डॉ अनिल अवचट यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांना प्रत्यक्ष कधी न भेटताही त्यांच्या जाण्याने अगदी जवळच्याच परिचित व्यक्तीच्या जाण्याएवढे दुःख झाले. त्यांच्या मुली मुक्ता आणि यशोदा यांच्या एवढाच त्यांच्यावर एक वाचक म्हणून प्रत्येकाचा तेवढाच हक्क आहे……
आपल्या भावना व्यक्त करतायत स्वतः लेखिका असलेल्या अर्चना शंभरकर…
डॉ. अनिल अवचट आणि माझी ओळख तशी पुस्तकांच्या माध्यमातूनच होती. त्यांची कन्या यशोदा आणि एका खासगी विद्यापीठाचे प्र कुलगुरू असलेले माझे मोठे बंधु डॉ. हेमंत गाडेकर हे बाबा आमटेंच्या श्रम शिबिरात असतांना भेटले होते. त्यानंतर त्यांची मैत्री झाली.
डॉ.अनिल अवचट यांना दादा प्रत्यक्ष भेटले आहेत एवढच मला लहाणपणी माहित होतं. मात्र वाचायची जाण आली तसे डॉ.अनिल अवचट यांची मिळेल ती पुस्तकं वाचून काढली. कोरोनाच्या प्रकोपापुर्वी मंत्रालयाच्या आवारात ग्रंथ प्रदर्शन झाले होते. त्यातही मी डॉ.अनिल अवचट यांची, त्यांनी केलेल्या लिखाणाची पार्श्वभूमी सांगणारे पुस्तक ‘मी का लिहीतो’ विकत घेऊन वाचून काढले.
सुप्रसिद्ध फिल्म अभिनेता जयंत गाडेकर म्हणजे माझा लहान भाऊ, यांस महाविद्यालयात असतांना एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचा होता. त्यासाठी चांगल्या एकांकिकेच्या तो शोधात होता. त्याच वेळी आमच्या घरच्या लायब्ररीत डॉ.अनिल अवचट यांच्या काही पुस्तकांची भर पडली. त्यातले ‘गर्द’ नावाचे पुस्तक आम्ही सगळ्यांनी वाचून काढले. डॉ.अनिल अवचट यांनी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णीं यांच्या सोबत मुंबईत मुक्काम करून व्यसनाधीन मुलांच्या जीवनावर आधारित असलेले हे पुस्तक लिहीले होते.
या पुस्तकातील मजकुराच्या आधाराने आमच्या आई जेष्ठ लेखिका विमलताई गाडेकर यांनी ‘जस्ट अ डिसीज’ ही एकांकिका लिहीली. मोठे दादा डाॅ हेमंत यांनी ती दिग्दर्शित केली मुख्य अभिनेता म्हणून जयंत गाडेकर होता. या भूमिकेसाठी त्यावर्षी त्याला अभिनयाचे पहिले बक्षीसं मिळालं. छोटी बहीण अर्गोनाॅमिस्ट डाॅ मोना हिने या नाटकात बालकलाकार म्हणून काम केले होते. तिलाही अनेक ठिकाणी बालकलाकाराचे बक्षीस मिळाले. या नाटकासाठी लागणारी बॅकस्टेज धावपळ, नेपथ्य, संगित आणि लाईट यासाठीचे समन्वय मी केले होते. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मला बरेच काही शिकायला मिळाले होते. एवढा ज्वलंत विषय विदर्भातील नाट्यरसिकांना आवडला यांचे श्रेय अवचट सरांच्या अभ्यासपुर्ण “गर्द” या पुस्तकालाच जाते.
त्यांच्या ‘मोर’ सारख्या ललित लिखाणापासून ते शोध पत्रकारितेचे ‘रिपोर्ताज’ पर्यंत जिथे त्यांचे नाव असेल असे हाती पडेल ते सर्व साहित्य मी वाचून काढले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांना प्रत्यक्ष कधी न भेटताही त्यांच्या जाण्याने अगदी जवळच्याच परिचित व्यक्तीच्या जाण्याएवढे दुःख झाले. त्यांच्या मुली मुक्ता आणि यशोदा यांच्या एवढाच त्यांच्यावर एक वाचक म्हणून प्रत्येकाचा तेवढाच हक्क आहे.
त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्या विषयी ते भरभरून लिहायचे. भेटणाऱ्या अनेकांविषयी त्यांनी टिपणं काढलेली आहेत. त्यांच्या सोबत काम करणारे सर्वच त्यांना ‘बाबा’ म्हणत. त्यांनी केलेल्या कामांची यादी खुप मोठी आहे. एकाच आयुष्यात त्यांनी अनेक कामं केली. त्यांची बुद्धीमत्ता आणि लोकसंग्रह या दोन्ही बाबतीत त्यांना भरभरून दान मिळालं होतं.
केवळ साहित्य जगतातच नाही तर एकूण समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. त्यांच्या लेखणीतून, पुस्तकांद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले.
पत्रकार म्हणून समाजाशी अनिल अवचट यांची जवळीक आणखी वाढली, ते स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपल्या पत्रकारितेने समाजातील दुर्बल घटकांना मदत होईल असे कायम प्रयत्न केले. गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी त्यांनी कार्य केलं. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी अनेक पुस्तकं लिहिली.
व्यसनमुक्ती क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाचं कौतुक केलं गेलं. अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना दिला गेला. पुढे महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, फर्ग्युसन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं.
सामाजिक अडचणींसोबत बाल साहित्यावरही डॉ. अनिल अवचट यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं. “सृष्टीत.. गोष्टीत” या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आला. इतकंच नाही तर अनिल अवचट यांची पुस्तकं सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली.
अशा या थोर बाबांच्या जाण्याने क्षणभर ब्रेक लागल्यासारखे झाले असले तरी त्यांनी उभारलेल्या कामातून आणि लेखनातून ते कायम जीवंत राहणार आहेत.
त्यांना विनम्र अभिवादन !

– लेखन : अर्चना शंभरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
डॉ.अनिल अवचट यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
डाॅ.अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Very nice article.