सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर, जे असाध्य तेथे मन धावे
प्रसिद्ध कवयित्री प्रा. शांता शेळके यांच्या जन्म शताब्दीस आज सुरुवात होत आहे. या लेखाच्या सुरुवातीला नमूद केलेल्या ओळी शांताबाईंच्या कवितेतील आहेत. माझ्या पिढीतील अनेकांनी त्या पाठ्यपुस्तकात वाचलेल्या असणार.
शांताबाईंनी लिहिलेल्या ‘तोच चंद्रमा नभात …’ किंवा ‘जिवलगा…’ या अत्यंत लोकप्रिय भावगीताची अथवा ‘काटा रुते कुणाला …’ या नाट्यगीताची आठवण येण्यापूर्वीच कधीतरी वाचलेल्या कवितेच्या या ओळी आपोआपच मनात जाग्या झाल्या. हा त्या धावत्या मनाचाच महिमा..!
ग्रामीण भागात जन्म झालेल्या शांताबाईंना वाचनाची, त्यातही काव्यवाचनाची उपजत आवड होती. ही आवड कशी जोपासली गेली हे त्यांनी एका मुलाखतीत फार छान सांगितले आहे. त्यांच्या त्या कथनात त्यावेळेचे सामाजिक वास्तव आपोआपच अधोरेखित झाले आहे. आयुष्याची वाटचाल त्यांच्या छान, सुबोध आणि रसाळ शैलीत मांडताना त्यांनी त्या मुलाखतीत त्यांचे पुणे आणि मुंबईतील वास्तव्य गीत लिहिण्याची मिळालेली संधी मंगेशकर परिवाराशी असलेली मैत्री याबद्दल सांगितले आहे. कविता आणि भावगीत, भावगीत आणि चित्रपटगीत अशा मुद्यांवर त्यांची अनुभवसिद्ध मतं मांडली आहेत. त्यांच्या व्यासंगाचा आणि पाठांतराचा वेळोवेळी उल्लेख झाला आहे. त्यांची ती मुलाखत ऐकताना आणि त्यांचे लिखाण वाचताना प्रत्यय येतोच.
कविता मनातून कागदावर उतरतानाच एकप्रकारे कारागिरी सुरू होते हे त्यांचे मत. कविता आणि भावगीत यात कवी आत्मनिष्ठ राहू शकतो आणि पुष्कळदा राहतोही. मात्र हे स्वातंत्र्य चित्रपट गीतं लिहिताना मिळत नसते. तेथे प्रसंग आणि त्या प्रसंगाची मागणी याच्याशी सांगड जुळवावी लागते, हे त्यांनी फार छान सांगितले आहे.
काव्य, व्यक्तिचित्रण, अनुवाद, संपादन, सदर लेखन असे विपुल आणि बहुरंगी लिखाण त्यांनी केले. मला त्यांनी लिहिलेली सदरं आजही फार वेधक आणि वाचनीय वाटतात. त्यांचा नव्याजुन्या साहित्याचा व्यासंग, त्यांचे पाठांतर, त्यांची स्मरणशक्ती आणि आकर्षक शैली ही सारी वैशिष्ट्ये त्यात प्रतिबिंबित झालेली आहेत.
‘ ललित ‘ मधील त्यांच्या सदराचे ‘एकपानी ‘ हे संकलन प्रसिद्ध आहे. त्यात एका पानाच्या चौकटीचे बंधन पाळताना लिखाण कुठेही कृत्रिम झाल्यासारखे वाटत नाही . ‘ महाराष्ट्र टाइम्स ‘ मधून त्यांनी ‘ जाणता अजाणता ‘ हे सदर लिहिले. ते फार गाजले. तेव्हा एक वाह्यात वळणाचे हिंदी गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्याचा संदर्भ देत त्यांनी त्या सदरात चोळीगीतांवर लिहिले होते.
‘ कविता स्मरणातल्या ‘ या सदराचे संकलन आजही कोणत्याही पानावरुन वाचण्यास सुरुवात करता येते. त्यात ‘ अजुनि चालतोची वाट माळ हा सरेना ‘ ही रेंदाळकरांची कविता भेटते आणि हे संकलन चाळताना ‘ विसरशील खास मला ‘ ही ज.के.उपाध्ये यांची कविता दिसली की कानात आशाताईंच्या आवाजातील ते गाणे आपोआपच सुरू होते !
शांताबाई शेळके आणि अरुणा ढेरे यांनी संपादित केलेला मराठी प्रेमकवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे.त्यात १८८५ ते १९७५ (केशवसुत ते प्रभा गणोरकर) या ९० वर्षाच्या कालखंडातील ११२ कविता आहेत. या संकलनाला ३४ पानांची प्रस्तावना आहे. ती संतकाव्य ते नवकाव्य असा आलेख रेखाटते.अर्थात ही प्रस्तावना दोघींची आहे. मराठीतील हा एक उत्तम काव्यसंग्रह आहे.
भावगीत, चित्रपट गीत किंवा नाट्यगीत लिहिले जाताना इतरांचा हातभार कसा लागतो किंवा आपण कुठे काही ऐकले – वाचले असते , त्यात त्याचे कसे बीज असते हे शांताबाईंनी फार प्रांजळपणे सांगून ठेवले आहे. ‘तोच चंद्रमा नभात..’ संदर्भात त्या संस्कृतातील काव्याचा उल्लेख करतात. ‘ जिवलगा ‘ मधील जिवलगा हा शब्द हृदयनाथ मंगेशंकरांनी सुचवल्याचे त्यांनी सांगितले आहे, तर जितेंद्र अभिषेकी यांनी एक शेर ऐकवला आणि त्यातून ‘ काटा रुते कुणाला ‘ हे जन्माला आल्याचे त्यांनीच सांगितले आहे.
मागे बडोद्यात किंवा अन्यत्र कोठेतरी काव्यसंमेलन किंवा तत्सम कार्यक्रमात त्यांचे कवितेबद्दल सुंदर भाषण झाले होते. ते वर्तमानपत्रांतून तपशिलाने प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे वाचायला मिळाले. मात्र आळंदीत झालेले त्यांचे अध्यक्षीय भाषण बरेच आत्मपर होते. त्यात त्यांचे संस्कारधन सांगताना त्यांनी बराच वेळ घेतला होता.
१९९२ साली त्या दिवाळीच्या आसपास औरंगाबादला आल्या होत्या. तेव्हा त्यांना भेटण्याचा योग आला होता.
प्रत्येक माणसापाशी एक व्यक्तिमत्त्व असते. ते त्याच्या बोलण्यालिहिण्यातून जाणवत असते. शांताबाईंचे व्यक्तिमत्त्व आणि त्याचे ठसठशीत मराठी वळण कायम जाणवत राहाते. ते केवळ पेहरावातील नाही आणि तसे पारंपरिकही नाहीच. मात्र ते येथे पक्के रुजलेले. यात त्यांना लाभलेल्या श्री. म.माटे यांच्या सारख्या शिक्षकांचा, आचार्य अत्रे यांच्या सारख्या संपादकांचा प्रभाव असणार. त्यांना अभिवादन.

– लेखन : राधाकृष्ण मुळी
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800