Wednesday, September 17, 2025
Homeयशकथाविलक्षण राहीबाई पोपेरे

विलक्षण राहीबाई पोपेरे

माझा बालमित्र श्याम सुंदर शहाणे याने काही दिवसापूर्वी निरोप दिला की, तो आणि त्याचे काही सहकारी मिळून नाशिक येथे एक नैसर्गिक भाजीपाला मॉल आणि त्याच बरोबर एक millet cafe सुरु करणार असून त्याचे उदघाटन पद्मश्री सौ राहीबाई पोपरे करणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाला मी आवर्जून यावे असे कळविले.

श्यामसुंदर शहाणे ची ओळख म्हणजे तो नाटक, वेबसिरिझ आणि मॉडेल्लिंग करणांरा एक हरहुन्नरी कलाकार आहे. परंतु त्याला २०१९ चा, मिस्टर बियर्ड  किताब मिळाला आणि आमचा हा मित्र पूर्ण भारत भर प्रसिद्ध झाला. त्याला मूळात नैसर्गिक शेती विषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळेच त्याने स्वतःला अक्षरशः ह्यात झोकुन दिले आहे, त्याप्रमाणे ह्या मॉलचे उदघाटन राही बाईंच्या हस्ते झाले. मी व माझी पत्नी सौ. आरती ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.

बऱ्याच वक्त्यांनी भाषणं केलीत परंतु माझे कान राहीबाई काय बोलतात ते ऐकण्यासाठी आसुसलेले होते. इतक्या वेळ शांतपणे स्टेजवर बसून त्या विविध मान्यवरांची भाषणं मन लावून ऐकत होत्या. परंतु जसा माईक त्यांच्या हातात आला तसे त्यांनी आम्हा श्रोत्यांची मने काबीज करायला सुरुवात केली. वास्तविक त्यांचे शिक्षण अजिबात झाले नाही परंतु भाषेवर जरी ग्राम्य छाप असली तरी त्यांचे ओजस्वी शब्द कानात जसजसे पडायला लागले तशतशी त्यांच्या कर्तृत्वाची उत्तुंग भरारी जाणवू लागली.

त्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेंच बी बी सी ने 2018 च्या जगातील १०० प्रभावशाली महिलांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला.

रुपये, पैश्यांची बँक आपण सर्वांनी पाहिलीच आहे पण राहीबाई नी बियाणांची बीज बॅंक ही अनोखी संकल्पना जगासमोर आणली. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे, अश्या प्रकारे ह्या बीज बँकेचा त्या विस्तार करत आहेत.

त्या सांगत होत्या की वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणे त्यांनी फार प्रयत्न पुर्वक जपली आहेत. त्या हे कार्य सध्या तीन हजार महिलांसमवेत पुढे नेत आहेत. त्यांचे मार्गदर्शन सुरु होते आणि माझी विचारांची चक्रे मनात फिरू लागली, कुठले ही शिक्षण नाही, पाठबळ नाही पण विचारांची उंची आभाळा एवढी. पुढच्या पिढीला हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्याना सामोरं जावं लागेल म्हणून विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न करणाऱ्या राहीबाईं पुढे मला आपण खूपच खुजे असल्या सारखं वाटू लागले.

थोडे विषयांतर होईल पण एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो की काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र त्याच्या मुलीला राज्य माध्यमिक बोर्ड परीक्षा पद्धती च्या शाळेतुन काढून सी बी एस सी ह्या अभ्यासक्रम शिकण्यासाठी शाळा बदलत होता. त्याचे म्हणणे असे होते की त्यामुळे त्याची मुलगी अतिशय उत्तम प्रगती करेल ! त्याला मला सांगावेसे वाटते, मित्रा कुठलेही शिक्षण न घेता सौ राहीबाई नी इतकी उत्तुंग भरारी मारली आहे तेंव्हा शिक्षण पद्धती पेक्षा विचार उंच हवेत.

आणि हो एक प्रसंग सांगायलाच हवा….. कार्यक्रम आटोपून त्या गाडीत बसल्या आणि माझ्या लक्षात आले की त्यांच्या बरोबरचा एक फोटो आपल्या संग्रही असावा, मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही गाडीतून उतरू नका मी बाहेरूनच उभा राहून तुमच्या बरोबर फोटो घेतो तश्या त्या पटकन गाडीतून बाहेर आल्या आणि म्हणाल्या घे हवे तेवढे फोटो. मोठी माणसे उगाच मोठी नसतात ह्याची परत एकदा जाणीव झाली आणि मी त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी त्या बीजमाते समोर नतमस्तक झालो.

– लेखन : दीपक ठाकूर. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं