Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यव्हॅलेंटाईन....

व्हॅलेंटाईन….

“अहो हे व्हैलेंटाईन व्हैलेंटाईन म्हणजे काय आहे ओ ?? परदेशातील सण आहे का ?? आठ दिवस असतो का ??” फरहीन पीठ मळता मळता आपल्या नवऱ्याला म्हणजे आबीदला विचारत होती. हे ऐकून बाहेरुन तिच्या मुलीचा हसण्याचा आवाज आला आणि ती किचनमध्ये आली आणि म्हणाली” अम्मी मेरी जान. काय यार जरा या किचनच्या बाहेर पण एक जग आहे. तिथे पण जरा डोकावत जा. अब्बू आता मी तर निघाले कॉलेजला तुम्ही तुमच्या बिवीजान ला सांगा काय असते व्हैलेंटाईन.” आणि जाता जाता तिने म्हणजेच रुबीनाने आपल्या अम्मीच्या गालावर पप्पी घेतली आणि काॅलेजला गेली.
“चल मी पण निघतो. डबा भरला का माझा. आज जरा लवकरच जायचे आहे विसरलोच मी तुला सांगायचे.” म्हणत आबिद आॅफिसला जाण्यासाठी तयार होऊ लागला.
फरहीन, आबिद आणि यांची मुलगी रुबीना यांचे तिघांचे सुखी कुटुंब. आबिदच्या आईचे निधन नुकतेच वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांचे वडील तर आबिद लहान असताना एका अपघातामुळे मृत्यूच्या छायेत गेले होते. आबिदची आई आपल्या गावामधील शेतीचे व्यवस्थापन करत आबिदचे संगोपन केले होते आणि त्याला शिक्षणासाठी बाहेर शहरात पाठविले होते. आबिद पण अभ्यासात हुशार आणि मन लावून अभ्यास करून एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. नोकरी मिळाली आता त्याने एक छोटे घर ही घेतले. मग आपल्या आईला आपल्या बरोबर शहरात घेऊन आला.
बघता बघता तो आपल्या कामात प्रगती करत करत प्रमोशन मिळवत गेला आणि आता त्याला प्रमोशन वर मोठ्या पदावर नियुक्ती मिळाली. आई खूप खुश झाली.
आता त्याच्या लग्नासाठी नातेवाईक आपापल्या मुलींचीं स्थळे सुचवू लागली. आबीदच्या आईने आपल्या मावस भावाची मुलगी आबीदसाठी पसंत केली. आबीद फरहीन चे लग्न झाले.
************************
आता आबीदने मोठे घर घेतले. आई आपल्या मुलाच्या प्रगतीवर खूप खूष होती. फरहीन पण साधी सुशील मुलगी होती. तिचे शिक्षण उर्दू माध्यमातुन झाले होते. नमाज, कुराण आणि आपल्या सासुची सेवा आईसारखी करणे हेच तिचे विश्व होते.
आबीदच्या संसाररुपी झाडाला फुल लागण्याची चाहुल लागली. फरहीन आई होणार होती.
घरचे वातावरण येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या चाहुलीने आनंदून गेले होते. आणि यांच्या जीवनात आनंदाची किरण घेऊन रुबीनाचा जन्म झाला. दोघे आपल्या मुलीला बघून खूष झाले. आबीदची आई पण आजी झालो आपण या सुखात आनंदली.
************************
घरात आता रुबिनाच्या बाळलीलांनी गजबजलेले वातावरण झाले. रुबिना पण आपले लाड आई बाबा आणि आजी कडून करून घेत होती.
त्या दिवशी सकाळी उठल्यावर आजी एकदमच चक्कर येऊन खाली पडली. लगेच तिला दवाखान्यात नेले. डॉ. नी तिला ब्रेन ट्युमर आहे हे निदान केले. औषधे सुरू झाली. फरहीन जीव तोडून आपल्या सासुची सेवा करत होती. सासु पण तिला आपली सेवा करते हे पाहून डोळ्यात अश्रू ओघळत म्हणायची “माफ कर पोरी. माझा तुला किती त्रास होतो. मी काय करु माझ्याने होत नाही गं काही.”
