दोन वर्षांपूर्वी एखादा छोटा जवळपासचा परदेश दौरा करावा असे आमच्या मनात आले. सुट्ट्या लागल्या की जाऊ असे ठरले. पण कोरोना च्या विचित्र परिस्थितीमुळे दोन वर्ष ठरवलेला दौरा स्वप्नातच राहिला.
यावर्षी मात्र असं वाटू लागलं, स्वप्नातला परदेश दौरा प्रत्यक्षात उतरेल असे !.. कुठे जावे ? याचा विचार करत असताना दोन ठिकाण पुढे येत होती, ती म्हणजे मॉरिशस आणि दुसरे म्हणजे मालदीव. आम्ही दोघांनी मॉरिशसला पसंती दिली.
११ मे २०२२ रोजी आम्ही एअर मॉरिशस च्या विमानामध्ये स्थानापन्न झालो. पाच साडेपाच तासांचा हिंदी महासागरावरून प्रवास करत मॉरिशस बेटावर उतरलो आणि भारताच्या बाहेर पहिले पाऊल टाकण्याचा कोण आनंद मला झाला !..
मॉरिशसला उतरल्या पासून आम्हाला फारशी गर्दी दिसत नव्हती. निवांतपणे शांतपणे इमिग्रेशनचे काम पूर्ण करून आणि बाहेर आलो. बाहेर आल्याबरोबर एक सर्व सोयींनी युक्त बस आमच्यासाठी उभी होती. त्या बसचा ड्रायव्हर पास्कल आणि मॉरिशस मधील रहिवासी असणारा गाईड प्रवीण यांनी आमचा ताबा घेतला. आम्हाला विमान तळापासून पासून गाईड करणारे श्री प्रशांत रामराजे यांनी आम्हा सर्वांचे सामान व्यवस्थितपणे बसच्या बॅगेज एरिया मध्ये ठेवले. भारदस्त परंतू मधुर आवाजात आम्हाला सूचना दिल्या. आमचा हॉटेलच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
जाता जाताच लक्षात आलं की रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा सुंदर हिरवाई आहे. लांबच लांब असलेल्या शेतांमध्ये फक्त ऊस हे एकच पीक नजरेला येत होत. आपण एका निसर्गरम्य प्रदेशातून जात आहोत याची जाणीव होत होती. थोड्याच वेळात आम्हाला ब्रेकफास्टसाठी एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेण्यात आले. तिथे पहिल्यांदा आम्ही सर्व सह प्रवाशांचे चेहरे न्याहाळून घेतले. अतिशय शांतपणे आणि थोडीफार जुजबी माहिती घेत, आम्ही सारे जण मार्टिम क्रिस्टल बीच हॉटेल मध्ये येऊन पोहोचलो. लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण करुन आम्ही आपापल्या रूम मध्ये पोचलो.
अतिशय अदबीने फ्रेंच आणि इंग्लिश मध्ये गुड मॉर्निंग करणारे सर्व कर्मचारी, स्वच्छ आणि सुंदर इमारत पाहून मन प्रसन्न झाले.
संध्याकाळी रूमच्या गॅलरीमध्ये कॉफी घेत असताना खूप कलकलाट, चिवचिवाट ऐकू येऊ लागला. समोरच्या सुरूच्या झाडांवर हजारो चिमण्यांचे थवे झाडावर बसून चिव चिव करत होते. मस्त फांद्यांवर बसून झोके घेत होते. त्यांच्याबरोबर सुगरण पक्ष्यांची घरटी देखील हेलकावे खात होती.
पंधरा वीस मिनिटात त्यांचा आवाज बंद झाला. सूर्यास्त झाला आणि एक सहज सुंदर दृश्य दृष्टीआड झाले.
आम्ही पोचलो त्या दिवशी थोडंसं आभाळ होतं. कुठेतरी पावसाचा शिडकावा होऊन गेलेला होता. त्यामुळे वातावरण धुंद होतं. सहाजिकच संध्याकाळी आमचे पाय कॅफेट एरिया कडे वळले. तिथे गेल्यावर त्या हॉटेलचं सौंदर्य, आणि प्रशस्त्तता अधिकच जाणवायला लागली. वेगवेगळ्या पदार्थांचा वास येऊ लागले. कारण येथे जगभरातून आलेले पर्यटक मोठ्या प्रमाणात देखील दिसत होते. प्रशस्त डायनिंग हॉल, भरपूर झाडं, पाणी यांनी सुशोभित केलेला हा परिसर हजारो माणसांना सहजपणे सामावून घेतो, तो सारा परिसर पाहून मोहून गेलो.
रात्रीच्या वेळेला डिनर होईपर्यंत आफ्रिकन वाद्यांचा, आणि गाण्याचा आवाज येऊ लागला. पाहता पाहता डान्सर चा एक ताफा आफ्रिकन पद्धतीचे कपडे घालून सहजपणे डायनिंग हॉल मधून नाचत गात स्टेज वर जाऊन पोचला. आम्हाला फारच मजा आली. मनात देवानंद च ‘खोया खोया चांद खुला आसमा’… रूंजी घालत होता.
हो सांगायच राहिलं की, मॉरीशस दक्षिण गोलार्धात 20 अंश असून भारतापेक्षा दिड तास मागे आहे. त्यामुळे तिथे अंधार लवकर पडतो. आपले उत्तरायण त्यांचे दक्षिणायन ! असो.
