रसिकहो………
आज महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर, परमपूजनीय ………
बळवंतराव मोरेश्वर राव उपाख्य बाबासाहेब पुरंदरे
यांचा जन्मदिवस……..!
राजमान्य राजश्री बाबासाहेब पुरंदरे म्हणजे चालते बोलते शिवचरित्रच…..!
ज्यांनी लिहिलेल्या “राजा शिव छत्रपती” या शिवचरित्राचे दहा भाग बालवयातच वाचून मला शिवचरित्राचा ध्यास लागला, ते राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे वक्ते, लेखक, आचारक व प्रचारक शिवभारतकार बाबासाहेब पुरंदरे……
पूजनीय बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हे सर्वार्थाने श्री शिवचरित्रा साठी समर्पित आहे. बाबासाहेब म्हणजे शिवचरित्राचा चालता बोलता ज्ञानकोशच जणू. आज बाबासाहेब जीवनाच्या शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. बाबासाहेबांनी केवळ शिवचरित्राचे संशोधन, त्यावर व्याख्याने केली नाहीत तर जीवनातला प्रत्येक क्षण ते शिवकाळातच जगत राहिले.
शिवचरित्र अधिक सुलभ, आद्यतन, सकस, साधार, संशोधनपूर्ण व व्यापक रूपात समाजापुढे आले पाहिजे याची आंतरिक तळमळ असलेला एक सच्चा इतिहास संशोधक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे.
त्यांनी लिहिलेल्या “राजाशिवछत्रपती” या ग्रंथाचे दहाही भाग माझ्या पूजनीय पिताजींनी मला माझ्या अगदी बालवयात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले. तेव्हापासून या चालत्या-बोलत्या इतिहास पुरुषाच्या दर्शनाची ओढ मनात निर्माण झाली.
मला आठवतय बहुदा 1981 हे ते वर्ष असावे, आणीबाणीत जीवाची बाजी लावून संघकार्य करणाऱ्या धरणगाव येथील एका समवयस्क कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ धरणगावातील संघ कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या “विक्रम जोशी स्मृती ग्रंथालय व वाचनालयाने” आयोजित केलेल्या शिवचरित्र व्याख्यान माले साठी बाबासाहेब धरणगाव येथे आले होते.
मी व माझे तत्कालीन संघ बंधू व मित्रमंडळी रोज धरणगाव येथे या शिवचरित्र व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी जात असत. तेव्हा राजा शिवछत्रपती हा ग्रंथ विकत घेतला आणि त्यावर बाबासाहेबांची स्वाक्षरीही. तिथून पुढे पुरंदरे प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाची जवळपास प्रत्येक आवृत्ती ची प्रत मी घेतच गेलो. पुरंद-यांची दौलत, पुरंद-यांची नौबत, ठिणगी, मुजऱ्याचे मानकरी ही पुस्तके वाचून हातावेगळी केली.
पुढे आळंदी येथे “भारतीय विद्या भवन” संचलित “श्री संत ज्ञानेश्वर हरिकथा व कीर्तन महाविद्यालयात” प्रवेश घेतला. आमचे प्राचार्य परमपूजनीय डॉक्टर विनायक राव कुलकर्णी व बाबासाहेब यांचे जुने मैत्र. त्यामुळे बाबासाहेबांनी आमच्या महाविद्यालयाला भेट द्यावी हा माझा हट्ट पूजनीय भाऊंनी म्हणजेच विनायकराव कुलकर्णींनी पूर्ण केला. बाबासाहेब महाविद्यालयात आले व त्यांच्यासमोर त्यांनीच लिहिलेल्या “रांझ्याचा पाटील” व “प्रताप्राव गुजर” या कथा सांगण्याचे सौभाग्य मला लाभले.
त्याच सुमारास पुण्यात विश्रामबाग वाड्यात बाबासाहेबांनीच लिहिलेल्या “फुलवंती” या नाटकाच्या तालमी होत असत. त्यानिमित्तानेही वरचेवर पूजनीय बाबासाहेबांची दर्शन भेट होत राहिली. पुढे नाशिक येथील “जाणता राजा” च्या प्रयोगात ही भेट सलगी मध्ये परिवर्तीत झाली.
अमळनेर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या पंच दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेत पूजनीय बाबासाहेबांना ने आण करण्याची व्यवस्था माझ्याकडे होती. माझ्या एका मित्राच्या “बजाज कब” स्कूटरवर मी बाबासाहेबांना अमळनेरातून व विश्राम गृहापासून व्याख्यान माले पर्यंत फिरविले व बाबासाहेबही मोठ्या मनाने विनातक्रार आनंदाने माझ्या सोबत हिंडल्याचेही मला चांगले स्मरते.
बाबासाहेबांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने मी शिवचरित्र कथाकथन, व्याख्यान व शाहिरी कार्यक्रम करू लागलो. प्रत्यक्ष सहवास व भेट जरी वरचेवर झाली नाही तरी, बाबासाहेब जाणता राजा ध्वनिमुद्रिका, शिवचरित्रकथन सीडी व राजा शिवछत्रपती या ग्रंथातून भेटतच राहिले.
मागील वर्षी पूजनीय बाबासाहेब पुरंदरे यास श्री संत नरहरी नाथ महाराज संस्थान, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा, यांनी गौरविले असता त्यांना देण्यात आलेले सन्मानपत्र लिहिण्याची एक अविस्मरणीय संधी मला मिळाली. मी माझ्या परीने बाबासाहेबांच्या मोठेपणास किमान कमीपणा येणार नाही याची जाणीव ठेवून त्यांचे सन्मानपत्र लिहिण्याचे शिवधनुष्य पेलले. हे सन्मान पत्र वाचून बाबासाहेबांनी आवर्जून फोन करून मला दिलेली शाबासकी हा माझ्यासाठी एक मोठा सन्मानच आहे असे मी समजतो.
शिवचरित्रातून राष्ट्रीय चरित्र व चारित्र्य निर्माण व्हावे या एका आंतरिक तळमळीतून व वेड्या ध्यासातून बाबासाहेब आजन्म कार्य करीत राहिले. आजही शंभरीत प्रवेश केल्यावरही ते म्हणतात “मी आनंदी आहे पण समाधानी नाही, मला अजूनही शिवचरित्राच्या अनेक पैलूंचा अभ्यास करावयाचा आहे. शिवचरित्राचा सर्वांग परिपूर्ण अभ्यास या देशातील तरुणांनी करावा व एक स्वयंपूर्ण बलशाली राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार करावे ही त्यांची अपेक्षा आहे
आज बाबासाहेबांच्या शतकी जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यास निरामय आरोग्य लाभो व त्यांच्या आजन्म शिवसेवेचा प्रसाद म्हणून “भारतरत्न” होण्याचे सद्भाग्य लाभो ही आई भवानीचे चरणी प्रार्थना……..!
अदीन: जीवेत शरदः शतम् ………!
सेवेचे ठायी तत्पर, उपासनी योगेश्वर…..
शुभाकांक्षी,
।।।अक्षरयोगी।।।
राष्ट्रीय कीर्तनकार, शिवकथाकार, भागवताचार्य, ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज
– संपादक : देवेंद्र भुजबळ 9869484800
बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल लिहिलेले खूप भावले. धन्यवाद. मी 9वी व 10वीला असताना 1964 व 1965 साली बाबासाहेबांची व्याख्यानमाला सातारा येथे जल मंदिरामध्ये छत्रपतींच्या पुण्य वास्तुमध्ये ऐकली आहे.