यावर फरहीन चिडायची आणि म्हणायची “माफीची भाषा काय करता. तुम्ही माझ्या आईच आहात न. आईची सेवा करायची नाही तर कोणाची करायची.जर माझ्या जागी तुमची मुलगी असती तर, तिलाही असेच बोलला असता का ??
हे ऐकून त्या आपल्या डोळ्याला हळूच दुप्पटा लावायच्या. आणि एके दिवशी झोपेतच त्यांनी आपली प्राणज्योत मालवली.
************************
‌रुबिनाचे कॉलेज आणि आबिदचे आॅफिस यांच्या साठी स्वयंपाक करायचा. दोघांना काय आवडते. काय नाही आवडत हे पाहून स्वयंपाक करून दिवसभर आपले काम आणि आपण येवढेच विश्व होते फरहीनचे. कधी कधी सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जायचे ते ही आबिदने नेले तर नाही तर बाहेर जाऊया हा हट्ट कधीच माऊलीने केला नाही.
************************
आबिद आॅफिसला गेला. आता फरहीन आपल्या कामात व्यस्त झाली.इतक्यात तिचा फोन वाजला.
अरे यांचा फोन काही विसरले वाटते म्हणत फोन उचलला “अस्सलाम व आलैकुम”
“वालैकुम अस्सलाम. देखो बेगम आज संध्याकाळी आपल्याला आमंत्रण आहे माझ्या मित्राच्या घरी. तर तु आणि रुबिना तयार रहा. मी आलो कि जाऊ.”
संध्याकाळी हे तिघे आमंत्रणासाठी निघाले.फरहीनने लाल रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तो रंग तिच्या आवडीचा होता आणि ती त्या रंगात खुलून दिसायची. तिघेही एका मोठ्या आलिशान हॉटेलासमोर आले.
“अहो हाॅटेलमध्ये आहे का दावत ?” फरहीन ने विचारले. यावर आबीदने होकारार्थी मान डोलावली.
हे तिघे हाॅटेलमध्ये गेले तिथे दरबानने सलाम ठोकला. तसेच हे तिघे एका मोठ्या डायनिंग हॉल मध्ये गेले. तिथे तो हाॅल पुर्णपणे फुले आणि रंगबिरंगी फुग्यांनी सजवलेला होता.
मधोमध एक राऊंड टेबल सुंदर रितीने सजवलेले होते. लाल रंगाचे कवर खुर्चीवर होते. हे तिघे तिथे जाऊन बसले.
एकेक करून लोक येऊ लागले. जो तो आपापल्या टेबलावर जाऊन बसले. सगळा हाॅल भरला. समोरच मधुर आवाजात संगीत सुरू होते. अगदी सुमधुर संगीत होते. इतक्यात एका सुंदर मुलीने माईक हातात घेऊन म्हणाली “अटेंशन प्लिज. आज ही पार्टी ज्यांनी अरेंज केली आहे त्यांच्या साठी आपण टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करु या आणि त्यांनी ही पार्टी का आणि कोणासाठी दिली आहे याचे कारण त्यांनी एका पत्राद्वारे दिले आहे आणि हे पत्र वाचून दाखिविण्याची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली आहे तर मी हे पत्र वाचून दाखवत आहे.
तिचे बोलणे ऐकून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. आणि हाॅलमध्ये सगळ्या लाईट्स बंद करून फक्त त्या युवतीवरच लाईटचा प्रकाश झोत टाकला.
त्या युवतीने लिफाफा उघडला आणि वाचण्यास सुरुवात केली,”
‌‌अस्सलाम व आलैकुम
पत्रास कारण की…
खुप दिवस झाले तुला पत्र लिहायचे होते पण कामात इतका गुरफटून गेलो होतो कि पत्र लिहीण्यासाठी वेळच‌‌‌ मिळाला नाही.आणि आज तू सकाळी एक प्रश्न विचारला त्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. तर ऐक..
माझी प्रिय बेगम, तुझे माझ्या आयुष्यात येणे हे एक माझ्यासाठी अल्लाह का तोहफां आहे. तुझ्यासारखा जोडीदार मिळणे हे मी माझे अहो भाग्य समजतो.
तुला आठवत असेल किंवा नसेल ही. जेव्हा माझ्या अब्बुंचे निधन झाले तेव्हा अम्मी एकटीच होती. त्यावेळी खुप लोकांनी आमची साथ सोडली कारण त्यांना ही भिती होती कि अम्मी त्यांच्या जवळ पैसे मागेल. पण अम्मी माझी खुद्दार होती. तिने स्वकष्टाने आमची शेती बहरली. त्यावेळी तुझे अब्बाजान अम्मीला मदत करण्यासाठी पुढे आले पण अम्मीने हे सांगितले की आता पुरतील इतकी दौलत छोड कर गये है आबिद के अब्बु. अगर जरुरत पडली तर नक्कीच तुझ्या कडे मागेन मी. तुझे अब्बाजान धनाचेच नाही तर मनाचेही मोठे होते. तू चार भावानंतर झालेली परी. तुला अगदी हाताच्या फोडासारखे जपत असत.
मी शाळेत असताना मला स्काॅलरशिप मिळायची आणि त्यामध्ये मी शिकत गेलो आणि अम्मी पण एका पुरुषा सारखे शेतात काम करत होती.
जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा ज्या नातेवाईकांनी पाठ फिरवली होती अब्बुंच्या निधनानंतर तेच आता आपापल्या मुलींची स्थळे घेऊन आले होते. अम्मीने साफ इंकार केला.
मग एके दिवशी अम्मी तुझ्या अब्बाजान कडे गेली आणि म्हणाली “भाई आज मैं पहली बार तेरे से कुछ मांगनें आई हूं”
“अरे बोल काय हवं तुला.”
“भाई तेरी बेटी को मेरे घर कि बहू बनाना चाहती हूं बेटी की कमी भी पुरी हो जायेगी.”
“ठीक है. मी जरा विचार करून सांगेन. आणि हो या आधी तू आबिदला विचार. त्याच्या आयुष्याचा हा महत्त्वाचा निर्णय आहे.’
“नाही तो माझे ऐकतो तरी पण भाई तू म्हणतोस तर विचारते त्याला.”
***********************
आणि आपले लग्न जमले. ज्या दिवशी आपले लग्न झाले त्यादिवशी मांडवात एकाने तुझ्या अब्बाजान ना प्रश्न केला “मालक तुम्ही एवढे धनवान आहात आणि तुमची ही एकुलती एक मुलगी. घरात नोकरचाकर आहेत लाडात वाढलेली आणि तुम्ही याला काय बघून मुलगी दिली. न यांची एवढी शेती. न बंगला. शहरात आहे ते पण छोटेसे घर. कशी काय दिली मुलगी तुम्ही”
यावर अब्बाजान म्हणाले “मी पैसा, बंगला गाडी बघून मुलगी देणार नव्हतोच. मला फक्त आणि फक्त मुलगा कर्तबगार आणि मेहनती प्रामाणिक हवा होता आणि ते सर्व गुण आबिद मध्ये आहेत. समजा पैसेवाला मुलगा असला आणि तो वाईट नाद असलेला बापाच्या पैशावर नाचणारा असला तर काय फायदा. आणि मला खात्री आहे माझी बेटी या घरी सुखी राहील.” हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले.

जेव्हा तुझी बिदाई होत होती तेव्हा तू तुझ्या अम्मी अब्बाजान च्या गळ्यात पडून रडत होती तेव्हा नकळत अब्बाजानची नजर माझ्या कडे गेली आणि मी ही त्यांना माझ्या डोळ्यातुन एक वचन दिले की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या मुलीला सुखी ठेवेन. जे काही आहे ते मिळून सुख दुःख वाटून घेईन. तर तो माझ्या आयुष्यातील पहिला प्राॅमिस डे होता.

