‘महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन’द्वारे लोणावळा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘शरदचंद्र श्री २०२२’ या राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धेत अव्वल कामगिरी करत ८५ किलो वजनी गटात श्री.अमित साटम यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे
श्री. अमित साटम हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या गौरवामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.श्री. अमित साटम हे सन २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून ते दररोज ३ तास व्यायाम करण्यासह ५ किलोमीटर धावण्याचा देखील नियमित सराव करीत असतात.
श्री. साटम हे गेली ५ वर्षे विविध शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित असून एप्रिल २०२२ मध्ये पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या १० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश होता. तर अनेक जिल्हास्तरिय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत त्यांनी विविध पुरस्कार पटकाविले आहेत.
शालेय व महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबियांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील वरिष्ठांना व सहका-यांना दिले आहे.
श्री साटम यांच्या या यशाबद्दल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी व सुरक्षा दल खात्याचे प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री. अजित तावडे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800