Wednesday, July 2, 2025
Homeयशकथाविदूषक संशोधक

विदूषक संशोधक

विदूषक‘ हा संशोधनाचा विषय असू शकतो हे खरे वाटेल का तुम्हाला ? पण हे खरं आहे ! मोनिका ठक्कर लहानपणापासून विदूषकाची फॅन होती. लहानपणी मोठा भाऊ व त्याचे मित्र तिला सर्कशीला घेऊन जायचे, तेव्हा विदूषकाची तिला फार गंमत वाटायची. विदूषक हसला की ती हसायची आणि त्याला कोणी त्रास दिला की ती रडायची. विदूषकाला चोप दिल्यावर लोक हसतात का ? याचे तिला कोडे पडायचे.

पूर्वी गुजराती परिवारात मुली एवढ्या शिकत नव्हत्या. लवकरच लग्न होत. पण मोनिकाने उच्च शिक्षण संपादन करून ठक्कर परिवारातील सर्वांचे कौतुक झेलले. आता मोनिका मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे. लोककला आणि लोकसाहित्य तसेच अभिनय हे तिचे शिकविण्याचे विषय आहेत. लोककलेचा अभ्यास करताना सर्कशीत पाहिलेला विदूषक, लहानपणी खेळण्यात न मिळालेला आवडीचा जोकर यासारख्या घटनांमधून तिला प्रेरणा मिळाली आणि विदूषकाची संकल्पना ती विस्तृतपणे समजून घेऊ लागली.

लोककलेच्या प्रांगणात विदूषक विविध कार्यक्रमात असतो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून संस्कृत नाटक, लोककला यातील विदूषक हा अनेक कलांनी युक्त असा बुद्धीमान कलाकार असतो. त्याला संवाद, नृत्य, गायन याचे ज्ञान असते. मग सादरीकरणात त्याला केंद्रस्थानी का समजू नये ? उलट विदूषकाची भूमिका करणारी व्यक्ती नेहमी डावलली जाते.

मोनिकाने लोककलेच्या विविध सादरीकरणातील विदूषक या संकल्पनेचा, पात्राचा अभ्यास केला. तो सोंगाड्या असतो, तो मावशी असतो. आज विदूषक रंगभूमीशिवाय इतरही काही ठिकाणी असल्याचे तिला आढळून आले. दिल्लीचे अश्वत भट हे दीर्घकालीन व्याधीग्रस्त रुग्णांसाठी विदुषकाची भूमिका साकारत हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना हसवतात, हे एक प्रकारचे समाजकार्यच आहे. मोनिकाने विदूषक या विषयावर आपला प्रबंध डॉ. प्रकाश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केल्यानंतर तिला पीएच. डी. पदवी मिळाली. आपला प्रबंध तिने पुस्तक स्वरूपातही वाचकांसमोर सादर केला. ‘विदूषक : संकल्पना स्वरूप’ हे मोनिका ठक्कर लिखित पुस्तक प्रकाशित झाले आहे.

लोकसाहित्याच्या महामेरूतून अनेक ज्ञानसरिता उगम पावतात हे तिच्या लक्षात आले. कीर्तनातून नाटकाचा जन्म झाला. आजही नाटकात लोककलांच्या छटा डोकावतात. नाट्यशात्राचा अभ्यास करावा असे तिला प्रकर्षाने वाटले. नाट्यशास्त्राची ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट्स’ ही पदवी तिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून घेतली. ‘मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ ही पदवी देखील संपादन केली. नाट्यकलेचे विस्तृत क्षितिज तिच्या दृष्टीक्षेपात येऊ लागले.

मराठी नाटक आणि मराठी लोककला या विषयावर तिने ‘इंडियन सोसायटी फॉर थिएटर रिसर्च’ अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर केले. लोकसाहित्य आणि नाटक या साहित्यप्रकाराचा अभ्यास केल्यावर तिने ‘लोकरंग नाट्यरंग’ हे पुस्तक लिहिले. यात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील लोककला प्रकारांवर लेख आहेतच आणि नाटकाचे विविध घटक असतात याचीही माहिती दिली आहे. याशिवाय एक महत्त्वाचे मत तिने नोंदवले आहे, ते म्हणजे ”नाट्यशास्त्र शिकण्यासाठी आज गुरुकुल शिक्षण पद्धतीची गरज आहे.”

नाटकात अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा बाळगणारे अनेक असतात. पण त्यासाठी लागणारे शिक्षण काय असते याची त्यांना कल्पना नसते. मोनिकाने ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रबंधन एवं फिल्म प्रॉडक्शन’ यातही पदवी संपादन केली. कथक नृत्य पारंगत तर ती होतीच, पुढे नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये अनेक भूमिका ती गाजवत गेली. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन देखील तिच्याकडून झाले. हिंदी, मराठी, गुजराती याशिवाय भोजपुरी आणि राजस्थानी इत्यादी बोलीदेखील तिने अवगत गेल्या, त्यामुळे बहुभाषिक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. मराठी गुजराती नाटकात तिने अभिनेत्री म्हणून कारकीर्द केली. नाटकांचे दिग्दर्शनही केले.

मोनिकाच्या अभ्यासू वृत्तीमुळे अनेक मान्यवरांच्या ती परिचयाची झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे संमेलने आयोजित करताना तिचे अभ्यासपूर्ण निवेदनही श्रोत्यांच्या स्मरणात राहते. या गुणांमुळे तिला एक उत्तम संधी मिळाली.

ती कहाणी अशी की, पन्नास-साठ वर्षांपूर्वी श्री. रामदास प्रभुगावकर यांनी संशोधन करून गोव्यातील लोककलेच्या अनेक प्रकारांची माहिती जमवून ठेवली होती, ती त्यांनी प्रकाशकांना दिली. त्यावेळी लोकसाहित्य विशारद व विदुषी दुर्गा भागवत या त्या प्रकाशन संस्थेच्या संपादन मंडळावर होत्या. या अनुषंगाने श्री. प्रभुगावकर यांनी गोळा केलेल्या संपूर्ण माहितीचे दस्तावेज दुर्गाबाईंकडे तपासण्याकरिता सुपूर्त करण्यात आले. तेव्हा यात अधिक अभ्यासाची गरज आहे म्हणून दुर्गाबाईंनी ते दस्तावेज परत केले. या सर्व माहितीचे योग्य प्रकारे संकलन करून ती ग्रंथरूपात साकार करण्यासाठी या विषयाचा अभ्यास असणारी आणि लेखनाचा अनुभव असणारी कोणीतरी मेहनती व्यक्ती त्यांना हवी होती. दुर्गाबाईंच्या हयातीत ते पुस्तक होण्याचा योग आला नाही.

दरम्यान अगदी अलीकडेच संस्कार भारतीच्या वीणा सामंत यांनी तिचे नाव या प्रोजेक्टसाठी सुचवले. मोनिकाने रामदास प्रभुगावकर यांच्या पहिल्याच भेटीत हे शिवधनुष्य उचलून दाखवेन असा विश्वास त्यांना दिला. त्याप्रमाणे या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण संपादन करून तिने त्यांचे पुस्तक तयार करून दिले. या पुस्तकाचे लेखक रामदास प्रभुगावकर आणि संपादक म्हणून डॉ. मोनिका ठक्कर यांचे नाव आहे. ‘धालो ते धूलपद, गोमंतकीय लोकसंपदा’ असे या पुस्तकाचे नाव. हे पुस्तक पूर्ण केल्याबद्दल श्री प्रभुगावकर यांच्या पत्नीने मोनिकाची भरजरी पैठणी देऊन ओटी भरली. ”पन्नास वर्षे पडून राहिलेली ही सरस्वती तुझ्यामुळे स्थानापन्न झाली.” असे शब्द ऐकून मोनिकाला धन्य वाटले.

कमी वयातच नाटकाचा एक प्रदीर्घ अनुभव मोनिकाच्या गाठीशी होता. अनेक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन करणे, नाट्य महोत्सवात सहभागी होणे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशाच्या नाटक या ज्ञान मंडळाचे समन्वयक म्हणून दिग्गज व्यक्तींबरोबर काम पाहणे आणि अभ्यासाची कास धरल्याने मोनिकाने स्वतःला संशोधक म्हणून उत्तम घडविले. ‘Folk Theatre Forms of Maharashtra’ हे तिचे पुस्तक परदेशातही गाजले. लायब्ररी ऑफ काँग्रेसने या पुस्तकाच्या अनेक प्रती विकत घेऊन अमेरिकेतील सर्व वाचनालयांना ते पुरविले आहे. तेथील अभ्यासकांसाठी हे उत्तम संचित ठरले आहे. डॉ. मोनिका ठक्कर हिचे नाव लोककला आणि लोकसाहित्याची अभ्यासक म्हणून सातासमुद्रापार गेले आहे.

मेघना साने

– लेखन : मेघना साने.
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४