१ मार्च १९८६ ते २१ ऑक्टोबर १९९१ या कालावधीत मी मुंबई दूरदर्शन केंद्रात आधी ५ वर्षे सहायक निर्माता आणि नंतर काही काळ निर्माता होतो. त्यावेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. त्या काळात खूप जणांशी संपर्क आला. सर्वांशीच सूर जुळले असं नाही. काही संबंध हे तात्कालिक राहिले. काही मात्र आजतागायत निरपेक्षपणे टिकून आहेत. कामानिमित्त निर्माण झालेल्या संबंधांचे नकळत मैत्रीत रूपांतर झाले आहे.
दूरदर्शनमुळे भेटलेल्या मित्रांपैकी एक प्रमुख म्हणजे संकलक विनय वैराळे. गंमत म्हणजे आम्ही दोघंही मूळ अकोला येथील आहोत. पण अकोल्यात असताना आमची कधी ओळख झाली नाही. एक तर घरं दूर होती, शाळा वेगळ्या होत्या आणि तिथे कधी काही कारणाने एकत्रही आलो नाही.
केवळ नावातच विनय नसलेला तर प्रत्यक्षातही अतिशय विनयशील असलेला विनय वैराळे दूरदर्शन केंद्रात १० दिवसांच्या करारावर संकलक म्हणुन येऊ लागला. विविध कार्यक्रमांच्या संकलनाच्या निमित्ताने आम्ही एकत्र संकलन कक्षात बसू लागलो. कराराचे दिवस संपलेले असले, कामाची वेळ संपलेली असली तरी तो कधी घड्याळात पहात नसे. त्यामुळं सर्व सहकाऱ्यांना तो प्रिय झाला.
सुरुवातीपासूनच अबोल असलेल्या विनयशी एकदा बोलताना मला कळालं की, तो अकोल्याचा आहे म्हणून. मग तर काय, मला त्याच्या विषयी अधिकच आपुलकी वाटू लागली. दूररदर्शन मध्ये संकलक म्हणून त्याची नोकरी कायम स्वरुपी नव्हती. त्यामुळे तो चांगल्या संधीच्या शोधात होताच. लवकरच त्याला “महाभारत” या मालिकेच्या संकलनाचं काम मिळालं आणि अल्पावधीतच अकोल्याचा विनय देशभरातील घराघरात पोहोचला.
अकोल्यातील पुरोगामी, सुशिक्षित व मध्यमवर्गीय कुटुंबात १९६४ साली विनयचा जन्म झाला. त्याचे वडील गो. रा. वैराळे स्थानिक शिवशक्ती व नंतर देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक होते. विनयचे चुलत चुलते माजी मंत्री, खासदार मधुसूदन वैराळे यांनी देशोन्नती सुरू केले होते. देशोन्नतीचा शुभारंभ तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला होता.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0013-225x300.jpg)
विनयचं शालेय शिक्षण आधी होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कुल व नंतर इंग्लिश स्कुल मधून तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आर एल टी सायन्स कॉलेजमधून झालं. सुरुवातीपासूनच विनयला नाटक, चित्रपटांची अतोनात आवड होती. त्याचे वडील अकोल्यात कामगार कल्याण नाट्य स्पर्धा व राज्य नाट्य स्पर्धांचे अनेक वेळा परीक्षक होते. त्यांचे नाट्य, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रांत भरघोस योगदान होते.ते नाट्य स्पर्धांचे परीक्षक असतांना अनेक नाटकं बघण्याची संधी विनयला मिळाली.
