनात दंग
गाती मुखाने अभंग
साधाभोळा वारकरी
चाले दिंडीच्या रे संग
होऊ दे रे आबादानी
अरे! विठ्ठला विठ्ठला
अन् भेट तुझी माझी
आषाढीला कार्तिकीला
— रचना : अरुणा गर्जे. नांदेड
२. अभंग : विठ्ठल
देव माझा आहे/
विठ्ठल सावळा/
गळा घाली माळा/
तुळशीच्या //
पायी वारी दिंडी/
निघाली पंढरी/
भक्त वारकरी/
भजनात //
हरी मुखे नाम/
चिपळी, मृदुंग/
चाले भक्ता संग/
पायी पायी //
बोलावे विठ्ठल/
भजनात दंग/
आनंदाचे रंग/
रिंगणात //
वाजवी टाळी/
मुखे नाम हरी/
चाललेत पंढरी/
दर्शनाला //
— रचना : सौ भारती वाघमारे. मंचर, जिल्हा पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800