‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे वचन आयुष्यभर जगणारे ठाणे येथील सेवाभावी विलास ठुसे यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम नुकत्याच ठाण्यात संपन्न झाला. शारदा एज्युकेशन सोसायटी संचलीत आनंद विश्व् गुरुकुल महाविद्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार डॉ उदय निरगुडकर यांनी विलास ठुसे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, ठाण्याच्या मातीत समाजसेवेच्या संस्कारांची बीजे घट्ट रुजलेली आहेत.धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत विलास ठुसे प्रदीर्घ काळ कार्यरत होते. आजही हाच वारसा ठुसे निष्ठेने चालवीत आहेत. शिवसेना या चार अक्षराने घडवलेली ही माणसे म्हणजे आजच्या काळातील चमत्कार आहेत. सेवाभाव हा ठाण्याच्या संस्कृतीचा डीएनए आहे. हा सेवाभाव विलास ठुसे यांच्यासारखी व्यक्तिमत्वे जपत आहेत. हीच सामाजिक दायित्वाची दृष्टी प्रत्येकाला मिळायला हवी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

“सामाजिक कार्याची ऊर्जा ही आपल्यातच असते. आजूबाजूला नीट पाहिले तर ती ऊर्जा सकारात्मक कार्य करत असल्याचे सांगून, दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी झटणारे ‘दीपस्तंभ’ या संस्थेचे विश्वस्त यजुवेंद्र महाजन म्हणाले, “ठुसे दाम्पत्य हे मला आईवडिलांसारखे आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळालेली आहे. माझे काही नाही, जे आहे ते समाजाचे आहे. हा दुर्मिळ सेवाभाव विलास ठुसे यांच्यामध्ये आहे.”
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी आपल्या प्रास्ताविकात अमृत सोहळा आयोजनामागची भूमिका सांगितली. ते म्हणाले,”आजच्या काळात सेवाभाव हरवत चालला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत सावलीसारखे असणाऱ्या विलास ठुसे यांनी सामाजिक सेवेचे व्रत आजही सांभाळलेले आहे. या काटेरी वाटेवर समाजसेवा हा त्यांचा पासवर्ड आहे. महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आनंद विश्व गुरुकुल शाळेची जबाबदारी दिली तेव्हा आपल्या सोबत कोण असावे असा विचार जेव्हा मनात आला तेव्हा पहिले नाव विलास ठुसे यांचेच माझ्या समोर आले. ते जसे आत आहेत तसेच बाहेर आहेत.
मी सोडून आम्हीचा विचार करणारी ही माणसे आपण जपली पाहिजे, तरच पुढच्या सेवाभाव या शब्दाचा खरा अर्थ पुढच्या पिढ्यांना समजू शकेल.”

यावेळी विदुला ठुसे आणि विलास ठुसे यांनीही उपस्थितांशी संवाद साधून सोहळा आयोजनाबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
सोहळ्याच्या सुरुवातीला ठुसे सरांच्या घरापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत सजवलेल्या रथातून, पुष्पवृष्टी करत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीपुढे २५ मोटरसायकल स्वारांचे पथक होते. सभामंडपाशी पोहोचल्यावर गुरुकुलच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून सलामी देण्यात आली. त्यानंतर वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांच्या मंत्रघोषात सुवासिनींकडून ७५ दिव्यांनी औक्षण करण्यात आले.
यावेळी ठुसे सरांवर डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या, संपादीत केलेल्या, शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘स्नेहबंध’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून गुरुकुल शाळेतील मदतनीस कर्मचाऱ्यांपर्यंत १११ जणांनी अत्यंत आत्मीयतेने लिहिलेले लेख आहेत. हे पुस्तक या प्रसंगी उपस्थितांना भेट म्हणून देण्यात आले.
चित्रकार योगेश पंडित यांनी रेखाटलेले आनंद दिघे आणि विलास ठुसे यांचे तैलचित्र मान्यवरांच्या हस्ते ठुसे दाम्पत्याला भेट देण्यात आले. यावेळी ठुसे सरांची पुस्तकांनी तुला करण्यात आली. या ग्रंथतुलेसाठी विद्यार्थी, शिक्षक व संवेदनशील ठाणेकरांनी दीडशे किलो वजनाची पुस्तके जमा केली होती. आता ही पुस्तके पालघर तालुक्यातील सावरोली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला ग्रंथालय निर्मितीसाठी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. हे गाव दोन वर्षांपूर्वीच गुरुकुलच्या एनएसएस विभागातर्फे दत्तक घेण्यात आले आहे.
ठुसे सरांसाठी ‘दानधर्म’ हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे हे जाणून या प्रसंगी आयोजकांनी सर्वांना दीपस्तंभच्या झोळीत फुल ना फुलाची पाकळी देण्याचे आवाहन केले. त्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद मिळाला.
खासदार नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, पवन कदम यांनी विलास ठुसे यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा वागळे आणि डॉ. संतोष राणे यांनी केले. तर आनंद विश्व् गुरुकुलचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ठुसे सरांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
