Saturday, July 5, 2025
Homeयशकथाशतायुषी रामभाऊ जोशी

शतायुषी रामभाऊ जोशी

ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक रामभाऊ अण्णाजी जोशी यांनी हिंदू पंचांगाप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. १३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचा ख्रिश्चन कॅलेंडर प्रमाणे ९९ वा जन्मदिन आहे हे ज्यांना माहीत आहे त्यांनी १२ ता. सकाळपासूनच त्यांच्या घरी अभीष्टचिंतनासाठी रीघ लावली.
‘जीवेत शरद: शतम्’ अशा शुभेच्छा देणाऱ्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी मात्र ते शतायुषी झाल्या प्रित्यर्थ परवा ११ डिसेंबर रोजी विधिवत पूजा करीत त्यांचे आशीर्वाद घेतले.

त्यांच्यापेक्षा सुमारे पंचवीस वर्ष लहान असणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेतला सहकारी आणि आणि पुण्यातील पत्रकारनगर मध्ये सिंधू इमारतीतील शेजारी असलेल्या मला मात्र थोडे अधिक जाणून घ्यावेसे वाटले. म्हणून परवा दीड दोन तास गप्पा मारल्या आणि जाणून घेतले त्यांच्या दिर्गोद्योगी शतायुषी आयुष्याचे रहस्य !

सामान्यपणे साठी-सत्तरीच्या वयातच असंख्य ज्येष्ठ नागरिक गलित गात्र झालेले दिसतात. पण रामभाऊंनी मात्र आपले स्वास्थ्य खूप छान जपले आहे. विशेषतः त्यांची स्मरणशक्ती ऐकणार्‍याला थक्क करुन टाकते.

रामभाऊ यांचे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (१९१३-१९८४) यांच्याशी किती घनिष्ट आणि मैत्रीचे संबंध आहेत हे आमच्या पिढीतील पत्रकार आणि राजकारणी यांना खूप जवळून माहिती आहे. या संबंधा विषयी प्रश्न विचारूनच गप्पाना सुरुवात झाली.

त्यांना विचारलं की, यशवंतरावांची आणि आपली ओळख केव्हा आणि कुठे झाली ?

तो १९४२ चा कालखंड होता. देशभर महात्मा गांधींच्या चळवळीमुळे ब्रिटिश विरोधी भारलेलं वातावरण होतं. राम जोशी आणि यशवंत चव्हाण यांचा सातारा जिल्हाही अपवाद नव्हता. उलट या जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली  “प्रति सरकार” ची चळवळ खूप जोरात कार्यरत होती. त्यात यशवंत चव्हाण देखील होते. भूमिगत राहून कराड परिसरातील त्यांचे कार्यकर्ते क्रान्तीचे पडेल ते काम करायचे. त्यातील तिघांची नावे देखील रामभाऊंना सांगता आली. रामभाऊ आणि यशवंतरावांची ओळख मात्र फार नंतर झाली, १९६२ नंतर. एव्हाना यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात फार पुढे गेले होते. मंत्री, मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास सुरु झाला होता.

रामभाऊ अहमदनगर आणि पुणे येथील दैनिकांत पत्रकार म्हणून काम करू लागले होते. एका असाइनमेंट च्या निमित्ताने मंत्री यशवंतराव यांची पत्रकार रामभाऊ यांच्याशी भेट झाली आणि हळूहळू दोघात मैत्र आणि कौटुंबिक नाते निर्माण झाले.

पण तत्पूर्वीच पत्रकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई अशा दिग्गजांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या. गुजरात आणि महाराष्ट्रातील जातीय दंगली आणि त्यानंतरच्या १९९०-९१ या काळात येणारे पाकिस्तानातील निर्वासितांचे लोंढे, भारत पाकिस्तान युद्ध, असे अनेक महत्त्वाचे प्रसंग त्यांनी कव्हर केले. सायं दैनिक संध्या नंतर केसरीचे प्रतिनिधी म्हणून अनेक विषयावर बातम्या आणि लेख त्यांनी लिहिले. त्यामुळे पत्रकार म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रभर झाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, उपपंतप्रधान अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर यशवंतराव कार्यरत होते. त्याच वेळी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या राजकारणात देखील त्यांनी आपली छाप ठेवली होती. यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट आणि कार्य या संदर्भात सात हजार पेक्षा अधिक पृष्ठ संख्या असलेले दहा ग्रंथ त्यांनी लिहिले. यशवंत भूषण, यशवंतराव जीवनगौरव, राष्ट्रीय द्रष्टे नेते, यशवंतराव नीति, अशा साहित्याबद्दल त्यांना स्वतंत्रपणे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यशवंतराव दिल्लीत असताना सहा महिने सलग त्यांच्या निवासस्थानी मुक्काम करून त्यांचा जीवनपट आणि त्यांनी केलेले कार्य याच्यावर अधिकृत असे भरपूर लिखाण केले. याचा तपशील ऐकताना रामभाऊंच्या लोकसंग्रहाची आणि पत्रकारितेची कल्पना येऊ लागते आणि त्यांच्या स्मरणशक्तीला दाद द्यावी लागते.

त्यांच्या या वाटचालीमध्ये यशवंतराव यांच्याशी त्यांचे घट्ट नाते झाले होते. बहुश्रुत यशवंतराव राजकारणा व्यतिरिक्त संगीत, साहित्य, कला, आणि सामाजिक बांधिलकी या सर्व आघाड्यांवर काम करीत असत. त्यात रामभाऊंचा सल्ला त्यांना मोलाचा ठरत असे.

त्यांच्याबरोबर केसरीचे विश्वस्त संपादक जयंतराव टिळक यांचा देखील रामभाऊ वर खूप विश्वास होता. केसरी मराठा ट्रस्ट, टिळक स्मारक मंदिर अशा अनेक संस्थांशी त्यामुळे रामभाऊ देखील जोडले गेले होते. पुणे शहरातील त्यावेळच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांबरोबर रामभाऊंनी अत्यंत आत्मियतेने काम केल्यामुळे सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांची जवळीक निर्माण झाली.

सध्या शतायुषी होताना देखील त्यानी दैनंदिन शिस्त कायम ठेवली आहे. स्नान संध्या, पूजा अर्चा तर नियमित आहेच पण जप जाप्य, राम नामाचा जपही असतो.

हलकाफुलका दोन वेळचा शाकाहार, फळ, आणि सकाळ, संध्याकाळ चहा अशा आहारामुळे रामभाऊंची प्रकृती आत्ताही वयाच्या मानाने खूप चांगली आहे. ते आता घराबाहेर पडत नाहीत. घरातल्या घरात वॉकर घेऊन चालू शकतात. कानाला यंत्र न लावता देखील हलक्या आवाजातील बोलणेसुद्धा छान ऐकू शकतात. दृष्टी अधू झाली आहे, त्यामुळे वाचन, लेखन, टीवी पाहणे बंद केले आहे.

पण फोन आला, किंवा पाहुणे आले की गप्पांमध्ये रामभाऊ रमतात. अतिशय स्पष्ट बोलू शकतात. तरुण पत्रकार संदर्भ विचारायला आले की तारीख, वार, व्यक्तीचे नाव, हुद्दे या संकट तपशील सांगतात. त्यांची दमछाक होऊ नये म्हणून त्यांना ‘आता थांबा’ असं आपल्यालाच म्हणावं लागतं !

महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पत्रकार गृहरचना संस्था, अशा अनेक संस्था मध्ये त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. यातील संस्थांशी मी देखील निगडीत असल्याने त्यांची कर्तबगारी मला निश्चित माहिती आहे.

पुणे आकाशवाणी साठी त्यांनी केलेल्या कामाचा तपशील मला नव्हता. तो ते परवा कागदपत्र न पहाता सांगू शकले. आकाशवाणीसाठी त्यांनी ५५ कौटुंबिक श्रुतिका लिहिल्या. त्या सर्व प्रक्षेपित झाल्या. आकाशवाणीसाठी पोवाडे, वगनाट्य, क्रांतिकारकांविषयीची कवने, आणि लावण्या त्यांनी सादर केल्या.

दोघेही मुले, सुना, मुली आणि नातवंडाशी प्रत्यक्ष किंवा फोनवर ते बोलतात. त्यांचे हालहवाल, प्रगती विचारतात. गायक भीमसेन जोशी समवेत रामभाऊ नी आर्य संगीत प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करून गेल्या पाच दशकात तिला जागतिक ख्याती मिळवून दिली. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून संस्थेच्या विश्वस्तांनी काल रात्री त्यांच्या घरी येऊन त्यांना कै सौ वत्सला भीमसेन जोशी पुरस्कार-२०२० प्रदान केला. तो स्वीकारताना रामभाऊ अत्यंत समाधानी दिसत होते.

आता शतायुषी झाल्यानंतर कसं वाटतं ? असं विचारलं असता ते म्हणाले..…
“मी अत्यन्त समाधानी आणि कृतकृत्य आहे. जीवनाने मला भरभरून दिलं आहे. पत्रकार, लेखक आणि माणूस म्हणून जे काही करू शकलो त्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, प्रेम दिलं आणि या माझ्या शंभर वर्षांच्या वाटचालीत साथ दिली त्या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे. माझी पत्नी सुमन हिने वर्ष २०१२ मध्येच माझी साथ सोडली. ते मात्र जाणवत राहातं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे जे म्हणतात ते किती खरं आहे हे देखील जाणवतं.”

प्रा. डॉ. किरण ठाकुर

– लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. माननीय रामभाऊ जोशी यांस शतायुषिच्या दिना निमित्त आदरपूर्वक खूप खूप शुभेच्छा ! जोशींच्या संपूर्ण कार्यभरारीस मानाचा सलाम ! प्रा. डॉ. ठाकूर सरांनी सुंदर लेख सर्वां समोर आणला, खूप धन्यवाद सर !
    सौ. वर्षा भाबल.

  2. रामभाऊ जोशी एक द्रष्टा पत्रकार आणि संपन्न व्यक्तीमत्व!!
    त्यांना सादर प्रणाम!!

  3. सर्व गुण संपन्न व्यक्तीमत्व अशा रामभाऊ जोशी यांना
    शतशः प्रणाम !! आणखी आयुष्यात काय मिळवावयाचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments