लेफ्टनंट अपूर्वा वैशाली नारायण गीते
एकविसाव्या शतकाचे प्रतिनिधित्व करणारी युवती “लेफ्टनंट अपूर्वा वैशाली नारायण गीते“ हिचा मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय नौसेनेत लेफ्टनंट पदावर पोचणारी महाराष्ट्रातील पहिली महिला नौसेना वैमानिक होण्याचे यश मिळवल्या बद्दल नुकताच युवादिनानिमित्ताने “सानेगुरुजी युवा पुरस्कार“ कर्नल चंद्रशेखर उन्नी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
अपूर्वाचा जन्म १२ जुलै १९९७ रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली गावात झाला. शालेय शिक्षण डोंबिवलीच्या ओंकार इंटरनेशनल स्कूल मधून तर उच्च माध्यमिक शिक्षण मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यायातून पूर्ण केले. पुढे तिने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील महाविद्यालयातून संगणक शास्त्रात बी.ई.ची पदवी संपादन केली. अपूर्वा जून २०१९ पासून भारतीय नौसेनेत लेफ्टनंट पदावर कार्यरत आहे.
आई वैशाली आणि वडील नारायण गीते यांनाच आपला आदर्श मानणारी अपूर्वा सांगते “ दर दिवशी प्रत्येक क्षण हा काही ना काही संघर्षाचा असतो, भारतीय नौसेनेत पदोपदी नवीन शिकतेय.” अर्थातच हे तिच्या आई-वडिलांच्या प्रेरणेनेच ती साध्य करत आहे आणि पुढे भविष्यातही करणार आहे हे ओघाने आलेच.
सशत्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कामी भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गुजरात राज्यातील पोरबंदर येथे इंडिअन नेव्हल एअर स्काड्रन वसलेली आहे. अत्याधुनिक डॉर्नीयर-२२८ या सागरी टेहळणी विमानांचा या
स्काड्रनमध्ये समावेश आहे. येथे ३ ऑगस्ट २०२२ रोजी घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेतील यशस्वी मोहिमेत सामील होण्याचे भाग्य अपूर्वाला लाभले. उत्तर अरबी समुद्रातील सागरी शोध आणि टेहळणी मोहिमेसाठी संपूर्ण महिला चमूची निवड करणे हा भारतीय नौदलाचा अनोखा उपक्रम होता. डॉर्नीयर-२२८ या विमानाच्या सहाय्याने पाच महिला अधिकाऱ्यांनी सागरी शोध आणि टेहळणी मोहीम यशस्वी करून एक नवा इतिहास रचला आहे. या महिला चमूमध्ये अपूर्वाची निवड झाली, ही अभिमानास्पद बाब आहे. अशा अनेक महत्वाच्या आणि कठीण मोहिमा भविष्यात अपूर्वाला पार पाडायच्या आहेत. त्यासाठी अपूर्वाला लाख लाख शुभेच्छा !
अपूर्वाच्या भारतीय नौदलातील यशामुळे जास्तीत जास्त मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि भारताच्या सीमा सुरक्षेचे स्वप्न बघावे आणि ते पूर्ण करावे हेच अपूर्वाचे स्वप्न आहे. हे तिचे स्वप्न, ही तिची अपेक्षा पूर्ण व्हावी तसेच अपूर्वाने भारतीय नौदलात उत्तरोत्तर प्रगती करून सर्वोच्च पदावर पोहचावे यासाठी न्यूज स्टोरी टूडे तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !
— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800