मध्यंतरी व्हॅाटसॲपची नाती हा लेख लिहिला होता. आज व्हॅाटस ॲप हाच विषय घेऊन लिहावेसे वाटले.
स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर काही वर्षातच व्हॅाटस ॲपनी जन्म घेतला.
हल्लीच्या तंत्रज्ञान युगाचा हा मोठा फायदा आहे फेसबुक, व्हॅाटस ॲप मुळे जग जवळ आले आहे. परदेशात राहणाऱ्यांसाठी, शिकायला गेलेल्या मुलांसाठी, वयस्कर लोकांसाठी हे मोठेच वरदान आहे.
पुर्वी मुले बाहेर शिकायला जायची तेंव्हा पालकांशी महिने महिने संर्पक नसायचा. पण आता किती सोपे झाले ह्या ॲप मुळे ! अगदी बोलणे नाही झाले तरी संदेश पाठवण्यानेही पालकांना दिलासा मिळतो. आपल्या आप्तेष्टाशी संर्पक राहतो.
पण सो कॅाल्ड बिझी असणाऱ्यांसाठी वेळ न जाणाऱ्यासाठीचे माध्यम असावे. कौतुकानी सांगणारे हि लोक भेटलेत की आम्ही फोन फ्रेंडली नाही आहोत.
बिझी असणाऱ्यांची तर फार गम्मत वाटते. विविध समुहावर जॅाईन असतात पण सहभाग शून्य. कौटुंबिक समुह, शाळेचे समुह, सामाजिक समुह …. मारूतीची शेपटी मोठी असते.
बिझी असल्यामुळे व्हॅाटस ॲप वरील पोस्ट बघण्यात, वाचायला वेळ नसतो. मग वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या, वर्धापनदिनाच्या शुभेच्छा, सणावाराच्या शुभेच्छां देण्यास वेळ असतोच. म्हणजेच व्हॅाटस ॲप हा बघितला जातो. जसे बिळातून नाग बाहेर यावेत. खरेच गम्मत वाटते. फोन बघत नसू तर मग वाढदिवस आहेत हे कसे समजते ? हे गमताशीर वाटते. आपण आपल्या सोईने उपयोग ठरवतो का असे वाटते.
व्हॅाटस ॲप मुळे काही नात्यांमध्ये वितुष्टही आलेली आहेत. कंळत न कळत, आपल्या सोईने प्रतिसाद देतो का ? काही जण तर असे सांगणारे भेटलेत, अग कुठे ते व्हॅाटसॲप ज्ञान आवडत नाही. वेळ नसतोच, आम्ही फोन बघत पण नाही.
खरे तर व्हॅाटस ॲपवर छान वाचनीय, माहिती पुर्ण लेख येत असतात.
चांगले वाचन, काही अॅाडिओज, व्हीडीओज पाहायला, ऐकायला मिळतात. काही फक्त वरच्या ४ ओळी वाचून पुढे पाठवतात.
पॅार्न व्हिडीओज बघायला असतो की वेळ काही जणांना !व्हॅाटस ॲपचा उपयोग ठरवले तर छान करता येत. एवढेच मला सांगायचे आहे. फक्त कोरड्या शुभेच्छा देऊ नका. तिथे फोन करण्याचा प्रयत्न नक्की करा.
लगेच नाही तर चार दिवसांनी उत्तर द्या
फॅमिली ग्रुप वर, शाळेच्या ग्रुपवर जमेल तेव्हा सहभागी व्हा. पाठवलेल्या पोस्टला दाद द्या. त्यामुळे कोणाची मने नाही दुखावली जात.
जसे घेऊ तसे देऊ. नाती ही टिकून राहतात मग. नाही तर व्हाॅटस ॲप की दुनिया जसे की वागळे की दुनिया !😊

– लेखन : शलाका कुलकर्णी. नेदरलँड्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800