Wednesday, September 17, 2025
Homeलेख"वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे"

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे”

यूनोतर्फे १९७१ सालापासून २१ मार्च हा दिवस “जागतिक वनदिन” म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने हा विशेष लेख…

“उमेदीत दिले मी पुष्प, फुले अन विशाल छाया
निस्पर्ण आज जाहलो जरी, सेवाधर्म न त्यागला
हे मानवा माझा देह सदेहे अर्पण तुला
माझ्याच सहकार्ये होऊ दे तुझी उत्तरक्रिया”

हे मनोगत आहे वृक्षांचे. जे वृक्ष उमेदित फळे, फुले, सावली तर देतातच परंतु जेंव्हा ही झाडे वाळतात तेव्हां मानवाला अंत्यसंस्कारासाठी साथ देऊन स्वतःचे आस्तित्व संपवतात.
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे” असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे ते खरेच आहे. वृक्षवेली हे आपले सगेसोयरे आहेत.

वृक्ष हे सज्जनाप्रमाणे परोपकारी आहेत. मानवी जीवनाचा आधार आहेत. उमेदीत हे वृक्ष मानवाला पुष्प, फुले, सावली तर देतातच परंतु जरी निस्पर्ण झाले तरी ते सेवाधर्म सोडत नाहीत. ते मानवासाठी आपला देहसुद्धा अर्पण करतात व मानवाला त्याच्या उत्तरक्रियेत सुद्धा साथ देतात. वृक्ष हे मानवाप्रमाणे प्राणी-पक्षी यांचेही मित्र आहेत. ते स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्याना सावली देतात. फळे देतात तसेच सुगंध देतात.

वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करतात. वृक्ष स्वतः आपले अन्न तयार करतात. अन्नाचा उपयोग मनुष्याला होत असतो. झाडे दिवसा हवेतील कार्बनडाय ऑक्साइड घेऊन मनुष्याला आवश्यक असणारा प्राणवायु हवेत सोडतात. रात्री या उलट क्रिया करतात. एक वडाचे झाड दररोज दोन टन पाणी हवेत सोडते. पन्नास वर्षाचे एक मोठे झाड पन्नास वर्षात वीस लाख रुपयांचे जीवनावश्यक पदार्थ मानवाला देते. शिवाय जमिनीची धूप थांबवते. पाऊस पडण्यास मदत करून जमिनीत पाणी मुरवण्यास मदत करण्याचे काम वृक्ष करतात. हवेचे, पाण्याचे, ध्वनीचे प्रदूषण नियंत्रित करण्यास वनस्पती सक्षम आहेत. धूळ, धूर, कार्बन यासारखे कणरूप पदार्थ वनस्पती शोषून घेतात. ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासही वनस्पती सहाय्य करतात. ध्वनी लहरींमध्ये अडथळा अडथळा निर्माण होऊन ध्वनीचे आघात वनस्पती स्वतः सहन करतात. त्याचबरोबर तापमान नियमन करणे ईत्यादी महत्वाची कामे वनस्पती करतात.

मानवाचे आरोग्य वाढविण्यासाठी सुद्धा अनेक वनस्पती उपयोगी ठरतात. आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्यासाठी वनस्पती वरदान ठरते. भूगर्भातील खनिजांचा शोध लावण्यास तेथे वाढणार्या वनस्पती सहाय्यभूत ठरतात. पाण्याचा साठा कोठे आहे हे दाखवण्याचे कामही वनस्पती करतात.

वनस्पती मानवाला आद्यौगिक क्षेत्रातही मदत करतात. फुलांच्या पाकळ्यापासून सुगंध काढण्यासाठी गुलाब, चमेली, रातराणी ई .चा उपयोग होतो. धार्मिक कार्यात तर वनस्पतींचा मानवाला फारच उपयोग होतो. प्रत्येक शुभ अथवा अशुभ कार्याला वनस्पतींचा वापर केला जातो.

वाड्मयातसुद्धा वनस्पती, वृक्ष, पाने, फुले म्हणजे जणू. काव्याचे अथवा साहित्याचे उगमस्थान वाटावे इतक्या प्रमाणात उल्लेख आढळतो. अशा तर्हेने वृक्ष अथवा वनस्पती हे मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मानवा प्रमाणे मानव ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा पशुपक्षांना सुद्धा वृक्ष वेली सहाय्य करतात. म्हणूनच वृक्षांना मानवाचा तारणहार म्हटले जाते. परंतु मानव आपल्या हया उपकारकर्त्याचे उपकार विसरला आहे. दैनंदिन उपयोगासाठी राजरोस वृक्षतोड होत आहे. त्यास वेळीच पायबंद घातला पाहिजे.

खरं तर आपण नियमितपणे वृक्षारोपण केले पाहिजे. आंबा, जांभूळ इत्यादि फळे खाल्यावर त्याच्या बिया कचऱ्यात न टाकता त्या वाळवून मोकळ्या मैदानाच्या कडेला, नदीकिनारी, मोकळ्या टेकड्या, डोंगर ईत्यादि ठिकाणी खड्डे खणून लावावेत. बिया पक्षी खाण्याची शक्यता असली तर शेणाच्या अथवा मातीच्या गोळ्यांत बिया भरून डोंगरावर टाकाव्यात. प्रत्येकाने असे केले तर सर्व उघडे बोडके डोंगर, नदी किनारे हिरवेगार दिसतील यात शंकाच नाही.

वट पौर्णिमेला लग्न झालेल्या सर्व महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. ती झाल्यानंतर प्रत्येकीने एक झाड लावले व जगवले तर त्यांच्या पतीराजासह सर्वाना दिर्घायुष्य लाभेल.

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावोगावी ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते. तीन दिवसा पासून सात दिवसा पर्यंत ज्ञानेश्वरीचे पारायण केले जाते ते योग्य आहे परंतु श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाण्याचे आणि वनांचे महत्व सांगताना “जलाशये निर्मावी। महावनेलावावी” असा संदेश दिला आहे.

गावकऱ्यांनी फक्त ज्ञानेश्वरी वाचू नये तर एक दिवस सर्वांनी श्रमदान करून ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवली तर निसर्ग संवर्धन तर होईलच परंतु ज्ञानेश्वरी पारायणाचे सार्थक होईल.

यूनोतर्फे १९७१ सालापासून २१ मार्च हा दिवस “जागतिक वनदिन” म्हणून साजरा केला जातो. तरीसुध्दा अद्याप भारतात वनांची दैना झालेली दिसत आहे.

अनेक ठिकाणी “अभयारण्य ” उभारली आहेत परंतु तेथे झाडांना अभय असेल याची खात्री देता येत नाही. ज्या झाडांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होते हे सर्वज्ञात आहे तरी धरण बांधताना अनेक झाडे तोडली जातात.
सर्व भारतीयांनी एक घोषवाक्य लक्षात ठेवले पाहिजे की “कराल वनांचे रक्षण तरच तुम्हांला दिसतील सुखाचे क्षण”

दिलीप गडकरी

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. वन दिन माहिती खूप छान…आणि लेखाबारोबर चित्र पण खूप अप्रतिम होती..

  2. वृक्षवल्ली लेख तर सुंदरच आहे पण लेखासोबत जोडलेल्या सुंदर छायाचित्रांनी लेख हिरवागार केला..मस्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं