मुंबई दिल्ली ट्रेनने चांगलाच वेग पकडला होता. जसजसा गाडीचा वेग वाढत होता, तसतसा त्या दोघींच्या मनातील विचारांचा वेगही वाढत होता. योगायोगाने त्या दोघींना शेजारच्या सीट मिळाल्या होत्या. रेल्वे प्रवास म्हणजे अनोळखी लोकांचा सहवास, लांबचा प्रवास !
अंगावर उत्तम साडया, मोजके पण नवे कोरे दागिने, हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र ज्याच्या वाट्या उलटया होत्या ! एकंदर पेहरावावरुन दोघीही नवविवाहित होत्या हे उघड दिसत होते.
एक बडबडी- तिला अर्ध्या तासापेक्षा जास्त गप्प बसवेना. तिरक्या नजरेने ती शेजारच्या मुलीकडे बघत होती. बोलू की नको हया विचारात. दुसरी नवविवाहित असून शांत, अबोल, उदास दिसत होती. पहिलीच्या मनात उगीच शंका ! मनाविरुद्ध लग्न झाले की काय ?
२४ तास अबोल प्रवास म्हणजे शिक्षाच. अखेर न राहवून तिने बोलायला सुरुवात केलीच .
“दिल्लीला निघालात वाटते !”
” हं ! “
ती फक्त हं इतकेच बोलत होती. पहिली विचारत होती,
” नवीन लग्न झालेले दिसते. “
” हं !”
तिने काही न विचारताही पहिली बोलत राहिली,
” आमचे पण नवीनच लग्न झाले. महिना पण झाला नाही, हा बघा अजून हिरवा चुडा, उलटे मंगळसूत्र तसेच आहे. तुमचे पण तसेच दिसते आहे. माझे पती स्टेशनवर घ्यायला येणार म्हणून मी खूप उत्साहित झाले आहे. ते सैन्यात अधिकारी आहेत. राजबिंडे, उमदे. आमचे लग्न झाले आणि युद्धाची घोषणा झाली. मधुचंद्रावरून ते तसेच घाईने सरहद्दीवर गेले. “
आपण एकटेच बडबडत आहोत हे आता तिच्या लक्षात आले.
“तुमचे पती पण स्टेशनवर येणार असतील. “
” नाही “. ते सुद्धा सैन्यात अधिकारी होते. असेच तातडीने युध्दावर रुजू झाले होते. दोन दि.पूर्वी आर्मी हेडक्वार्टरचा टेलिग्राम आला. ” ” तुमचे पती धारातीर्थी पडले आहेत. दिल्लीला प्रत्यक्ष येऊन, ओळख पटवून, बॉडी ताब्यात घ्यावी. पायाखाली सुरूंग फुटल्यामुळे, शरीराच्या चिंधड्या झाल्या आहेत. बॉडी फक्त फोटो वरुन ओळखावी लागेल. “
सासू सासरे वयोवृद्ध आहेत म्हणून मी च बॉडी घ्यायला जात आहे. ”
पहिलीची प्रश्नार्थक नजर कुंकू, मंगळसूत्राकडे जाताच तिने स्वतःच सांगितले,
” माझा पती देशासाठी शहीद झाला. त्यामुळे तो ह्या जगात नाव रुपाने जिवंतच आहे. त्याच्या हया आठवणी मी कायम बाळगणार आहे. “
ती गप्प झाली. पहिली मात्र तिला मिठी मारुन ढसढसा रडू लागली.
— लेखिका : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800