शब्द दिलखुलास बोलतात, शब्द दिलखुलास हसतात, शब्दा शब्दातच असते अशी बिनधास्त ताकद जी सुखावते, फुलवते, मोहरते अन बहरतेही.
जिव्हेतून सुटून गेलेला शब्द भात्यातून सुटणाऱ्या बाणासारखा असतो, तो थेट जाऊन भिडतोच. त्याला माघारी येता येत नाही हे त्या शब्दांचं अपुरेपणच ! म्हणून जिव्हारी लागणारे शब्द खूप जपून आचरणात आणावे लागतात. द्वेष हा जणुं शब्दा शब्दातून व्हायरल होत असतो, आपल्या मनांतही नसतं पण नकळत घडून जातं, अंत असतो का हो त्याला ? जिंकलीस तू मैफिल ही पण हार कुणाची होती सांग साजणा ओठावरती गझल कुणाची होती ? असा प्रश्न आपसुकच पडतो !
शब्दांना रंग रूप असते का ? असा प्रश्न मला पडतो. इतके सारे रंग असताना जेंव्हा ते एकरूप होतात तेव्हा फक्त स्वच्छ पांढरा रंग त्यातून तयार होतो, तो तर शांतीचं प्रतीकच असतो ना ?
शब्दांचं निर्माल्य होतं का हो ? हा विचार रोज देवपूजा करून निर्माल्य जेंव्हा तुळशीच्या बुंधात सोडतो ना तेव्हा आजकाल मनाला छळत असतो.
शब्दाला जात पात धर्म असावा का ? हा ही मूलभूत प्रश्न शब्दांशी खेळताना पडतो. त्याला काही भगवा, पांढरा, हिरवा, तांबडा रंग असावा का ? ही सल मनांत खुपतेच !
शब्दांचा संस्कार होतो अन संसारही होतो. प्रेमाच्याच भाषेतला शब्द किती लाघवी असतो हो, नुसत्या शब्दावरच विश्वास ठेऊन आयुष्य पणाला लावण्याचा विचार सुचतो अन त्या शब्दबंधनात झोकुन स्वतःला विवाहबध्द होतो अन शब्दांच्याच शब्दांनी त्या सुरेख नवजीवनाची गोड गुलाबी सुरवात होते तेव्हा मूक शब्दच खूप बोलके असतात याची गोड गोड प्रचिती येत असते.ओठांची मोहर खोल ना ! किती लाडिक शब्द आहेत ना ?
मूक शब्दातल्या मूक भावना गहिरा अर्थ सांगून जातात.
शब्दातीत शब्दांनाही तेंव्हा जाणिवेचे अर्थ कळतात !
कढईतले कांदेपोहे जेंव्हा शब्दा शब्दातून एकमेकांना भेटतात, एकमेकांत मिसळतात तेव्हा त्या फोडणीचा आवडणारा खमंग सुवास त्या शब्दातुनच मनाला भिडतो अन तो चविष्ट नाश्ता शब्दा शब्दांनी चाखत माखत भरपेट खायचा मनमुराद आनंद आपण घेत असतोच ना ?
शब्दांच्या पलिकडले जेव्हा शब्दावाचुन कळते अन मग घडू नये ते घडते. होतं असं कधी कधी काय करणार त्याला ? पण त्यातही आनंदाचा गोडवा असतो म्हणे !
दैनिकांमधल्या शब्दकोड्यांना फुरसतीत सोडवणं म्हणजे खरं तर एक आनंददायी पर्वणीच असते जणु ! निवांत व्हावं हाती लेखणी घ्यावी अन अर्धा एक तास तरी शब्दछल करत जुळवा जुळव करत ते कोडं सोडवावं…………. याच्यासारखा अत्युच्च आनंद विरळाच ! तुम्ही कधी सोडवलंय का असं कोड ? प्रयत्न करून जरूर पहा अहो त्यातही आपल्या शब्द कौशल्याची, शब्दभंडाराची कसोटीच असते.
शब्दा शब्दांचा प्रवास जेंव्हा इंटरनेटवरून होत असतो तेव्हा आतुरलेल्या मनाला किती विरंगुळा मिळत असतो सांगू ? त्यात प्रेमाची आतुरता असते, दुःखावर फुंकर घालण्याचीही भावना असते, शेवटी शब्दच ते त्या शब्दांची भाषाच आडवळणाची वेगळीच असते.
शब्दा शब्दांनीच कविता होते, शब्दा शब्दांनीच गझल होते, पोवाडा होतो, स्फुर्ती गीत होते, विडंबन काव्य होते अन विराणीही होते………… अन त्या त्या शब्दांना अनमोल अर्थ लाभला की डोळेही पाणावतात. बाहू उफाळून गर्जना करू लागतात अन मनाच्या कोपऱ्यातला मोगराही आसवे गाळू लागतो. किती भावुक असतात ना हे शब्द निःशब्द झालेले जाणवतात. आता आणखी काय बोलायचं तेव्हा शब्दमर्यादाच संपलेली असते जणु ! शब्दांच्या घागऱ्यामध्ये शब्दांचाच डौल अनुभवावा, शब्दांच्या किनाऱ्या किनार्याने पुळणीवरचा मऊ मुलायम स्पर्श अनुभवावा, शब्दांच्याच सायंसंध्येमधे अबोली नारंगी रंगाचा सूर्यास्त पहावा, धुंद कुंद धुक्यात तर त्या शब्दांना किती थंडगार हुडहूडी जाणवत असेल ? कधी कधी पहाटे पहाटेस रेशमाच्या मिठीची जागही येत असेल, सजगता तेव्हाच कळते जाणवते अन अनुभवास ही येतेच येते !
उचलली जीभ लावली टाळ्याला, असे अविचारी शब्द सुद्धा नकळत सुटतात मग कसा आवरावा ? कसा सावरावा ? केलेला तो शब्द प्रयोग आवरता सावरता आपलीच तारांबळ उड़ते ! अशा शब्दांना सावरता संभाळता येत असत तर रामायण महाभारत घडलं नसत ना ?
शब्दसोंदर्याची खाण, शब्दा शब्दांच्या पर्वतातला प्रवास, शब्दांच्याच झऱ्यातून झंकारलेला दिडदा दिडदा, शब्दांच्या वाळवटीतून उडणारा शब्दांचा फूफाट पसारा किती आवरू किती सावरू सावरताना सावरत नाही अन आवरताना आवरतही नाही. सागर लाटांच्या गाजेतही शब्दांना एक समुद्री लय असते, त्या शब्दांचा धीर गंभीर एक वेगळाच नाद असतो, शांत रात्रीतल्या त्या लाटांच्या निर्माण होणाऱ्या आवाजातही, निनादातही शब्दांचं सौदर्य, गांभिर्य सुप्त मनाला जागृत करून जातं अन त्याचवेळी विराणीचे शब्दसूर अलवार कानावर पड़त असतात. काय शोधत असतो आपण त्या शब्दा शब्दात ? शब्दातित शब्दांमधून शब्दच फुंकर मारून जातात अन ते कळतही नाही हो आपल्याला ! ! !

– लेखन : सुनील शरद चिटणीस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800