नाट्य, चित्रपट, दूरदर्शन मालिका क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार राम काजरोळकर म्हणजे जणू शंभर नंबरी सोनेच आहे ! मुंबईतील गिरणगावात जन्मलेल्या राम काजरोळकर यांची जीवन कहाणी म्हणजे जणू एखाद्या चित्रपटाची पटकथा शोभेल, अशीच आहे.
मुंबईतील परळ व्हिलेज रोड येथील म्युनिसिपल चाळीत राम काजरोळकर यांचा जन्म १५ जुलै १९३८ रोजी झाला. बालपणी त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय वाईट होती वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यामुळे ते शाळा सुटल्यावर छत्र्यांवर नाव लिहिण्याचे काम करीत असत. पुढे फळे, कागदी पिशव्या विकून त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर नवभारत कपबशीच्या कारखान्यात नोकरी केली.
राम काजरोलकर यांना लहानपणापासूनच अभियानाची आवड होती. शिवडी येथील कामगार कल्याण केंद्राच्या नाटकामध्ये त्यांना प्रवेश मिळाला. चांगला अभिनय केल्याबद्दल त्यांना या केंद्रातून अभिनयाचे प्रथम पारितोषक मिळाले. परळ व्हिलेज येथील लाल मैदानावर होत असलेल्या नाटकांच्या स्पर्धेत ते भाग घेत असत. पुढे मुंबई दूरदर्शन वरील कामगार विश्व, आमची माती आमची माणसे, घरकुल या मालिकांमधून काम करत त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू होऊन ते रंगभूमीपर्यंत पोहोचले. पूर्वीच्या काळात लोकनाट्य फार चालत होती. राम काजरोळकर यांना विनोदी भूमिका मिळत असत. त्यांचे पहिले नाटक “शंभर नंबरी सोनं, त्यानंतर “लग्नाला चला”, वाटी वस्तारा जिंदाबाद, चार पोपट एक मैना, चांडाळ चौकडी, गाढवाचं लग्न, हप्त्याचा वायदा, अशी अनेक लोकनाट्य त्यांनी केली. त्यांच्या सततच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना २०१० साली अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई या संस्थेच्या वतीने दादू इंदुरीकर पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुढे रामभाऊंची नाटकाकडे वाटचाल सुरू झाली. प्रतिकार, शांतेच कार्ट चालू आहे, आमचं सगळं सात मजली, बुवा तेथे बाया, शोलेला लागले कोल्हे, सारेच सज्जन, आधी लग्न सोंगाड्याचे, एकदा तरी हो म्हण, वात्रट मेले अशा अनेक नाटकातून त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळून बहारदार भूमिका साकारल्या.

दरम्यान, राम काजरोळकर यांना रेल्वेत नोकरी लागली. त्यामुळे रेल्वेच्या सांस्कृतिक विभागात त्यांचे पदार्पण झाले. अगर यही रफ्तार रही तो, बडी देर की मेहरबा आते आते, भूक काश्मीर को बंगाल बना देती है, अशा कादरखान लिखित प्रत्येक एकांकिका स्पर्धेत त्यांना अभिनयाचे प्रथम पारितोषक मिळाले. तसेच मायनस फिफ्टी, राधा ना बावरी, वाघ येणार आहे, पूर्णविराम, भूमिका, भारत एक खोज, किसी सीमा की मामूलसी घटना अशा अनेक एकांकिका त्यांनी सादर केल्या.
राम काजरोळकर यांच्या नाटक व लोकनाट्यातील भूमिका बघून चित्रपट दिग्दर्शक पितांबर काळे यांनी, “उतावळा नवरा” या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासर्याची भूमिका त्यांना दिली आणि अशा प्रकारे त्यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर गौराचा नवरा, सौभाग्यवती सरपंच, गंध मातीला आला, हिरवा चुडा सुहासिनीचा तर वयाच्या ६० वर्षानंतर कवडसे, साई दर्शन, उमंग, सासू नंबरी – जावई दस नंबरी, भक्ती तिथे शक्ती, मोहन आवटे, श्रीमंत दामोदरपंत अशा अनेक चित्रपटातून दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. याशिवाय भूमिपुत्र या भोजपुरी चित्रपटात आणि बेहेनेर माया या बंजारा भाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
दरम्यान खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू झाल्या. राम काजरोळकर यांना आणखी एक नवे दालन मिळाले. दामिनी, अवघाची संसार, चाळ कुरू कुरू, कुलवधू, रुणझुण, या मालिकेत त्यांना भूमिका मिळाल्या. भाग्यलक्ष्मी, मधु येथे, चंद्र तिथे, आतला आवाज, गंगाधर टिपरे अशा अनेक मालिकांमधून त्यांनी काम केले. वयाच्या पंचाहत्तरी नंतर देखील त्यांनी मध्यम वर्गीय व प्रेम कहानी या चित्रपटात काम केले.

राम काजरोळकर यांना लहानपणी शिक्षण घेताना जो त्रास झाला त्याची जाणीव ठेवून त्यांनी चाळीतील विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप स्वखर्चाने केले. राहत असलेल्या चाळीत जागा नसल्यामुळे मित्रांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य वर्ग घेऊन उघड्या जागेत ते चालविले. रेल्वेत नोकरी करीत असताना कुर्ला शाखेतील नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे ते तीन वर्ष पदाधिकारी होते. या कालावधीत अनेक कामगारांच्या तक्रारी सोडवण्याचे त्यांनी काम केले. कुर्ला येथील मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटचे ते ६ वर्षे सांस्कृतिक सचिव होते. या काळात त्यांनी इन्स्टिट्यूटला बरीच बक्षिसे मिळवून दिली.
कॅरम, टेबल टेनिस, बिलीअर्ड, स्नूकर या खेळाची त्यांना आवड होती. या खेळामध्ये त्यांना बक्षिसे देखील मिळाली. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे पाच वर्षे सचिव, अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. आदिवासी लोकांना मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, गरजूंना पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटल सारख्या सेवेत मदत करणे अशा अनेक प्रकारची सामाजिक कामे ते करीत आले आहेत. आताही ते ८७ व्या वयात त्यांना जे जे शक्य असेल, त्याप्रमाणे समाजातील गरजूंना मदत करीत असतात. राम काजरोळकर यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा.

— लेखन : मारुती विश्वासराव.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800