दैनिक शिवशक्तीत वडिलांचा प्रल्हाद शिंदे म्हणून चपराशी होता. तो अकोल्यातील सर्व सिनेमा थिएटरला जाऊन पेपरसाठी जाहिराती आणत असे. त्यामुळे त्याचे सर्व थिएटरच्या मॅनेजर सोबत चांगले संबंध होते. विनयने त्याला पटवून ठेवले होते. त्यामुळे त्याला प्रत्येक नवीन सिनेमा फुकट पाहायला मिळायचा. गंमत म्हणजे हा शिंदे पेपरसाठी जाहिराती गोळा करायचा म्हणून स्वतःला “कलेक्टर” म्हणून घ्यायचा. एकदा काय झालं, अमिताभ बच्चनचा डॉन सिनेमा रिगल थिएटरमध्ये लागला होता. पहिल्या शो पासूनच तुफान गर्दी होती. विनयसह वर्गातील दोन मुलं आणि दोन मुली अशा पाच जणांनी डॉन पहायला जायचं ठरवलं. तिकिटं आणण्याची जबाबदारी कलेक्टरनं आनंदांने स्विकारली. तेव्हा बाल्कनीचं तिकीट प्रत्येकी पाच रुपये होतं. सिनेमा सुरू व्हायची वेळ होत आली तरी, त्या दोन मुली आल्याच नाहीत. ती दोन तिकीटं काय करायची असा प्रश्न निर्माण झाला. त्यांचा अवतार पाहून त्यांना तिकिटं आहेत का ? अशी विचारणा झाली. हो म्हणताच दोन तिकिटांचे शंभर रुपये मिळाले ! सिनेमा संपला. विनय खूपच प्रभावित झाला. इथुनच मराठी, हिंदी नाट्य व सिनेमा क्षेत्राबद्दल त्याला आवड निर्माण झाली. या क्षेत्रातच काहीतरी करावं असं त्याला वाटू लागलं.
चित्रपट सृष्टीत रितसर येण्यासाठी विनयनं बारावीत असताना फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा दिली पण त्यात तो नापास झाला. वडील संपादक होते, त्या दैनिक देशोन्नतीमध्ये आधुनिक तंत्राचे छपाई मशीन आणायचं ठरलं म्हणून सर्वांना वाटलं की विनयने मुद्रण तंत्रात पुढील शिक्षण घ्यावे म्हणून. त्यानुसार विनयने मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मुद्रण तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.
मुंबईत नवीन येणाऱ्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, काय काय दिव्यातून जावं लागतं, हे ज्याचं त्यालाच माहित असतं. विनयचं ही असंच आहे. विनयची सुरुवातीला मुंबईत रहायची काही सोय नव्हती. त्यामुळे आमदार निवासातच आधी आमदार विठ्ठल तुपे यांच्या कडे आणि नंतर आमदार सुधाकर गणगणे यांच्याकडे त्याला काही महिने काढावे लागले. शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे तुपे साहेबांचे स्वीय सहाय्यक होते. विनयचे दुसरे सोबती पुढे प्रसिद्ध गझल नवाझ म्हणून उदयास आले, ते म्हणजे भीमराव पांचाळे.
विनयचं कॉलेज सकाळी नऊ वाजेपासून दोन वाजेपर्यंत असायचे. नंतर काय करायचे हा मोठा प्रश्न होताच. शिवाय सिनेमाचे वेड त्याच्या डोक्यातून काही गेले नव्हते. कॉलेज शेजारी राहणारा व बी. आर. फिल्म मध्ये सहाय्यक संपादक असलेला शैलेंद्र डोके बरोबर विनयची ओळख झाली. त्याला विनय सिनेमाच्या आवडी संबंधी बोलला. शैलेंद्र विनयला दादरच्या बॉम्बे लॅबमध्ये जिथे बी आर फिल्मची एडिटिंग रूम होती, तिथे घेऊन गेला आणि त्याने विनयची ओळख मुख्य संपादक श्री एस बी माने यांच्याशी करून दिली .त्यांनी होकार दिल्यानंतर विनय बी आर फिल्ममध्ये शिकाऊ सहाय्यक संकलक म्हणून रुजू झाला.
“तवायफ”चे (ऋषी कपूर -रती अग्निहोत्री) दिग्दर्शक बी आर चोपडा होते.बी आर फिल्म्सची स्थापना झाल्यानंतर बाहेरच्या निर्मात्याचा तो पहिलाच चित्रपट होता. त्याचे निर्माते आर सी कुमार लंडनला स्थायिक झाले होते. पण तिकडे जाताना त्यांनी चोपडाजींना शब्द दिला होता, की पुढे कधी त्यांनी सिनेमा बनवला तर त्याचं दिग्दर्शन ते चोपडाजींना देतील. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा शब्द पाळला. “देहलीज” (जॅकी श्रॉफ – मीनाक्षी शेषाद्री) दिग्दर्शक रवी चोप्रा होते. हिरोच्या यशानंतर त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट विनयसाठी खूप महत्त्वाचा ठरला. कारण श्रेय नामावलीत विनयचं नाव होतं.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0014-300x183.jpg)
खुश झालेल्या विनयने स्वतः तिकिटे काढून मित्रांना हा सिनेमा दाखवला. बी आर चोप्रा यांचं दिग्दर्शन लाभलेला अखेरचा चित्रपट,”अवाम”चं काम ही विनयने केले. (राजेश खन्ना-स्मिता पाटील) “आज झाले मुक्त मी” दिग्दर्शक राजदत्त (मोहन गोखले, किरण वैराळे, मधू कांबीकर) याचं ही संकलन विनयने केले. पुनर्जन्म हा चित्रपटाचा विषय होता. चित्रपटाच्या श्रेय नामावलीत दोन वैराळेंची नावं आहेत. एक नाव विनयची चुलत बहीण अभिनेत्री किरण वैराळे आणि दुसरं नाव संकलक म्हणून विनय वैराळे यांचं होय. किरण वैराळे पुढे अमेरिकेत स्थाईक झाल्या. या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. दिग्दर्शक एन चंद्रा यांच्या “अंकुश”, “सच भईले सपनना हमार” या भोजपुरी सिनेमाच्या संकलनातही विनयने सहाय्यक म्हणून काम पाहिले. दरम्यान जेजेची तीन वर्षांची पदविका विनयने पूर्ण केली.
बदलत्या काळाची गरज ओळखून व्हिडिओ एडिटिंग शिकावं म्हणून विनय मुंबई दूरदर्शन केंद्रात कॅज्युअल व्हिडीओ एडिटर म्हणून रुजू झाला. मुंबई दूरदर्शनमध्ये ८६-८७ अशी जवळपास २ वर्षे तो होता. दुरदर्शनमध्ये बातम्या, आरोग्य, कृषी, अशा अनेक विषयावरील कार्यक्रमांचं संकलन विनय करत असे. श्री शिवाजी फुलसुंदर, भारती गोखले, मीना गोखले, मनोहर कुलकर्णी इत्यादी सारखी माणसे त्याला मिळाली, ज्यांच्याकडून अनेक गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या.
शरण बिराजदार यांचं “अतिथी” म्हणून एक नाटक विनयने एडिट केले. सतीश आळेकर, सुनील शेंडे आणि महेश मांजरेकर यांच्या भूमिका असलेले ते नाटक खूप हिट झाले. त्यातील संकलनाचे खूप कौतुक झाले. मुंबई दूरदर्शनच्या दोन वर्षाच्या अनुभवाने विनयला खूप नाव दिले.अनेक जण भेटल्यावर सांगायचे तुमचे नाव दूरदर्शनवर पाहिले म्हणून !
एक दिवस बॉम्बे लॅबमध्ये रवी चोपडा यांचा निरोप आला. त्यांनी शैलेंद्र डोके व विनयला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला बोलावले. त्यानुसार दोघेही दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता बी. आर. फिल्मच्या खार येथील मुख्य कार्यालयात पोहोचले .रवी चोपडानी सांगितले की, “आप लोग कलसे महाभारत की एडिटिंग करोगे” दोघांनी लगेच होकार दिला. अशा रितीने त्याला महाभारत मिळाले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0012-300x207.jpg)
महाभारताचा पहिला भाग २ ऑक्टोंबर १९८८ रोजी प्रसारित झाला आणि खऱ्या अर्थाने विनय स्टार झाला. दोन वर्ष महाभारताचे काम सुरू होते. एकूण ९४ भाग प्रसारित झाले.
विनय त्यावेळी जेमतेम पंचवीस वर्षाचा होता. बाकी सर्व लोक त्याच्यापेक्षा वयाने व अनुभवाने खूप मोठे होते. आज तुम्ही महाभारताची नामावली पाहिली तर हे तुमच्या लक्षात येईलच. ह्या दोन वर्षात विनय महाभारत टीमचा एक महत्त्वपूर्ण अंग बनला होता. प्रत्येक महत्वाच्या मीटिंगमध्ये तो असायचा. काही असले की बी. आर. चोपडा, रवी चोपडा, राही मासुम रजा विनयचा सल्ला घ्यायचे. अनेक छोट्या- मोठ्या घटनांचा विनय साक्षीदार आहे.
महाभारत व्यतिरिक्त चुन्नी, बहादुर शहा जफर या व अन्य काही मालिकांचे संकलन विनयने केले आहे.
महाभारत तब्बल दोन वर्ष दूरदर्शन वर चालले. ९७ टक्के लोकांनी ते पाहिले. महाभारत संपल्यावर विनयनं धीरूभाई अंबानी यांच्या मुद्रा कम्युनिकेशन मध्ये संकलकाची नोकरी पत्करली. तिथे त्यानं जेमतेम वर्ष-दीड वर्ष काम केलं.
पुढचं ऐकू या, विनयकडूनच ! “मला वेळ मिळे, तसा मी दूरदर्शनमध्ये नेहमी जात असे. अशाच एका दिवशी मला माझे दूरदर्शनचे मित्र देवेंद्र भुजबळ म्हणाले, अरे विनय एम्प्लॉयमेंट न्यूज पाहिला का ? फिल्म डिव्हिजनमध्ये एडिटरची जागा निघाली आहे, तू अर्ज कर. त्याप्रमाणे मी अर्ज केला. यू.पी.एस.सी.च्या मुलाखतीसाठी दिल्लीला गेलो. माझ्यासोबत माझा अकोल्याचा मित्र श्रीकांत कणकेकर होता. मुलाखत झाली आणि मी निवडल्या गेलो. २ फेब्रुवारी १९९२ रोजी संकलक म्हणून मुंबईतच फिल्म्स डिव्हीजन रुजू झालो.”
विनयनं फिल्म्स डिव्हिजनमध्ये जाण्यास दोन तीन गोष्टी कारणीभूत होत्या. एक तर सरकारी नोकरी म्हणजे स्थैर्य आणि एकाच छताखाली अनेक गोष्टी करता येतील असा विश्वास सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरच्या लोकांचाही आग्रह होता.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0010-300x174.jpg)
फिल्म्स डिव्हिजनमध्ये आल्यावर विनयने अनेक लघुपटांचे, वृत्तचित्रांचे संकलन-लेखन केले. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या जीवन कार्यावर आधारित ६३ मिनिटे कालावधीचा “हर दौर मे, नया दौर” जीवनपटाचे दिग्दर्शन केले. हा जीवनपट इतका गाजला की, गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या २००६ च्या इंडियन पॅनोरमामध्ये तो दाखवण्यात आला. त्याचबरोबर २००८ च्या मुंबई आंतरराष्ट्रीय लघु, वृत्तचित्र, अँनिमेशन महोत्सवातही तो दाखवण्यात आला. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी पहिल्या पानावर ४ कॉलम मध्ये प्रसिद्ध केली होती. दरम्यान, महाराष्ट्र टाईम्स मधून पत्रकार अविनाश चंदने यांचा फोन आला. त्यांनी संपादक भारतकुमार राऊत बोलू इच्छितात, म्हणून सांगितलं. राऊत साहेबांनी मटा सन्मान स्पर्धेसाठी परीक्षक होण्याबाबत विचारणा केली. विनयने लगेच होकार दिला. त्यानुसार तो परीक्षक झाला. विनयला हा मोठाच बहुमान वाटतो.
ह्या सर्व अनुभवाच्या शिदोरीच्या आधारावर विनयला काही वर्षे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनमध्ये सहाय्यक प्रादेशिक अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA00182-300x147.jpg)
महाभारत मालिका लॉक डाऊन मध्ये दूरदर्शन वर पुन्हा सुरू झाली आणि नव्या पिढीतही ती लगेच लोकप्रिय ठरली. पुन्हा विनयचे नाव दूरदर्शन वर झळकू लागले.
अकोला येथीलच प्रा.प्रज्ञा सावकार यांच्याशी १९९९ साली विनयचा विवाह झाला. त्यांचा मुलगा कणाद याने चित्रपट सृष्टीत करिअर करण्याचे ठरविले असून सध्या तो पुढील उच्च शिक्षण प्राग या देशातील एका ख्यातनाम फिल्म इन्स्टिट्युट मध्ये घेत आहे. दोघांनाही कणाद चा अभिमान वाटतो.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0017-300x225.jpg)
३०-३२ वर्षांपूर्वी धडपडणारा विनय आता निवृत झाला असून आपल्या मूळ गावी, अकोला येथे स्थायिक झालाय, याचा मनस्वी आनंद होतो. पण त्याच्या स्वभावानुसार तिथेही सुखासीन निवृत्तीचे जीवन न जगता, आपल्या अनुभवांचा फायदा आपल्या गावातील लोकांना, विशेषत: नवीन मुलामुलींना व्हावा, त्यांना चित्रपट निर्मितीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे, अकोल्यात चांगली चित्रपट चळवळ रुजावी यासाठी तो प्रयत्नशील आहे.
असा हा विनय, इतका मोठा होऊनही पहिल्या भेटीत होता, तसाच आजही आहे. विनय, तुझा लौकिक अधिकाधिक वाढत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/05/IMG_20210528_185321-150x150.jpg)
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800