त्यानंतर तुला माझ्या हातात सुपुर्द करते वेळी तुझ्या अम्मीने म्हटले आज पासून तुमची अमानत आहे ही. जपा हिला. खुप नाजूक आहे फुलासारखी. हिला बाहेर चे जग माहीत नाही. मासुम है मेरी बच्ची” आणि मी तुझा तो फुलांसारखा नाजूक हात आयुष्यभरासाठी माझ्या हातात घेतला हा होता माझा पहिला रोज डे.

तू माझ्या आयुष्यात अगदी सोनपावलांनी आली. तुझ्या येण्याने आयुष्यच माझे बदलून गेले. मी आणि अम्मी एका छोट्या घरात राहत होतो. आणि तू मोठ्या हवेली मध्ये राहाणारी परी होती. पण तू कधीही माहेरच्या हवेलीची तुलना आपल्या घराशी केली नाही. उलट तू आपल्या घराला स्वर्गा सारखे सजवले.
तुझ्या अम्मी अब्बाजानचे हे संस्कार होते ते जपले. कधी ही काही कमी असले तरी ते कोणालाही न दाखवता आहे त्यात काम निभावून नेणे ही तुझी खासियत. पण नाही आहे म्हणून कधीच तू कोणा समोर हात पसारले नाही हा तुझा मोठ्ठेपणा.
त्यादिवशी तुला आपल्या संसाररुपी अंगणात फुल लागणार आहे याची चाहूल लागली तेव्हा तू तुझा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि तो चेहरा तुझ्या हाताने लपवून मला हळूच ती गोड बातमी दिली आणि मी देखील आनंदाने तुला मिठीत घेतले तो माझ्या आयुष्यातील पहिला मिठी दिवस होता.
आणि या गोड आनंदाच्या क्षणी अम्मीने गोड शेवया केल्या होत्या. त्यानंतर जेव्हा ती घटीका आली जिचा आपण आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजेच आपल्या बाळाचा जन्म. आणि तू एका गोजिरवाण्या गोंडस मुलीला जन्म दिला. जेव्हा नर्सने बाहेर येऊन सांगितले कि “अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे.” तो क्षण मी आजही आठवतो मला आकाश ठेंगणे झाले होते. आणि मी पळतच आत जात होतो. तेव्हा डॉ.जरा थांबा दोन मिनिटे. रुम मध्ये शिफ्ट केले कि मगच जा. ती दोन मिनिटे मला दोन वर्षे वाटली. आणि शेवटी मी तुला रुम मध्ये शिफ्ट केले तेव्हा आत आलो तर ही आपली अम्मीच्या हातात होती. तिला जेव्हा मी अलगद माझ्या हातात घेतले आणि तिला पाहून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रु ओघळले आणि ते अश्रू माझ्या गालांचे पापे घेत होते. त्याच क्षणी मी हळूच माझ्या परीचा पापा घेतला तर तो माझ्या आयुष्यातील पहिला किस डे होता.
************************
आपल्या परीचे नाव अम्मीने रुबीना ठेवले. आणि रुबीना आपल्या आयुष्यात लक्ष्मीच्या रुपानेच आली. ती जन्मली आणि माझे प्रमोशन झाले.त्याच बरोबर इतके दिवस मी ज्या मोठ्या घराचे बुकिंग केले होते त्याचेही पझेशन मिळाले.
‌माझे हेच स्वप्न होते कि जेव्हा आपले बाळ या जगात येईल तेव्हा आपण त्याला आपल्या नव्या मोठ्या घरीच घेऊन जायचे आणि अल्लाह ने माझी दुआ कबुल केली.
आपण आपल्या नव्या घरी शिफ्ट झालो. आता रुबीनाचे लाड करत आजी फिरत होती. तू मला काय हवे अम्मीला काय हवे .आमच्या आवडी निवडी जपत आपला संसार सुखाचा करण्यात मग्न होती.
रुबीनाला नर्सरी स्कूल मध्ये प्रवेश घ्यायचा होता.तिला चांगल्या स्कूल मध्ये प्रवेश घ्यायचा होता मग जरी लांब असली तरी चालेल.मग तिला शहरातील नावाजलेल्या स्कूल मध्ये प्रवेश मिळाला. तिचा पहीला दिवस शाळेत जायचा. तिला शाळेत सोडण्यासाठी मी आणि अम्मी गेलो होतो. तिला मी आत क्लास रुम मध्ये सोडायला गेलो तर ती काही केल्या माझा हात सोडे ना.” अब्बू नहीं. मुझे नहीं रहना स्कूल में.”
मग मी तिला “अरे बेटा बस थोडी ही देर बैठना हैं फिर मैं और तेरी अम्मी आयेंगे. बाद में हम घुमने जायेंगे.” म्हटले होते.
तिला सांगितले प्रमाणे आपण दुपारी तिला शाळेतून घरी आणण्यासाठी गेलो. ती पण आपल्याला बघून पळतच आली आणि मला येऊन बिलगली आणि हळूच आपल्या हातातील एक चाॅकलेटचा तुकडा माझ्या तोंडात घालून म्हणाली “अब्बू आज न टिचर ने हम सब को चॉकलेट्स दिये. तुम्हे पता है सब बच्चों ने ना तब का तब ही खा लिया पर मैंने नहीं खाया. मैने तुम्हारे लिए रख दिया तुम्हे पसंद है न चाॅकलेट.” आणि मी हे ऐकतच राहिलो.आणि ते चाॅकलेट कधी विरघळले तोंडात हेच कळले नाही. रुबीनाचे माझ्या साठी असलेले प्रेम त्या चॉकलेट पेक्षा गोड होते. आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील पहिला चाॅकलेट डे होता.
************************
त्यानंतर दिवसांना जसे पंखच लागले. बघता बघता आपली रुबीना मोठी झाली. आता तिला हायस्कूल मध्ये प्रवेश घ्यायचा होता. प्रार्थमिक शाळेमध्ये तिची प्रगती खूप छान होती. तू देखील जरी उर्दू माध्यमातुन शिकलेली होती तरी देखील तू तिचा अभ्यास करुन घ्यायची. आणि जे तुला समजत नाही असे वाटले किंवा येत नाही असे वाटले तर तू कोणत्या ही प्रकारची लज्जा न बाळगता अगदी मोठ्या मनाने मला विचारुन समजून घ्यायची आणि त्याची उजळणी करुन मग तू रुबीनाला शिकवायची.
हायस्कूलमध्ये तिची प्रवेश परीक्षा घेतली त्यामध्ये ती चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली आणि तिला प्रवेश मिळाला.
हायस्कूलमध्ये तिची पिकनिक जाणार होती. आणि त्यावेळी पहील्यांदाच ती आपल्या पासून दूर एकटी गेली. दोन दिवसांची पिकनिक होती तिची.
जेव्हा ती पिकनिक करून परत आली तेव्हा तिने तिथे काय केले किती गमती जमती सांगत होती आणि एकदम तिने आपली बॅग उघडली आणि मला म्हणाली “अब्बू आंखें बंद करो प्लिज.”
आणि माझ्या हातावर काही तरी ठेवून म्हणाली “हां अब देखो”
आणि पाहतो तर एक छोटीसी टेडी कि चैन.
“अब्बू ये आपके लिये. कार जब लोगे न तब उसकी कि चैन” आणि तिचे ते माझ्या साठी आणलेले टेडी चे कि चैन तो दिवस माझ्या आयुष्यातील पहिला टेडी डे होता.आणि ती कि चैन मी अजून ही माझ्या डोळ्यांना लावून ठेवतो.
रुबीनाला चांगले संस्कार देणे हे तू आणि अम्मी ने केले. आता अम्मी ची पण प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिची तू अगदी मुली सारखी सेवा करायची.
माझ्या आवडी निवडी जपत तू स्वतः च्या आवडी निवडी विसरून गेली. रुबीनाला आणि अम्मी ची देखभाल हेच तुझे ध्येय होते. आणि ते तू अगदी मनापासून केले. तुझे माझ्या आयुष्यात येणे हे माझ्यासाठी सौभाग्य आहे.
अम्मी जेव्हा बिछान्यावर पडून होती तेव्हा आई कसे आपल्या बाळाची देखभाल करते तसेच तू अम्मीची देखभाल केली.
ज्या दिवशी अम्मी आपल्याला सोडून गेली त्या रात्री अम्मीने डोळ्यात पाणी आणून जेव्हा माझ्या कडे आणि तुझ्या कडे पाहीले तेंव्हा तिच्या डोळ्यात मला एकप्रकारचे समाधान दिसले. जणू ती तिच्या डोळ्यातून बोलत होती कि मी आता आरामात डोळे मिटवू शकते. माझ्या मागे तुझे काय आणि कोण करेल याची चिंता नाही मला.
अम्मीच्या जाण्याने एक अशी पोकळी निर्माण झाली आपल्या आयुष्यात जी कधीही भरून येणार नाही.
पण त्यावेळी तू दिलेला आधार मला आतून खंबीर बनवत होता.
खऱ्या अर्थाने तू माझी अर्धांगिनी आहेस. सुखात सर्व सहभागी होतात. पण दुःखात तोच सहभागी होतो जो मनाने आपले मानतो.
तुझे ते सोनपावलांनी माझ्या आयुष्यात येणे माझे आयुष्यचे सोने झाले.
आज मी सर्वांसमोर पुन्हा एकदा तुला मागणी करतो आहे. तू याच नाही तर जन्मोजन्मी माझीच होशील.
व्हॅलेंटाईन डे हा वर्षातून एकदा साजरा करतात पण तुझे माझ्या आयुष्यात येणे हे माझ्यासाठी रोजच व्हैलेंटाईन आहे.
तू सकाळी केलेल्या प्रश्नांचे उत्तर हेच आहे की हा सण तोच साजरा करतो जो मनापासून प्रेम करतो मग तो पती असो किंवा प्रियकर.तरूण असो किंवा वयस्कर.
प्रेमाला न वयाचे बंधन न वेळेचे. प्रेम हे प्रेमच असते.
आपलं नातं आहे पवित्र प्रेमाचे. आहे आपल्या मध्ये छान मैत्री. संसार सुखी करावयाची.
फरहीन मी खरंच तुझ्या सारख्या सहजीवनी अर्धांगिनी बरोबर संसार सुखाचा करताना स्वतः ला भाग्यवान समजतो.
अल्लाह हाफ़िज़
आबिद

आणि हे पत्र वाचून झाल्यावर त्या युवतीने ते पत्र पुन्हा त्या लिफाफ्यामध्ये ठेवले आणि एकदम लाईटचा प्रकाश झोत फरहीन आबीद च्या टेबलावर आला आणि फरहीन आपले पाणवलेले डोळे कोणाला ही नकळत हळूच पुसत होती.

परवीन कौसर

– लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादक : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. परवीन कौसर..फार सुंदर ह्रदयस्पर्शी कथा..
    प्रेमाचा सच्चा अविष्कार..
    खरं म्हणजे कथेतला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा सारख्या घटनांचा असूनही ऊत्तरार्धातील अबीदच्या भावनांची ऊलगड!त्याचं अशा रितीने व्यक्त होणं ,हे मनाला भारावून टाकतं..
    खूप छान!!

  2. परवीन कौसरनी सुंदर कथा लिहून सगळे प्रेमाचे वेगवेगळे “डे” छान उलगडून दाखवले आहेत. अशीच लिहित रहा परवीन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम