पर्यावरण म्हणजे केवळ दूरच्या डोंगर, दऱ्या,निसर्गच नव्हे.तर आपलं घर, परिसर, गावही पर्यावरण स्नेही असेल तर जीवन किती सुंदर, सुगंधी होऊ शकतं हे दाखवून दिलंय अमेरिकेतील न्यू जर्सी येथील कर्करोग संशोधक डॉ सुलोचना गवांदे यांनी. वाचू या….त्यांचे स्वानुभव त्यांच्याच शब्दांत पर्यावरण दिनाच्या निमित्ताने……..
इथे न्यू जर्सी मध्ये ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान पटापट खाली जायला लागते आणि अचानक एक दिवस शून्यापर्यंत (म्हणजे फॅरनहाईटचे ३२) घसरते. त्याआधी लक्ष ठेऊन उन्हाळ्यात बाहेर ठेवलेली सर्व झाडं आत आणावी लागतात. फांद्या छाटून, कुंड्या बाहेरून धुऊन मग घरभर छान सूर्यप्रकाश येईल अशा जागा शोधायच्या आणि तिथे नीट ठेवायच्या हा दर वर्षीचा उद्योग. खूप उपद्व्याप होतो खरा पण माझ्या सारख्या फुलवेडीला मायदेशीची फुलझाडं म्हणजे अपार आनंदाचा ठेवा वाटतो.
या वर्षी हे स्थलांतर वेळेवर पार पडले आणि थोड्याच दिवसात सगळी झाडे आपापल्या नवीन जागेत पुन्हा तजेलदार दिसू लागली. ऋतू बदलला, दिवस लहान झाला आणि कडक हिवाळा सुरु झाला. आता सकाळची बोचरी थंडी दुलईची ऊब सोडू देत नव्हती त्यामुळे उठायला जरा उशीरच झाला होता. अंगावर शाल लपेटून मी खाली जाण्यासाठी खोलीतून पाऊल बाहेर टाकले आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखी जागीच थबकले. त्या क्षणी जणू काळ वेळ स्थळ यांचे सगळे संदर्भ गळून पडले.
अमेरिकेत राहणाऱ्या एका प्रौढ स्त्रीच्या जागी मी दादरमध्ये हिंडणारी तरुण मुलगी झाले. गाड्यांचा आणि फेरीवाल्यांचा कोलाहल, धूळ आणि उकाड्याने कासावीस झालेला जीव, आणि या सर्वातून खुणावणारा तो मोहक धुंद सुवास. मी कोपऱ्यावरच्या आजींकडून चमेलीचा गजरा घ्यायला धावत होते. आणि तोच तो ओळखीचा गंध आज इतक्या तपानंतर या दूर देशात माझ्या भेटीला आला होता.
मी नवीन लावलेल्या चमेलीच्या वेलावर सकाळच्या सोनेरी किरणात दोन इटुकली फुले फुलली होती. बाहेर अंगणात साचलेल्या बर्फासारखीच शुभ्र पण तशी गार आणि गंधहीन नाहीत तर नाजूक रसरशीत पाकळ्यात अत्तराची कुपी सांभाळणारी.
खरं म्हटलं तर या देशातील हवा माती इथे चमेलीने रुजावे , बहरावे अशी नाही. इथे जागोजागी भेटते लिली . कितीतरी रंगात आणि स्वरूपात. या लिलीच्या फुलांचं पहिलं दर्शन होतं मार्चमधल्या ईस्टरच्या सणाच्या वेळी. अजून वृक्षांच्या मूळांशी बर्फाची शुभ्र महिरप असते आणि निष्पर्ण फांद्यांवर लालसर कळ्यांचा फुगवटा जेमतेम जाणवू लागतो तेव्हा हिमधवल पांढऱ्या लिलीच्या रोपांनी सर्व दुकानं भरून जातात. या फुलांचा मंद सुवास हिवाळा संपल्याची सर्वप्रथम ग्वाही देतात. नंतरच्या ऋतूत हे लिलीचे पुष्प केशरी पिवळा निळा जांभळा असे अनेक रंग घेऊन सामोरे येते आणि मन प्रसन्न करते. मला मात्र उणीव वाटते की ही फुले गुंफून केसात माळता येत नाहीत.
परदेशातून आलेली माझी चमेलीची वेल सुरुवातीला कोमेजली पण नंतर बाजूला वाढणाऱ्या लिलीच्या सान्निध्यात रमली. आणि इकडच्या वातावरणाशी जमवून घेत वाढली सुद्धा. इथल्या वादळी पावसाच्या जोराने शहारली खरी परंतु त्याच वाऱ्याच्या झोतावर झोके घेत हसायला शिकली. विशेष म्हणजे या सगळ्या बदलातून चमेलीने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं. त्या चिमुकल्या गुलाबी पांढऱ्या फुलातील विलक्षण सुगंधाचं देणं तिने असोशीने सांभाळलं व जीवापाड जपलं.
हजारो योजने दूर नव्या जागी हे रोप आणलं आणि ते फुललं देखील. कधीतरी वाटते की या चमेलीची मूळे इकडे रुजली तरी मूळ देशाला विसरली नसतील. धीर गंभीर वड व सळसळणारा पिंपळ तिला अजूनही स्वप्नात सावरत असेल. गोंडस मोगरा, नाजूक जाई-जुई, मादक सुरंगी तिला खेळायला बोलवत असतील.
अशा आठवणी सरत नाहीत तर जीवनाचा पाया घडवतात. ते जुने अनुभव सहवास संबंध सगळे काही नवीन अस्तित्वाचा भाग बनून मनाच्या कोपऱ्यात लपून बसले तरी कधीतरी असेच अचानक समोर येऊन उभे राहतात. तेव्हा भावना अशा भरून येतात की त्या पूरात मधला काळ वाहून जातो. वर्तमान भूतकाळात हरवून जातो. पुन्हा जाण आल्यावर खंत वाटत नाही उलट पुनर्भूतीच्या स्पर्शाने मन मोहोरून येते. त्या धुंदीतच वेडी चमेली फुलत राहते आणि सुगंधाचे देणे उधळत जाते.

– लेखिका : डाॅ सुलोचना गवांदे.
– संपादक: देवेंद्र भुजबळ. 9869484800
मनःपूर्वक धन्यवाद.
मन सुगंधित करणारा सुंदर लेख