नंदुरबार जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न व भविष्याच्या दृष्टीने अमाप संधी असलेला जिल्हा आहे. देशात असे फारच थोडे जिल्हे आहेत. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांची एकजूट साधली, तर हा जिल्हा कृषी क्षेत्रात देशपातळीवर अग्रगण्य ठरू शकतो, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी नुकतेच केले.
नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा येथे आयोजित ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन आणि त्याअंतर्गत पार पडलेल्या शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

श्री नमन गोयल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने आयोजित करण्यात येणारे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन हे लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या प्रदर्शनामुळे शेतकरी, नर्सरी, कृषी तज्ज्ञ, उद्योजक, विविध संस्था व बाजारपेठ यांच्यात थेट संवाद साधला जात असून आधुनिक शेतीतील नवतंत्रज्ञान, उत्तम पद्धती, एकात्मिक शेती व बाजार व्यवस्थापन यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेला व उत्पन्नवाढीस होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नंदुरबार जिल्ह्याच्या कृषी वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधताना गोयल म्हणाले की, शहादा व नंदुरबार तालुक्यात केळी, पपई, कापूस यांसारखी व्यावसायिक पिके घेतली जातात, तर धडगाव व अक्कलकुवा भागात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी पिकपद्धती विकसित झाली आहे. तापी व नर्मदा नद्यांचे खोरे, सुपीक माती आणि अनुकूल हवामान यामुळे नंदुरबार जिल्हा कृषीच्या दृष्टीने गॉड गिफ्टेड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासन व कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सोलर पंप योजना, मशरूम क्लस्टर, एकात्मिक शेती पद्धती, एफपीओ (शेतकरी उत्पादक कंपन्या), सेंद्रिय शेती व फूड प्रोसेसिंग या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील काळात एक्सपोर्ट, ग्रेडिंग, क्वालिटी टेस्टिंग व सर्टिफिकेशन यावर अधिक भर देण्यात येणार असून जिल्ह्यात लवकरच फूड टेस्टिंग लॅब सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव :
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शेती विषयातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना गौरविण्यात आले. हे पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत…
ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक पुरस्कार :
मधुकर तुकाराम पाटील (शहादा), जितेंद्र अर्जुन पाटील (शहादा), माधव उदेराज माळी (दुधाळे), राजाराम नथू पाटील (कोळदा) व विश्वनाथ तांबडू पाटील (कुडावद).
ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट पुरस्कार :
बलराम शेतकरी गट, तळोदा (उमेश विजय पाटील) व महात्मा फुले शेतकरी गट, वडफळी (दिलवरसिंग कलाश्या पाडवी)
ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्कार :
धर्मेंद्र पंडितराव पाटील (बोराळे), मनोहर धनराज पाटील (खलाणे), भरत बाबुलाल पाटील (तिखोरे), नरेंद्र हिमतसिंग गिरासे (जावदा तर्फे बोरद), पुरुषोत्तम संभू पाटील (मामाचे मोहिदे), सेगा राजमापटले (कुंभरी) व योहान अरविंद गावित (भवरे).
ॲग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर प्रोड्यूसर कंपनी पुरस्कार :
अविनाश पाटील (पातोंडा) व मनोज पाटील (वावद).
ॲग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन पुरस्कार :
तालुका धडगाव येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती , पिपळखुट. सागर निकुंभे – शहादा
ॲग्रोवर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार :
ग्रामपंचायत बामखेडा मनोज चौधरी, ग्रामपंचायत तळवे मोग्सा कृष्णा भिल, ग्रामपंचायत मोरखी मिलन बंडू वळवी, ग्रामपंचायत कात्री संदीप वळवी व ग्रामपंचायत हरनखुरी अर्जुन पावरा.
ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी विस्तारक पुरस्कार :
जितेंद्र रोहिदास सोनवणे व संदीप देवसिंग कुंवर.
— टीम एन एस टी. ☎️9869484800
