सायंकाळचे आल्हाददायी वातावरणात सादर होणाऱ्या एकाहून एक शास्त्रीय रागदारी संगीत आणि त्यानंतर सादर झालेली कर्नाटक शैलीतील गीत प्रकारांनी नटलेल्या धारवाडचे ग्वालियर किराणा मिश्रित घराणा परंपरेचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित डॉ व्यंकटेश कुमार यांच्या सुश्राव्य मैफिलीचे आयोजन रविवारी उत्कर्ष मंडळ ठाणे आणि evenings weaves यांच्या संयुक्तविद्यमाने करण्यात आले होते.
व्यंकटेश कुमार यांनी कार्यक्रमाची सुरुवात राग मारवा मधील पिया मोरे अनत देस आणि मोरा रे तुम्ही संग या बंदिशीने केली. विशेष मारवा रागासारखा राग मैफलीत सुरुवातीला ऐकायला सहसा मिळत नाही. त्यानंतर राग हमीर मधील चमेली फुली चंपा आणि धीट लंगरवा या प्रसिध्द बंदिशी सादर केल्या आणि त्यानंतर गौड मल्हार रागातील काहे हो आणि बलमा बहार आयी या बंदिशी अतिशय दमदार सादर करून मैफिल जिंकली आणि बसंत मधील फगवा ब्रीज देखन को चलो री आणि पशुपती गिरीजा आणि दुर्गा रागातील डॉ प्रभा अत्रे यांची रचना असलेली माता भवानी ही बंदिश रसिकांच्या आग्रहाखातर सादर केली. प्रत्येक रागाच्या बंदिशीच्या अनुषंगाने त्यांच्या गायकीतून येणारी सुमधुर आलाप, तानांची बढत, आकर्षक लयदारयुक्त सरगम मांडणी आणि बंदिशीच्या लयीप्रमाणे येणारे स्पष्ट उच्चार आणि त्यानंतर ये ग ये ग विठाबाई मराठी अभंग, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे भजनाचे प्रकार सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. तसेच त्यांच्या भजन सादरीकरणात गदंग येथील वारकरी संप्रदायाचा प्रभाव त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

तबल्यावर मंदार पुराणिक आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर या दोन्ही सहकलावंतांनी प्रत्येक सादरीकरणाला साजेशी मनमोहक साथ संगत करून रंगमंच सजवला. शिवराजजी पाटील आणि कैवल्यजी पाटील यांनी तानपुरा साथ संगत केली. सुप्रसिद्ध गायक, नट मुकुंद मराठे यांनी यावेळी निवेदनातून वेगवेगळे अनुभव सांगितले आणि आपल्या खुमासदार शैलीत त्यांनी पंडितजींची ओळख करून दिली.

तसेच उमेश पांचाळ यांनी पंडित वेंकटेश कुमार यांची सुंदर सुबक अशी रांगोळी काढली होती. त्यावर सूर संगत राग विद्या लिहिले होते.कार्यक्रमाचा शेवट त्यांनी वचन आणि संत पुरणदास यांच्या शरणू सकल धारा या भैरवीने केला.
गायन सादरीकरणाबरोबर प्रसिद्धीच्या मागे जाण्यापेक्षा तयारी वर भर द्या आणि स्वतः वर मेहनत घ्या इत्यादी विचार पंडितजींनी मांडले.
अशा मैफली सगळीकडे रंगल्या तर नक्कीच नव्या पिढीला काहीतरी वेगळं आणि दिशादर्शक मिळू शकेल.

— लेखन : सिद्धी पटवर्धन. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800