बाल मनास खाऊ पुरवून त्याचं मन सशक्त व्हावं यासाठी बाल्यावस्था, कौमार्य अवस्थेतील मुलांचे मन दत्तक घेऊन कार्य करण्याचं अगळं वेगळं काम डॉ.राणी दुष्यंत खेडीकर या करीत आहेत……
बहु आयामी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.राणी दुष्यंत खेडीकर. सामाजिक जाणीव असणं आणि ती जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणं, ही त्यांची ओळख आहे.
अनेक गुण वैशिष्ट्यांची सुरेख किनार लाभलेल्या डॉ.राणी यांनी समाजकार्य आणि बाल मानसशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.
डॉ. सौ राणी यांनी ‘वेश्या व्यवसाय करणाऱ्या मातांच्या अपत्यांचा कौटुंबिक, सामाजीक, मानसिक, आरोग्या संबधी अभ्यास या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली आहे. या विषया वर आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अभ्यासक आहेत.
भावी पिढीचा एक महत्वाचा आणि तरीही दुर्लक्षित असा घटक म्हणजे वेश्या मातांची मुलं. भयाण वातावरणात जन्म घेणारी ही निष्पाप मुलं आपलं बालपण अत्यंत असुरक्षित अशा वस्तीत व्यतीत करीत आहेत आणि बालहक्काच्या मूलभूत गोष्टी देखील या बालकांना उपलब्ध होत नाही.
आपल्या या समाजात अशी दुर्लक्षित आणि असुरक्षित आयुष्य जगणारी मुलं आहेत, आणि त्यांना देखील सामान्य प्रवाहात येण्याचे स्वप्न आणि इच्छा आहे याची जाणीव असणं गरजेचं आहे. कारण पुढे याच पिढीचा सकारात्मक आणि सक्षम विचारांच्या पायावर समाजात समान संधी व सामान न्यायाची बांधणी करू शकणार आणि या दुर्लक्षित बालकांना समाजाच्या सामान्य प्रवाहात त्यांना त्यांची जागा निर्माण करण्यास मदत होऊ शकणार आहे.
या निष्पाप बाळांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सामान्य जीवन जगता यावं आणि त्यांचं होरपळलेलं बालपण सुरक्षित होऊन एक सक्षम नवीन पिढी निर्माण व्हावी. अशा सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या कार्या द्वारे डॉ राणी यांनी केली आहे
तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘लाल दिव्याच्या वस्तीवरच्या सत्यकथा‘ यावर लवकरच डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शित होणार आहे. डॉ.राणी अनेक पुरस्कारांनी सम्मानीत आहेत.
रोटरी क्लब सन्मान पुरस्कार,
महाराष्ट्र लक्षवेधी पुरस्कार,
कमलताई होस्पेट पुरस्कार इत्यादी.
पालकत्व या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात त्या कार्यशाळा घेत असतात. अनेक सामाजिक संस्थाच्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यातील काही प्रमुख संस्था पुढीलप्रमाणे आहेत.
अध्यक्षा – बालरक्षक प्रतिष्ठान,
सूर इन्स्टिटयूट ऑफ करीयर डेव्हलपमेंट फाऊंडेशन – नागपूर
आम्रपाली सेवा संघ – नागपूर
पणती सामाजिक संस्था – गडचिरोली
सत्कर्म बालक आश्रम – बदलापूर
रोटरी क्लब – मुलुंड
त्यांची मराठी व इंग्रजी मध्ये E book प्रकाशित झाले आहेत. वृत्तपत्र, मासिक या माध्यमातून त्यांनी प्रभावी लेखन केलं आहे. तसेच त्यांचा संशोधन विषय, “रेड झोन मधील माता आणि त्यांची अपत्ये” त्यांचा
मानसिक, सामाजिक दृष्टीने अभ्यास” यातील वीस लेखांचं सदर ‘रयतेचा वाली‘ या अत्यंत दर्जेदार, उत्कृष्ट शैक्षणिक दैनिकात प्रकाशित झालं आहे.
त्या काव्य लेखन देखील करतात. त्यांच्या हजाराच्या वर चारोळ्या व कविता प्रकाशित झाल्या आहेत. वास्तुशास्त्र या विषयावर त्यांनी डिप्लोमा केला आहे, तसेच त्यावर त्या यशस्वी कार्य करत आहेत. पाककला व संतुलित आहार संबंधी त्या व्याख्यान देत असतात. कला, लिखाण असो वा संशोधन कार्य अथवा समाज कार्य अनेक क्षेत्रात डॉ.राणी यांनी आपली यशस्वी छाप उमटवली आहे.
रेड झोन माता आणि त्यांची अपत्ये त्यांचा मानसिक, सामाजिक दृष्टीने अभ्यास करून हा गंभीर विषय संशोधनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कार्य करणाऱ्या डॉ राणी यांच कार्य खरंच अभिमास्पद आहे. यांच्या या कार्याला माझा सलाम.
बाल मानसशास्त्र या विषयात विशेष रुची आणि अभ्यास असल्यामुळे डॉ. राणी कुठल्याही समस्येशी झुंज देणार्या लहान मुलांसंबंधी कार्यात विशेष अग्रेसर असतात.
भावी पिढीचा एक मोठा हिस्सा म्हणजे बाल्यावस्थेतील मुलं, ही मुलं निराधार असो, कुटुंबात असो, वा असुरक्षित परिस्थितीत जगणारी मुलं असो, अनेक प्रकारच्या समस्या त्यांना नकळत स्पर्शून जातात, त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होत जातं आणि ही मुलं हळूहळू वाममार्गाला लागण्याची शक्यता बळावत जाते.
पालकत्व या विषयावर कार्यशाळा घेताना व पालक आणि मुलं यांच्या समस्यांचा अभ्यास व काऊंसेलींग करताना येणाऱ्या अनेक अनुभवांचा त्यांनी उल्लेख केला.
मुलं वास्तव नाकारून काल्पनिक विश्वात रमू लागली आहें, नव्हें तेच खरं समजू लागली आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस भयानक रूप घेतेय. पालकांना याची गंभीरता लक्षात घेणं खूप गरजेच आहे. मुलं का एकलकोंडी होतात ? कोणी पाहुणे आले की, त्यांच्याशी न बोलता आपल्या बंद खोलीत का जातात ?
चार माणसांशी बोलताना त्यांना अवघडल्या सारखं का होतं ? ते कायम एखाद्या वेगळ्याच विश्वात का वावरतात ? असे प्रश्न निर्माण झाल्यास पालकांनी पाल्याशी संवाद साधणं खूप आवश्यक आहे.
बाल्यावस्थेत असताना संपूर्ण जग मुलांना नवीन असतं. सगळ्याच गोष्टी विषयी कमालीचं कूतूहल असतं. त्यांना अनेक प्रश्न सतावतात. अडीच ते तीन वर्षांचं मुलं दिवसभरात तीनशे ते चारशे प्रश्न विचारात असतं. असा W H O चा अभ्यास सांगतो. मग इतक्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आपली तयारी असते का ?
प्रचंड गोंधळात मुलं मोठी होत जातात. पालक एकाच विचाराने प्रेरित असतात. आम्हाला जो त्रास भोगावा लागला तो मुलांना भोगावा लागू नये. परंतु त्यामुळे ते पाल्यांना पांगळे करत असतात. त्यांना भविष्यात येणाऱ्या गोष्टीसाठी तयार करण्या ऐवजी खोट्या चित्राचं आवरण रंगवत जातात.
मुलांना सुरक्षित ठेऊन, समस्येची झळ न पोहोचू देता त्याची खरी जाणीव देत सक्षम करत जाणं, ही पालकांची खरी भूमिका आहे हे ते विसरत जातात. आणि त्यांच्या या अट्टाहासामुळे मुलं मानसिक रित्या दुबळी होत जातात, अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं, असं त्या म्हणाल्या.
डॉ. राणी गेली बारा वर्षे मुलांच्या समस्यांचा अभ्यास व त्यावर अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. बाल्यावस्था, कौमार्य अवस्था या काळात मुलांच्या विचारांना विशिष्ट अशी दिशा मिळत असते आणि याच काळात त्यांना सत्य परिस्थिती अवगत करून देऊन एक सुदृढ वातावरण देणं गरजेचं असतं. नाहीतर मुलं चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात. कमी वयात घरून निघून जाणारी मुलं पुढे आपलं संपूर्ण आयुष्य असुरक्षित करतात.
या संदर्भात डॉ. राणी यांनी बाल्यावस्था, कौमार्य अवस्था या गटातील मुलं मानसिक रित्या सुदृढ राहावी आणि त्यांचं बालपण फुलत जाऊन ते एक सक्षम नागरिक म्हणून भावी पिढी घडवू शकतील यासाठी मुलांना मानसिक रित्या दत्तक घेऊन त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी कार्य सुरू केलं आहे. अगदी सुंदर अशी ही संकल्पना आहे. नागपूर, मुंबई येथील काही संस्थांच्या माध्यमातून त्या हे कार्य करीत आहेत. अनेक शाळाशी संपर्क साधून, कार्य शाळा घेऊन त्यांचं हे कार्य सुरू आहे.
बाल्यावस्थेतील मुलं हे भावी नागरिक आहेत. संपूर्ण समाज कुठल्या दिशेने जाणार आहे, याची चावी या मुलांच्या हातात आहे, म्हणून त्या समाजाची पाया भरणी कशी असावी यावर काम होणं नितांत गरजेचं आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि मानसिकरीत्या सदृढ होण्याच्या दृष्टीने मनाचा खाऊ पुरविण्याचं अत्यंत महत्त्वाचं असं काम डॉ.राणी यांनी हाती घेतलं आहे.
बालरक्षक प्रतिष्ठान या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. संस्थेचा मुख्य उद्देश कुठल्याही कारणाने शिक्षणा पासून वंचित असणाऱ्या शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवनाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं असा आहे. संपूर्ण भारतातून शिक्षक, शिक्षणप्रेमी या कार्याला जोडले गेले आहेत. शाळा बाह्य मुलांचे शैक्षणिक पालकत्व ही संस्था घेत आहे.
बालरोग तज्ञ, बाल मानसतज्ञ, शिक्षक, पालक या सगळ्यांच्या मदत आणि सहकार्याने हे कार्य सुरू आहे, आणि पुढे पण सातत्याने हे कार्य सुरू राहणार अशी सदिच्छा मी व्यक्त करतो
त्यांच्या या अत्यंत मोलाच्या कार्यात आपण सगळेच सामील होऊन भावी पिढीची मजबूत पायाभरणी करू या.

– लेखन : विलास कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
डाॅ, राणी खेडीकर फार मोठ्ठ समाजकार्य करत आहेत. त्यांना यांत भरघोस येवो. त्याची ओळख करून दिली, विलास कुलकर्णीना धन्यवाद
Salute to your Great work
थोर कार्य आहे आपले.
डॉ. राणी खेडीकर आपल्याला प्रणाम 🙏🏻
डॉ. राणी खेडीकर यांच्या या महान कार्याला सलाम.🌹🙏