Home लेख शाब्बास स्मिता…

शाब्बास स्मिता…

0

मी मुंबई दूरदर्शन मध्ये असताना, काही काळ प्रेझेंटेशन युनिट मध्ये होतो. ज्येष्ठ निर्माते मनोहर पिंगळे साहेब आमचे विभाग प्रमुख होते. अतिशय कडक, शिस्तशीर पण वेळ प्रसंगी खुप काळजी घेणारे, असा त्यांचा स्वभाव होता. तर साप्ताहिकी फेम अरविंद मर्चंट साहेब, दूरदर्शन चे देवानंद समजले जाणारे सुधीर पाटणकर साहेब हे निर्माते होते. ते सुरेश गोकाणी, राम खाकाळ, सुनिता गोडबोले, जयू भाटकर असे आम्ही सहकारी होतो.

शिपाई पदावर असलेला पण प्रत्यक्षात मोठे प्रस्थ असणारा प्रभाकर म्हणजे तर बोलायलाच नको ! पण एक होते, १२/१४ जणांच्या प्रेझेंटेशन युनिट मध्ये नेहमी खेळीमेळीचे वातावरण असे. कुणी अचानक येऊ शकत नसल्यास इतर त्याची जबाबदारी पार पाडायला तत्पर असत.

रोजचे प्रसारण व्यवस्थित होईल हे पहाणे, निवेदिकेने लिहिलेले निवेदन तपासणे, आवश्यकता असल्यास त्यात दुरुस्त्या करणे, कंट्रोल पॅनल वर कार्यक्रम चेंज ओव्हर पहाणे, असे सर्व काम प्रेझेंटेशन युनिट चे असायचे.

१९८८ साली काही नवीन निवेदिका घेतल्या गेल्या. या नवीन निवेदिकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी
साहजिकच प्रेझेंटेशन युनिट वर होती.

खरं म्हणजे तेव्हा दूरदर्शन वर मुंबई, पुणे येथील लोकांची जणू मक्तेगिरी होती. या पार्श्वभूमीवर सांगली येथून आलेली लहान चणीची, अवखळ असणारी, स्मिता या नावाप्रमाणेच चेहऱ्यावर सदैव स्मित असणारी, हसण्याची थोडी जरी संधी मिळाली, तरी खळखळून हसणारी एक निवेदिका होती, स्मिता पाटील. (पुढे लग्नानंतर ती स्मिता गवाणकर झाली !)

ती सांगली सारख्या ठिकाणाहून येऊन निवडल्या गेली, याचे आम्हाला खूपच अप्रूप वाटायचं. तिची अघोषित स्पर्धा ही मुंबईत जन्मलेल्या, वाढलेल्या इतर निवेदिकेंशी असायची. आम्ही ही एकमेकांशी बोलताना कोण निवेदिका कशी आहे, त्यांचे गुणदोष, उच्चार अशा बाबींची चर्चा करीत असू. त्या वेळी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असायची. थोडी जरी काही चूक झाल्यास प्रेक्षकांचे फोन यायला लागायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजताच्या दैनंदिन कार्यक्रम बैठकीत चर्चा व्हायची. कित्येकदा वृत्तपत्रांमध्ये बातम्या ही छापून यायच्या. या सर्व गोष्टींचे आमच्या वर अतिशय टेन्शन असायचे. या सर्व गोष्टींना बोलता बोलता ३५ वर्षे झाली. असो….

एक मात्र खरे, त्या वेळच्या निवेदिका आता कुठे आहेत ? याचा शोधच घ्यावा लागेल. पण एक चेहरा सतत ३५ वर्षे, दूरदर्शन कार्यक्रम, मुलाखती, विविध स्टेज शो च्या माध्यमातून दिसत राहिलाय, तो आहे या स्मिता चा ! या सातत्य पूर्ण कामगिरी बद्दल तिचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच.

पण या शिवाय तिचे अधिक कौतुक मला वाटते, ते म्हणजे आज इतकी मोठी, लोकप्रिय होऊनही स्मिता चा स्वभाव काही बदलला नाही. पैसा, प्रसिध्दी, मान सन्मान या गोष्टींमुळे तिच्यात काही फरक पडला नाही. अजूनहि काही कार्यक्रमानिमित्त भेट झाली की, तेच सहज, अवखळ वागणे बोलणे पाहून मधे गेलेली इतकी वर्षे जणू एका क्षणात गायब होतात !

तर अशा या स्मिता पाटील गवाणकरला वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा.
स्मिता, जशी आहे, तशीच रहा. नवनवीन शिखरे गाठ या मनःपुर्वक सदिच्छा.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version