तिथला पाऊस पण गमतीशीर. आवाज न करता छान सडा पाडून जाणारा ! ओलसर रस्ता दिसला की समजावं शिडकावा झाला ! रस्त्याने जाताना माणसे फारशी दिसत नाही. सगळीकडे शांतता. ही शांती कुणी ती उगीच हॉर्न वाजवून भंग करत नाही. गाड्या एकामागे एक शिस्तीत जात असतात. ओव्हरटेक करत नाही. स्पीड वाढवला जात नाही. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. रस्त्यात टपऱ्या, हातगाडी अजिबात नाही. त्यामुळे कचरा, घाण नाही. आइस्क्रीम वगैरे कुठे -कुठे असतं. पण रॅपर सगळे कचरापेटीतच जातात. सारे कसे छान आणि सुंदर !
हे बेट आफ्रिकन प्रदेशाचा चा भाग आहे. महाराष्ट्राचे चार तालुके एवढासा देश. पण त्यांचे चलन आपल्याला भारी…… तेही फक्त पर्यटनावर ! थोडक्यात हा देश म्हणजे युरोप, आशिया आणि आफ्रिका या तीनही खंडातील संस्कृतीचा मिलाफ आहे. त्यांनी ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत, त्या जाणीपूर्वक स्वीकारल्या आहेत.
इथे हिंदूची संख्या भरपूर असून जागोजागी मंदिरे आहेत. फ्रेंचांनी आणि नंतर इंग्रजांनी इथे बरेच वर्ष राज्य केले त्यामुळे फ्रेंच आणि इंग्रजी या दोन भाषा बोलल्या जातात. त्या खालोखाल हिंदी पण बोलली जाते. स्थानिकांनी ‘क्रियोल‘ ही एक फ्रेंच मिश्रित भाषा निर्माण केली आहे.
भारतीय लोकांबद्दल येथे प्रचंड आपुलकी आणि प्रेम आहे. कारण आपले पूर्वज भारतीय आहेत हे त्यांना माहीत असते. त्यामूळे ज्यांना हिंदी येतं ते आवर्जून हिंदीत संभाषण करतात हे विशेष ! कुठेही जा.
विस्तीर्ण समुद्रकिनारे, पांढरी स्वच्छ वाळू, निळे निळे पाणी आणि सुरुच्या पानाच्या सुंदर झोपड्या. वर स्वच्छ निरभ्र आकाश. मधून येणारी पावसाची बारीकशी सर. समोर अचानकपणे दिसणारे इंद्रधनुष्य. अहाहा काय तो नजारा…… पौर्णिमेच्या रात्री तर खाली चमचमणारे पाणी. निरवतेत समुद्राची येणारी गाज. नभात पूर्ण लख्ख प्रकाशित चंद्रमा. सुखावणारा गार वारा. आमच्या बरोबर आलेल्या प्रत्येकाला ‘निले निले अंबर पर चांद जब आये प्यार बरसाये हमको तरसाये’ हे गाणं नक्की आठवलं असेल… त्यामूळे अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण इथे झाले नाही तरच नवल ! ….त्याची नामावली देण्यात आमचा गाईड कुठेही कमी पडत नव्हता…….
समुद्र किनारा असला तरी हवा मात्र अत्यंत तलम, तन मनाला सुखावणारी. गार वाळूचा मुलायम स्पर्श. सोबत सर्व ग्रुपमधील सदस्यांचे आनंदी चेहरे. गप्पा, गाणी, विनोद यांना नेहमीच येणारे उधाण……
Old MacDonald had a farm e ya e ya o असा बस मध्ये केव्हाही मधूनच येणारा स्वर ! त्यामुळें निर्माण झालेला निखळ हास्याचा फवारा !! (आमच्या सोबत ३, ते ५ वर्षाचे दोन छोटे पाहुणे होते. ज्यांच्यामुळे आम्ही सारे पुन्हा लहान झालो)… आणि अशा वातावरणाने आपण खूप वर्षापासून एकमेकांना ओळखत आहोत ही भावना.
कुठेही साईट सीन साठी नेले तरी ‘हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने’ चा अनुभव सर्व ठिकाणी येणारच याची खात्री. वेळेवर मिळणारा नाश्ता, जेवण यामुळे ही नुसती सहल नसून आनंद ठेवा जाणवत होता. भरपूर झाडे परदेशातून आणून, वसवलेले पक्षी, वन्य प्राण्यांचे पार्क, मोठी मोठी कासवे, भरपूर झाडे आणि फुले, वॉटर राईड्स, धबधबे, समुद्र, पाण्याचा पुरेपूर वापर, नीटनेटकी टुमदार घरे, छोटे पण काटकोनात छेदणारे सरळ, एकही खड्डा नसलेले रस्ते, नजर जाईल तिथे हिरवीगार चमचमणारी धूळ विरहित झाडे, कुठेही कोणाचेही पुतळे नाहीत असे हे ठिकाण आहे.
निसर्ग कसा जपावा हे आपण नक्कीच शिकावे…. Botanical garden, citadel fort, cassela bird park, ship Factory, beaches, Sevan wonder in Mauritius, illusion fun center अशी अनेकविध ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. शिवाय शॉपिंग मॉल्स, शॉप्स, असा सगळा सुंदर अनुभव घेत ७ दिवस केव्हा संपतात ते खरोखर कळतच नाही. परत निघताना सोबत असतात त्या आनंददायी सुखद आठवणी !

– लेखन : वासंती पाठक. नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
🌹खूप छान माहिती दिली आपण 🌹
धन्यवाद
अशोक साबळे
अंबरनाथ
सुंदर वर्णन वाचताना आनंद वाटला .
सारे फोटोही सुरेख 👌👌👌👌
धन्यवाद। 🙏🙏🙏