मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा पुरस्कार कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार, यावर्षी श्री. नितीन बिनेकर (ईटीव्ही भारत) यांना जाहीर झाला आहे.
मंत्रालयात मी माहिती संचालक पदावर असताना, मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या सहकार्याने सुरू केलेल्या प्रायोगिक अधिवासीता उपक्रमात नितीन बिनेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांची वाटचाल अत्यन्त गौरवास्पद आहे.
अल्प परिचय
नागपूर जिल्ह्यातील वाकोंडी गावातून पत्रकारितेत काम करायचं या ध्यासाने देशोन्नती या स्थानिक वृत्तपत्रात आणि यूसीएन, जीटीपीएल वृत्तवाहिनीत नितीन यांनी पत्रकारितेचे बाळकडू घेतले. त्यानंतर, लाखो जनांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या मायानगरीत जाऊन पत्रकारिता करावी या ध्यासाने सहा वर्षांपूर्वी मुंबई गाठली. त्यानंतर प्रख्यात लोकप्रिय अशा टाटा समूहाची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात संहिता लेखक म्हणून काम केले.
त्यानंतर, हिंदी वृत्तपत्र दबंग दुनिया, मराठी वृत्तपत्र आपलं महानगर मध्ये वाहतूक सेवा, रेल्वे, बेस्ट अशा विविध क्षेत्रांचे वृत्तांकन केले.
पत्रकारितेतील विविध अनुभवानंतर नव्या युगातील मोबाईल पत्रकारितेचा पायंडा घालणाऱ्या १६ विविध भाषांत प्रसिद्ध असणाऱ्या ‘ई टीव्ही भारत’ या डिजिटल समूहात गेल्या वर्षभरापासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहे. या समूहात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट, रिक्षा-टॅक्सी, मजूर, रेल्वे, जल-वायू वाहतूक सेवा, सामाजिक, दिव्यांग घटक अशा विविध क्षेत्रातील वार्तांकन ते करत आहेत.
मागील दोन वर्ष कोरोना काळात या विविध क्षेत्रात वार्तांकन करत असताना माणूस म्हणून वेगळ्या जाणिवांनी जगण्या- घडण्याची संधी पत्रकारितेने त्यांना दिली आहे.
या वर्षीचे अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :
1. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री. देवेंद्र कोल्हटकर (झी 24 तास)
2. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त ठरणाऱ्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणाऱ्या पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक : श्री. शामसुंदर सोन्नर (ज्येष्ठ पत्रकार).
3. विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार : श्री. मुकेश माचकर (कार्यकारी संपादक `मार्मिक’)
4. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार : श्री. समीर मणियार (दै. महाराष्ट्र टाईम्स)
5. `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा पुरस्कार : सीमा महांगडे (दै. लोकमत)
न्या. मृदुला भाटकर यांच्या हस्ते दि. 6 जानेवारी रोजी सायं. 6.00 वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई 400 001 येथे हे पुरस्कार प्रदान केले जातील.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800