पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
जगात आतापर्यंत अनेक राष्ट्रप्रमुख होऊन गेलेत. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगवेगळी होती. परंतु वैश्विक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले राष्ट्रप्रमुख आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया त्यांनी स्वतःच्या बळावर करून दाखविली आहे.vत्यामुळेच ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अन् नंतर देशाचे पंतप्रधान म्हणून यशस्वी ठरले आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आज ते विश्वगुरू म्हणून साऱ्या जगतात किर्तीमान झाले, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.vलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीसाहेब यांना मराठी जनमानसाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबे मोदीजींना आरोग्यदायी असं दीर्घायुष्य देवो, ही तिच्या चरणी प्रार्थना !
नरेंद्रजी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी दामोदरदास मोदी यांच्या घराण्यात हिराबेन यांच्या उदरी झाला. मोदीजींचे मुळगाव गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर हे आहे. त्यांच्या भावांचे नाव प्रल्हादजी मोदी अन् अमरितजी मोदी. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना लहानपणापासूनच काबाडकष्ट करण्याची सवय जडली होती. शालेय जीवनापासून नरेंद्रजींना आत्मनिर्भर होण्याचा निर्धार असल्याने त्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी आपला शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी रेल्वे स्टेशनवर विनासंकोच चहावाला म्हणून काम केले. ह्या कामामुळे त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. काम लहान असो वा मोठे ते आपापल्या परीने श्रेष्ठ असते, हा सूचक संदेश त्यांनी सर्वधर्मीय लोकांना दिला.
वडील दामोदरदास मोदी अन् आई हीराबेन मोदी यांनी दिलेल्या आदर्श जीवनाच्या शिकवणीची शिदोरी बरोबर घेऊन नरेंद्र मोदी देश सेवेसाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आपले जीवन आर.एस.एस आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी समर्पित केलं आहे.
मोदीजींचे पक्ष बांधणीतले अन् पक्ष वाढीतले चातुर्य तसेच नेतृत्वगुण पाहून केंद्रीय पक्ष संघटनेने त्यांना गुजरात विधानसभेची जबाबदारी सोपविली. स्वतः नरेंद्रजींने २००२, २००७ व २०१२ अशी सलग तीन वेळा विधानसभा निवडणुक मोठ्या मताधिक्याने जिंकली. त्यानंतर त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
७ ऑक्टोबर २००५ ते २२ मे २०१४ पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले. दरम्यान गुजरात राज्यात भयंकर मोठा भूकंप झाल्याने जीवित व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली. अशा आपत्कालिन परिस्थितीत मोदीजींनी ठोस उपाययोजना करून पूर्वपदावर स्थिती आणली. त्यामुळे तेथील लोकांचा त्यांच्यावर दांडगा विश्वास बसल्याने गुजरातमध्ये बीजेपीची घोडदौड आजही सुरूच आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत गुजरातची कृषी, जलसिंचन, उद्योग, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली. विकासाच्या बाबतीत गुजरात हे देशात रोल मॉडेल ठरले आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गुजरात हे ग्लोबल ब्रँड बनले असून तेथे अनेक देशांनी विविध प्रकल्प उभारणीत मोठी गुंतवणूक केली आहे. मोदींच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा हाच खरा करिश्मा आहे. नर्मदा प्रोजेक्ट मुळे तर, शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटून पाणी टंचाईवर पूर्णतः मात केली आहे. गुजरातमधील चरंका हा आशिया खंडातील सर्वात मोठा सोलर पार्क म्हणून प्रख्यात आहे. वास्तवात मोदींच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत गुजरात राज्य हे सुजलाम सुफलाम झालं आहे.
मोदीजींच्या नेतृत्वाखाली बीजेपीने २०१४ साली लोकसभेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २८० जागा जिंकून एकहाती सत्ता ग्रहण केली. नरेंद्रजी स्वतः वाराणसी लोकसभा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मुख्यमंत्री असताना जितक्या गतीने गुजरातचा सर्वांगीण विकास केला, तेवढ्याच वेगाने पंतप्रधान झाल्यावर मोदी हे देशाचा सर्वच क्षेत्रांचा विकास करत आहेत. नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०१४ प्रमाणेच २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील मोठे यश मिळविले.
मोदींनी पंतप्रधान झाल्यावर सर्वप्रथम खेडी व शहरे यातील असमतोल मिटविण्यावर भर दिला. ग्राम विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तेथील रस्ते, जल सिंचन, वीज, माहिती तंत्रज्ञान या मूलभूत सुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे दळण वळण ची उत्तम सोय होऊन खेडी ही शहरांना जोडली गेली. महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला, या संदेशाला अनुसरून आत्मनिर्भर ग्राम व्यवस्था उभारण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे विकासाची फळे खेड्यांना देखील चाखायला मिळू लागली. त्यामुळे मोदीजी हे ग्रामस्थांचे मसिहा म्हटले गेले. दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब लोकांचा आर्थिक विकास व्हावा, यादृष्टीने मोदी सरकारने आपले आर्थिक धोरण आखले. एस.टी.आणि एस.सी.साठी असलेला ॲट्रोसिटी ॲक्ट अधिक मजबूत केला. मागासवर्गीयांसाठी असलेला राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्त्यासह स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकरिता अर्थसहाय्य देणं गरजेचं आहे, हे जाणून त्यासाठी स्थायी कायदे केले. त्यातून सामाजिक सबलीकरण होण्यास चालना मिळत आहे.
मोदीजींनी सन २०१९ मधील पहिल्याच कॅबिनेटमध्ये काला पैसा शोधून काढण्यासाठी एसआयटीची नेमणूक केली. पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश या देशांमध्ये भारतीय करन्सीच्या नकली नोटा मोठ्या प्रमाणात छापून आर्थिक व्यवहारात आणल्या जात होत्या.त्यावर ठोस उपाय म्हणून विमुद्रीकरण करण्याचा तातडीने निर्णय घेऊन एक हजार आणि पाचशेच्या नोटा भारतीय चलनातून कायमच्या बाद केल्या. बेनामी मालमत्ता संबंधी कायदा करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी)ची कायदेशीर तरतूद केली. मोदी सरकारने काळा पैसा शोधून काढण्यासाठी प्रभावी मोहीम राबविली, त्यामुळे भारतीय मतदारांचा मोदी प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे एन.डी.ए. सरकारच्या काळात देशात इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या दुप्पट होऊन, सर्वच क्षेत्रातील नागरिक प्रामाणिकपणे टॅक्सेस भरू लागणे, ही भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर, हेच मोदींच्या बहुआयामी नेतृत्वाच्या यशाचं गमक आहे.
मोदीसाहेब अन् केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या अथक प्रयत्नांतून “ट्रीपल तलाक”ची जुनी पद्धत बंद करण्यात आली. यातून एन डी ए सरकारने मुस्लिम महिलांना न्याय मिळवून दिला. यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून मुस्लिम महिलांनी मोदीजींचे मनस्वी आभार मानले.
जम्मू कश्मीर राज्याला गेल्या ७० वर्षांपासून असलेला विशेष दर्जा बदलण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने कलम ३७० रद्द केले. त्यामुळे अन्य राज्यातील उद्योजकांना जम्मू कश्मीरमध्ये व्यापार-उद्योग करण्यास मुभा मिळाली. सदर ऐतिहासिक निर्णयामुळे या राज्याचा आर्थिक विकास होण्यास गती मिळत आहे. तसेच येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वच्छ भारत अभियान अन् स्मार्ट सिटी योजना मोदी सरकारने प्राधान्याने राबविल्याने स्वच्छ व सुंदर भारत उभारण्याचे
मोदीजींचे स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ही खरी मानवंदना ठरली आहे. महत्वाचे म्हणजे यातून सर्वधर्मीय लोकांना स्वच्छ व सुंदर जीवन जगण्याची सवय लागली. खरं तर, हीच या अभियानाची फलश्रुती होय.
विकसित भारतचे स्वप्न साकार करण्यासाठी मोदी सरकार हे तरुणांकरिता रोजगार निर्मिती कार्यक्रम तर, महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवित असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीवर अवलंबून न रहाता, त्यांनी व्यवसायाकडे वळावे या उद्देशाने मुद्रा कर्जाची मर्यादा वाढवून २० लाख रुपये केल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
मोदीजींच्या प्रयत्नातून “वन रँक वन पेन्शन” लागू झाली. सदर स्कीम गेल्या २० वर्षांपासून रखडली होती. भारतीय सैनिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळून त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
मोदीजींना भारतीय सैनिकांबद्दल मोठा अभिमान व आदर असल्याने ते दरवर्षी मोठ्या आनंदाने सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करत असतात. मोदीजींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्रांच्या आधुनिकरणावर अधिक भर दिला. बुलेटप्रुफ जॅकेटची सैनिकांची मागणी मोदीजींनी मान्य करून त्यांना ते उपलब्ध करून दिले. अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित पडलेली होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याला ७५ वर्षे लोटूनही, ज्या सैनिकांनी आणि पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना आपल्या देशासाठी प्राण गमावले, त्यांचे राष्ट्रीय स्मृती स्मारक उभारले गेले नाहीत. ही गोष्ट पंतप्रधान अन् संरक्षण मंत्र्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ही स्मारके उभारण्यास तात्काळ मान्यता दिली. वास्तवात हाच खरा सैनिकांप्रती आदर-सन्मान आहे, हे मोदींनी गतकाळातील राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
कोरोना महामारीच्या काळात सारं जग हादरून गेलं होतं. जगातील महासत्तांसह अन्य लहान-मोठे देशातील लाखो लोक या महामारीला बळी पडले. प्रारंभी भारतातही हजारों लोकांचे या महामारीमुळे जीव गेलेत. या आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या धैर्याने अन् संयमाने कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतीयांना आवाहन केले. त्यांचे मनोबल वाढविले. नागरिकांसाठी एक रीतसर नियमावली तयार करून दिली. भारतीयांनी मोदीजींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देऊन कोरोनाला नियंत्रित करण्यास मोठा हातभार लावला. दुसऱ्या देशांवर विसंबून न रहाता, मोदीजींच्या आदेशानुसार कोव्हिशिल्ड/कोव्ह्यासिन ह्या दोन स्वदेशी लसी संशोधित केल्या गेल्या. अन् प्रत्येक राज्याच्या मागणीनुसार कोरोना लसीचे वितरण करण्यात आले. त्यामुळे देशातील निम्म्याहून अधिक लोकांना लस घेणे सुकर झाले. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोना नियंत्रित करण्यात मोठे यश मिळविले. एक पाऊल पुढे टाकत मोदीजींनी उदार मनाने अनेक कोरोनाग्रस्त देशांना मागणी करताच भारतीय बनावटीच्या लसी निर्यात केल्या. परिणामी येथील लोकांचेही जीव वाचलेत. याबद्दल नरेंद्रजी मोदी यांच्या मानवतावादी धोरणाला भारतीयांसह जगातील नागरिकांनी हॅट्स ऑफ केलं आहे.
आज विश्वातील प्रत्येक लहान -मोठा देश अन् त्यांचे राष्ट्र प्रमुख हे महत्वपूर्ण विषयांवर मोदीसाहेबांचे मार्गदर्शन घेत असतात, त्यांचे ओपिनियन घेत असतात. उदा.रशिया-युक्रेन युद्ध. एवढा मोठा मान-सन्मान, आदर जगातील राष्ट्रप्रमुख मोदीसाहेबांचा करताहेत. मोदीजींच्या राजकीय आणि प्रशासकीय कौशल्यामुळे आज भारताने फ्रान्सला मागे टाकत जगात ५ वें स्थान पटकावले आहे. या पार्श्वभूमीवरच मोदीसाहेबांना जागतिक स्तरावर विश्वगुरू म्हटले जाते.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शिफारशीने महाराष्ट्राला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांना भरीव निधी दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प – ६०० कोटी; महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार – ४०० कोटी; पुणे मेट्रो -८१४ कोटी; नागपूर मेट्रो – ६८३ कोटी; मुळा-मुठा नदी संवर्धन – ६९० कोटी; नाग नदी पुनरुज्जीवन – ५०० कोटी; मुंबई मेट्रो – १ हजार ८७ कोटी; एम यु टी पी -३ – ९०८ कोटी ; दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर – ४९९ कोटी; महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प – १५० कोटी; सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर -४६६ कोटी; पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्प – ५९८ कोटी. इतकेच नव्हे तर, मोदीसाहेबांनी राज्यातील महामार्ग, सागरी मार्ग प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, नवे एअरपोर्ट उभारणी यांना मुबलक निधी प्रदान केली आहे. याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी मोदीसाहेबांचे आभार व्यक्त केले आहे.
नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए गठबंधनने २०२४ मधील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकून तिसऱ्यांदा केंद्राची सत्ता मिळविली आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (बाळासाहेबांची शिवसेना) उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (भारतीय जनता पार्टी) व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (राष्ट्रवादी) यांचे महायुती सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत, राज्यातील महायुती सरकार हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांच्या, महिलांच्या अन् शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणाकारी योजना राबवित आहे.
वास्तविक पहाता, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे गोरगरीब, निर्धन लोकांसाठी मसिहा ठरले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून हजारों खेडी विजेपासून वंचित होती. अशा १८००० खेड्यांना मोदी सरकारने वीज उपलब्ध करून दिली. त्यामुळे मोदीजी हे ग्रामस्थांसाठी वरदान साबित झाले आहेत. याशिवाय सात कोटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कुकिंग गॅस मोफत उपलब्ध करून दिला. प्रधानमंत्री जन धन योजनेखाली सुमारे ३५ कोटी गोरगरीब लोकांची राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडून दिली. लोकाभिमुख मोदी सरकारने आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रती वर्ष ५ लाखाची मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय जननी सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, सुकन्या समृद्धी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, दीनदयाल अपंग पुनर्वसन योजना आदी अनेक लोकोपयोगी योजना मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भारताचे नाव साऱ्या जगतात किर्तीमान करणारे खऱ्या अर्थानं विश्वगुरू ठरले आहेत. यास्तव त्यांना मानाचा मुजरा !
जयहिंद !
जयमहाराष्ट्र !
— लेखन : रणवीर राजपूत.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800