तर मग स्मृतीभ्रंश (डिमेंशिया)बाबत जाणून घ्या…
वाढत्या आयुर्मानाबरोबरच वयोवृद्धांच्या आरोग्यविषयीच्या समस्याही वाढत आहेत.जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, डिमेंशिया इत्यादी.
आज भारतात 4.1 दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत. असे असले तरीही स्मृतीभ्रंश (डिमेंशिया) हा एक असा आजार आहे, ज्याची पुरेशी माहिती अजूनही जन सामान्यांपर्यंत पोहोचली नसल्याने असे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात व पर्यायाने रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक, मानसिक तसेच आर्थिक हानीला सामोरे जावे लागते.
स्मृतीभ्रंश हा असा आजार आहे ज्यात व्यक्तीच्या मानसिक व बौद्धिक क्षमतांचा उत्तरोत्तर अधिकाधिक ऱ्हास होत जातो आणि त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन कामावर विपरित परिणाम होतो.
नेमका काय आहे हा आजार? काय आहेत याची लक्षणे? काय आहेत यावरील उपचार? समजून घेऊ या लेखाद्वारे…
स्मृतीभ्रंशाची लक्षणे :
१. विसर पडणे. विशेषत: नवीन गोष्टींचा विसर पडतो, सुरुवातीला जुन्या गोष्टी चांगल्या आठवतात.
२. वारंवार त्याच गोष्टी विचारणे.
३. अव्यवस्थितपणा.
४. दैनंदिन कामकाज करण्यास वेळ लागणे, त्यात चुका होणे.
५. एकटे बसणे, बोलणे कमी होणे.
६. विचारांची जुळवाजुळव करण्यात अडचण (विचार, दारिद्रय).
७. अचानक भावस्थितीत बदल होणे, चिडचिड करणे,
८. रस्ता विसरणे.
९. स्थळ, काळाचे भान न रहाणे.
१०. काही रुग्णांमध्ये भ्रम व भास होणे अशी लक्षणे असू शकतात.
११. सर्वात शेवटी स्वतःची देखभाल करणेही अवघड होणे, (उदा.जेवण करणे,कपडे बदलणे इ.).
वाढत्या वयाबरोबर या आजाराची शक्यता वाढते. त्यामुळे त्यांच्यात आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते. स्मृतीभ्रंश हा एकच आजार नसून मेंदूचा कोणत्या भागातील मज्जापेशींमध्ये बिघाड झाला आहे, यावर त्याची लक्षणे व प्रकार अवलंबून आहेत.
सगळ्यात जास्त आढळून येणारा प्रकार म्हणजे अल्झायमर्स. स्मृतीभ्रंशाने ग्रस्त रुग्णांमध्ये सुमारे 70 टक्के रुग्ण अल्झायमर्स आजाराने पीडित आहेत. काही आजारांमध्ये रुग्णांमध्ये स्मृतीभ्रंशाप्रमाणे बौद्धिक क्षमता खालावू शकतात. पण योग्य उपचाराने त्या पुन्हा पूर्ववत होतात. अशा आजारांचे वेळीच निदान व उपचार करणे आवश्यक आहे. यात पुढील आजारांचा समावेश होतो.
डिप्रेशन,
अतिमद्यपान,
थायरॉईड वा ग्रंथीच्या स्त्रवात कमतरता,
डोक्याला मार लागणे इत्यादी.
स्मृतीभ्रंशाची कारणे :
स्मृतीभ्रंशाचे मूळ कारण अजूनही संशोधकांना सापडले नाही. परंतु वाढत्या वयाबरोबर या आजाराची शक्यता वाढते. प्रदीर्घ काळ मधुमेह व उच्च रक्तदाब, हायपो थायरॉडिझम यावर नियंत्रण नसल्यासही तसेच अति मद्यपानानेही हा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
औषधोपचार :
स्मृतीभ्रंश हा पूर्णपणे बरा होणारा आजार नाही. उत्तरोत्तर रुग्णाची परिस्थिती खालावत जाते. परंतु उपलब्ध औषधोपचाराने आपण बौद्धिक क्षमतांचा ऱ्हासाचा वेग काही प्रमाणात थांबू शकतो. स्मृतीभ्रंशाच्या काही भावनिक लक्षणांवर (उदा.चिडचिडपणा, भास, भ्रम, अव्यवस्था, उदासीनता इ.) उपचार होऊ शकतो व त्यामुळे रुग्णांना सांभाळण्यास मदत होऊ शकते.
स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची काळजी घेताना :
आपल्या जवळच्या व्यक्तीस स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, हे कळल्यावर मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. रुग्णाची नक्की कशी काळजी घ्यावी, त्याच्याशी कसा संवाद साधावा, हे घरच्यांना समजत नाही. त्यामुळे घरात चिंताजनक व तणावपूर्ण वातावरण निर्माण होते.
रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा संपूर्ण दिनक्रम रुग्णाच्या भोवती फिरू लागतो. कधी कधी रुग्णाची तब्बेत सांभाळताना, स्वतःच्या तब्बेतीकडे, इच्छा-आकांक्षाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे फायदा तर होत नाहीच उलट नवीन प्रश्न निर्माण होतात.
स्मृतीभ्रंश असणाऱ्या व्यक्तीची काळजी घेताना काळजी घेणाऱ्या व्यक्तीने पुढील गोष्टी अंमलात आणाव्यात :
स्वतःसाठी वेळ काढावा, छंद जोपासावा, व्यायाम करावा,
स्वत:च्या दैनंदिन कामासाठी नित्यक्रम करावा,
रोजचा दिवस नवीन दिवस म्हणून पहावा,
लक्षात ठेवा हा आजार बरा न होणारा आहे आणि तुम्ही पण तुमच्या रुग्णाची योग्य काळजी घेत आहात,
डॉक्टरांना नियमित भेट द्या. रुग्णाच्या लक्षणांची त्याच्या वर्तनातील बदलांची संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्या.
काय सांगायचे ते लिहून ठेवल्यास आपले म्हणणे व्यवस्थितरित्या मांडता येते,
डॉक्टरांकडे जाताना रुग्णाबरोबर दोन व्यक्ती असाव्यात, (एक रुग्णाची काळजी घेण्यास व दुसरी डॉक्टरांना माहिती देण्यास), जास्तीचे कपडे व खाण्यास घेऊन जा.
औषध व बाकीच्या उपचाराबद्दल समजून घ्या,
भविष्याची काळजी करू नये.
रुग्णांशी संवाद साधताना :
स्मृतीभ्रंश असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधणे कौशल्याचे काम आहे. या आजारात रुग्णाची स्मरणशक्ती, विचार करणे, शब्दांची जुळवाजुळव करणे, रचना करणे यावर गदा येऊ शकते. त्याचबरोबर रुग्णाची ऐकण्याची क्षमता कमी झाल्यानेही त्याच्याशी संवाद साधणे थोडे अवघड होऊ शकते, अशा वेळी खालील गोष्टींचा अवलंब करावा-
सोपे शब्द व छोट्या वाक्य रचनेचा वापर करा,
हळूहळू व शब्द स्पष्ट बोला,
स्पर्श व हावभावांचा संवादासाठी वापर करा,
शांत व संयमी राहा,
खूप प्रश्न विचारू नका,
शक्य तिथे विचारण्याऐवजी माहिती द्या,
रुग्णांना लहान मुलांसारखे वागवू /बोलू नका,
लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा,
रुग्णांचे म्हणणे ऐकण्यास पुरेसा वेळ द्या,
संवादासाठी फळा-चित्रांचा वापर करणे.
दैनंदिन स्वच्छता :
• आंघोळीची वेळ ठरवून ती पाळा,
• रुग्णास काय करायचे ते सोप्या शब्दात सांगा,
• रुग्णास बाथरूममध्ये एकटे सोडू नये,
• रुग्णास स्वतः कपडे घालण्यास प्रोत्साहन द्या,
• कपडे घालण्याचा क्रम ठरवून घ्या.
आहार :
या आजारात रुग्णाच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. काही रुग्ण जेवण्यास तयार नसतात, तर काही दिवसभर खा-खा करतात. अशा वेळी…
जेवणाची वेळ ठेवा व ती पाळा,
रुग्णांना खाण्याच्या पदार्थाचे पर्याय देणे,
दिवसभरात भरपूर पाणी पिण्यास द्यावे,
दातांची/हिरडयांची नियमित स्वच्छता व काळजी घ्यावी,
एक वेळी थोडे खाण्यास द्यावे व दिवसातून तीन ते सहा वेळा खाण्यास द्यावे,
खाताना खोकला येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
व्यायाम :
o रोज थोडा वेळ यासाठी राखून ठेवावा,
o सोपे व्यायाम करणे,
o चालणे दररोज तीस मिनिटे, यासाठी प्रोत्साहन देणे
o तसेच व्यायाम पूर्ण केल्यानंतरच स्तुती करणे,
o घरातील छोटी कामे, बागकाम यामध्ये रुग्णाला मदतीस घेतल्यास पुरेसा वेळ देऊ शकतो, फार व्यायाम/थकणे टाळणे.
शौचाचे व्यवस्थापन :
मलमूत्र विसर्जनाचा ताबा सुटणे व कपडे खराब होणे, याचा रुग्णास व नातेवाईकांना त्रास होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी…
दर तीन तासांनी रुग्णाला बाथरुमला नेऊन आणणे,
बैचन होणे, कपडे ओढणे अशा रुग्णाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे,
घरामध्ये संडास, बाथरूमची दिशा दाखविणारी चिन्हे लावा, (रुग्णांना संडासच्या दिशेने विसर पडू शकतो),
रुग्णाला सैल व सुटसुटीत कपडे घालावे.
काही सुरक्षिततेच्या सूचना :
• औषधावर नावे लिहून कपाटात रुग्णांच्या हाताला येणार नाहीत असे ठेवा,
• फर्निचर कमी ठेवा,
• घरात बाहेर पुरेसा उजेड ठेवा,
• संडास बाथरूमला आतून बाहेरून कडी,कुलूप नकोत,
• स्वयंपाक घरात रुग्ण गेल्यास त्याच्यावर लक्ष ठेवा,
• गॅस बंद केला आहे का याची खात्री करा,
• एका वहीत रुग्णाची सर्व माहिती, त्याच्या सवयी, दैनंदिन नित्यक्रम, जेवणाच्या वेळा, औषध याबद्दल लिहून ठेवावे (अचानक नवीन व्यक्तीची मदत घेताना या वहीचा उपयोग होतो),
• घरातील व्यक्तीचे फोन नंबर, डॉक्टरांचा फोन नंबर दिसतील अशा ठिकाणी चिटकवावा,
• रुग्णांच्या गळ्यात ओळखपत्र घालावे, ज्यात रुग्णाचे पूर्ण नाव, पत्ता, घरच्यांचा फोन नंबर असावा.
निरोगी वृद्धापकाळासाठी :
दैनंदिन जीवनात खालील आरोग्यदायी सवयींनी स्मृतीभ्रंश टाळता येऊ शकतो. तसेच वृद्धावस्था अधिक सुखकर करता येऊ शकतो.
सकस व पूरक आहार,
वजनाचे व्यवस्थापन,
नियमित व्यायाम,
उच्च रक्तदाब व मधुमेहावर नियंत्रण,
दारू, तंबाखू व इतर व्यसनापासून दूर राहणे,
नियमित आरोग्याची तपासणी करून घेणे,
छंद जोपासणे (लेखन,वाचन, बागकाम यासारख्या कामात मन रमविणे),
सामाजिक तसेच कौटुंबिक समारंभात भाग घेणे,
दैनंदिन कामाचे नियोजन करणे तसेच गरज वाटल्यास नि:संकोचपणे इतरांची मदत घेणे,
कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद करणे,
नातेवाईक मित्रमंडळींच्या संपर्कात राहणे.
या आजाराविषयी तसेच उपचाराविषयी अधिक माहितीकरिता ओपीडी क्र.22, मानसोपचार विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग – रायगड या ठिकाणी प्रत्यक्ष तसेच टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधता येईल. जिल्हा रुग्णालय, अलिबाग-रायगड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने व अतिरिक्त् जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अमोल बाळासाहेब भुसारे व डॉ.अर्चना राजेशकुमार सिंह हे या विभागासाठी कार्यरत असून ते गरजू रुग्णांना उत्तम सेवा देत आहेत.
– लेखन : मनोज शिवाजी सानप
(जिल्हा माहिती अधिकारी)
रायगड-अलिबाग.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.