अवती भवती च्या बातम्या खरेच मन सुन्न करणाऱ्या आहेत. एका हायकोर्ट जज च्या घरात आग लागते काय, त्यात करोडो रुपये जळतात काय, ते प्रकरण काही दिवस मिडिया नको तितके तापल्यानंतर अचानक बातमी बॅक फूट वर जाते काय सगळेच विचित्र.
आता अचानक मंगेशकर रुग्णालय फ्रंट फुटवर चर्चेत आहे. त्या निमित्ताने या धर्मादाय हॉस्पिटलचा धर्म कुठे गेला हे विचारण्याची वेळ आली आहे. आता येथील हॉस्पिटल प्रशासन, वारेमाप फी आकारणारे डॉक्टर, ट्रीटमेंट मध्ये झालेले संवेदन शिलतेचा अभाव असलेले वर्तन हे मिडिया त गाजते आहे.
या हॉस्पिटल साठी जागा घेताना मंगेशकर कुटुंबांनी सरकारकडे केलेली याचना, अन् नंतर चॅरिटी सोडून आलेले धंदे वाईक स्वरूप बघता कोणते क्षेत्र आता स्वच्छ, प्रामाणिक राहिले असा प्रश्न निर्माण होतो.
या निमित्ताने मंगेशकर कुटुंबाचे पितळ देखील उघडे पडले. तसेही या सर्वच मंडळींनी आपल्या गरिबीचे नको तितके स्तोम माजवले आहे. तेही सहानुभूती मिळवण्यासाठी. एका वृत्त पत्रात पंडित हृदयनाथ लिहित असलेले आत्मचरित्र पर लेखन कमालीचे उबग आणणारे होते.
नुकत्याच एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी मोदीजी समोर आमच्या वेळी लाडकी बहीण योजना असती तर आम्हाला भुकेले राहावे लागले नसते असे विचित्र विधान करून कहर केला ! गरिबी काही या एकट्या कुटुंबाच्याच नशिबी आली असे नाही.याही पेक्षा गरिबी भोगलेले लोक या देशात होते, आहेत. आपण समाजासाठी काहीतरी उदात्त करतो असा आव आणणारे दानशूर देशात, परदेशात वाढले आहेत. त्यापैकी अनेक खरेच प्रामाणिक आहेत. यात उद्योजक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी असे सारेच आहेत. अशा समाजसेवी संस्थांची, व्यक्तीची आपण दखल देखील घेतो. पण समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवणाऱ्या नाटकी दानशूराची संख्या इतक्यात बरीच वाढली आहे. दीनानाथ चॅरिटेबल ट्रस्ट हे त्यातले ताजे उदाहरण दिसते !
शिक्षण क्षेत्रापाठोपाठ मेडिकल क्षेत्रात खाजगीकरण झाल्या पासून समाजाची लूट सुरू झाली आहे. करोना काळात तर या खाजगी दवाखान्याच्या लोकांनी त्रस्त पेशंट अन् त्यांच्या नातेवाईकांना ज्या प्रकारे लुटले त्या सुरस चमत्कारिक कथा अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. आजही काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ज्या तऱ्हेने पेशंट्स ना लुटतात ती राक्षसी कृतीच ठरते. नवी टेक्नॉलॉजी आल्यामुळे महागड्या इक्विपमेंट चा फाईव्ह स्टार व्यवस्थापनाचा खर्च भरून काढण्यासाठी लाखो रुपयांचे बिल आकारले जाते. त्यातही इन्शुरन्स असला की विचारायलाच नको. इन्शुरन्स, फार्मा, दवाखाने यांची मिली भगत असते हे आता उघडे गुपित आहे. माणसाने एकदा हॉस्पिटल ची पायरी चढली की तो हतबल होतो. डॉक्टर्स पुढे लाचार होतो. कसाही करून जीव वाचवणे, बरे होणे हेच उद्दिष्ट असते. आपण मग पैशासाठी मागे पुढे बघत नाही. प्रसंगी कर्ज काढून जीव वाचवायची तयारी असते. याचाच फायदा घेत ही कॉर्पोरेट हॉस्पिटलची मंडळी पेशंटस ना वाटेल तसे नागवतात अक्षरशा !
सरकारचे आजकाल कुठेच नियंत्रण राहिलेले नाही. प्रत्येक राज्य, केंद्र शासनाच्या ढिसाळ प्रशासनाचे दाखले रोज मीडियावर दिसतात. कायदे मोडले तरी पोलिस काही करताना दिसत नाहीत. शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्थानी चालवलेली लूट, ट्युशन इंडस्ट्री ने माजवलेला धुमाकूळ शासनाला दिसत नाही. सरकारी अनुदान, सवलती मिळालेल्या संस्थावर देखील सरकारचा वचक नाही. भ्रष्टाचार खुलेआम चालला असताना सरकार डोळेझाक करताना दिसते. कारण कुठेतरी सरकारची यंत्रणा त्यात गुंतलेली असते. सहभागी असते!पैशाचा हव्यास, सत्तेचा माज यामुळे सरकारी गुंडगिरी, दडपशाही देखील वाढलेली दिसते. बीड प्रकरण याचे ताजे उदाहरण. हे आपण असेच बघत बसायचे, सहन करीत जायचे की काही चांगले बघायला,अनुभवायला मिळेल ही अपेक्षा करायची ?
समाजातली नैतिकता सर्व बाजूंनी ही अशी सातत्याने घसरणे ही राष्ट्र हिताचे निश्चितच नाही. केवळ मागचे ऐतिहासिक संस्कृतीचे गोडवे गाऊन विश्वगुरू वगैरे होण्याचे खोटे स्वप्न बघत बसण्यापेक्षा हाता पायाखाली काय जळते त्या विषयी जागरूक असणे जास्त महत्वाचे!यात फक्त सरकारचीच जबाबदारी गृहीत धरून चालणार नाही. जनतेचा उत्स्फूर्त सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे असे मला वाटते. आपल्याला काय वाटते ?

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800