विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबरच सामाजिक भान ठेवले पाहिजे तसेच तळागाळातील लोकांसाठी जसे जमेल तसे कार्य करीत राहिले, असे
प्रतिपादन सुप्रसिद्ध समाजसेविका, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या श्रीमती मेधा पाटकर यांनी नुकतेच अमरावती येथे काढले.
प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर उपेक्षितांच्या जीवनातील तसेच आदिवासी लोकांच्या जीवनातील अंधकार थोड्याफार प्रमाणात तरी आपण कमी करू शकणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवला पाहिजे. अमरावतीची मिशन आयएएस ही संस्था मुलांना बालपणापासून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करते हा उपक्रम चांगला असून आदिवासी भागात आम्ही मिशन आयएएस हा उपक्रम राबविणार आहोत असेही श्रीमती पाटकर यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह फासेपारधी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वार्षिक मेळाव्यासाठी श्रीमती पाटकर अमरावतीला आल्या असतांना त्यांनी डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाच्या कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी अमरावतीचे सुप्रसिद्ध धन्वंतरी व नाक कान घसा तज्ञ तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.बबन बेलसरे यांनी श्रीमती मेधाताई पाटकर यांचे स्वागत केले. तर प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी त्यांना “शेतकऱ्याची मुले झालीत कलेक्टर” हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच मिशन आयएएसच्या सर्व पुस्तकांचा एक संच त्यांच्या आदिवासी भागातील सर्व शाळांना पाठवण्याचा संकल्प देखील याप्रसंगी जाहीर केला.
याप्रसंगी दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या चि. अर्णव हेमंत चांडक विद्यार्थ्याने एक सुंदर भाषण देऊन सर्वांचे लक्ष वेधले. सुमारे दोन तास झालेल्या कार्यक्रमात मेधाताईंनी मिशन आयएएस विद्यार्थ्यांशी सरदार सरोवर, नर्मदा बचाव आंदोलन व दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
सध्याच्या सामाजिक जीवनामध्ये सामाजिक कार्यकर्त्या वर जो अन्याय होत आहे, जी गळचेपी होत आहे त्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यक्तिस्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश असल्यामुळे या देशात लोकशाहीचे तंतोतंत पालन झाले पाहिजे अशीही अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. मी जे काम करीत आहे त्या कामांमध्ये सर्वांनी आपापल्या परीने सहभाग नोंदवावा असेही आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
या प्रसंगी एक उदाहरण सांगताना त्या म्हणाल्या, आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासींची सीताफळे पाच रुपये किलो प्रमाणे व्यापारी विकत घेत .पण तीच सीताफळे आमच्या कार्यकर्त्यांनी पुण्याला 25 रुपये किलोप्रमाणे विकली, आणि आदिवासींना प्रचंड प्रमाणामध्ये फायदा झाला. हे काम लहान असले तरी अशा प्रकारची लहान कामे देखील आदिवासींच्या जीवनामध्ये प्रकाश टाकू शकतात. अशा प्रकारचे प्रयत्न सर्वदूर आणि सर्व स्तरातून झाले पाहिजेत,अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिशन आयएएसच्या संचालिका प्रा. विद्या काठोळे यांनी भूषविले. श्रीमती मेधाताई पाटकर यांचे याप्रसंगी वेगवेगळ्या संस्थांमार्फत स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे मेधाताई पाटकर यांनी खुर्ची सोडून विद्यार्थ्यांच्या वर्तुळात खाली बसून त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली व त्यांचे समाधान केले. या कार्यक्रमांमध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या श्रीमती लतिका राजपूत या उपस्थित होत्या.
आपल्या धावत्या भेटीत त्यांनी मिशन आय ए एस साठी वेळ दिल्याबद्दल मिशन आयएएसतर्फे सौ विद्या काठोळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

– लेखन : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800