अशा श्रावणाच्या धारा अशा श्रावणाच्या धारा
झुळू झुळू वाहतसे सोबतीला गार वारा
झड श्रावणी लागते बांध बांध फुलारतो
परकरातली जवार नऊवारीत आणतो…
शालू हिरवागार तो बांधावर मुरकते
पोघ्यातले कणिस ते वाऱ्यावर लहरते
अशी चावळते वारा तिच्या चहाड्या करतो
गंध घेऊन तो जातो दुनियेला वेडावतो ..
अशी पाखरे भर्रारा चहूकडे चोची चोची
सारे करून टाकती जवानीत तिची गोची
गुजगोष्टी करते ती चवळी तुरीशी बोलते
तिला पाहून कपाशी, बोंडे तिची ही डोलती…
भाऊ मचाणावरती तिची राखण करतो
हाती घेऊन गोफण सारे पक्षी पळवितो
सारं शिवार डोलतं वाऱ्यावर लहरतं
ज्वारी बाजरी कपाशी आणि मका गणगोत …
श्रावणातली ती झडी फुला फुलावर भुंगे
ऊन पडताच पहा वर इंद्रधनू रंगे
क्षिताजावर सांडती रंगबिरंगी ते घडे
ऊन पडता रवीचे पहा धावतात घोडे …
पाचू च्या त्या रानात हो दवबिंदू हासतात
झुले झुलती आंब्यात लेकीबाळी खेळतात
त्यांचे उडती पदर बटा रूळतात गाली
अशी मजा मजा पहा सर सळसळ आली …

– रचना : प्रा. सौ. सुमती पवार