(लेखिका या शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून मुलांच्या घरी शिकवणी घेत असतात)
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.शाळा व शिक्षक आपापल्या परीने शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना मुलांनी मागे पडू नये म्हणून शिक्षण सुरु आहे.
पण……….ऑनलाईन शिक्षणाचा खरंच फायदा आहे का ? बरं ते सर्वच मुलांना सोईचे आहे का ? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे !
सर्व मुलांची बुद्धिमत्ता सारखी नसते. काही हुशार व चिकाटीने अभ्यास करणाऱ्या मुलांना हे शिक्षण ठीक आहे. पण…….. मग इतर मुलांचे काय ? त्यांचा कोणी विचार केला का ? त्यांचे तर न भरून येणारे नुकसान होत आहे.
आपला जीव महत्वाचा आहे हे मान्यच आहे मात्र जर इतर सर्व गोष्टी जसे की मंदिर, मॉल, बाजारपेठ, चित्रपट गृह, प्रेक्षणीय स्थळ चालू आहेत व तेथेही मुलांचा मोठया संख्येने वावर आहे तर शाळा बंद करणे हे कितपत योग्य आहे ?
कडक नियम आखून अथवा किमान ५०% हजेरी लावून किंवा एक दिवस आड का असेना शाळा चालू राहिल्या पाहिजेत. शाळा बंदच करणे हा उपाय असू शकत नाही.
शिक्षक अगदी तळमळीने सांगत आहेत कारण त्यांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे म्हणून ते स्वस्थ बसू शकत नाही. त्यांचे कर्तव्य ते चोख निभावत आहेत. शिक्षक हे पालकांसाठी व मुलांच्यासाठी खूप मोठा आधार असतात व तेच मुलांना घडवत असतात.
मुलांना नापास करायचे नाही म्हणून ती पुढील वर्गात तर जात आहेत पण ज्ञानात कोणतीही भर नाही, त्यांची शैक्षणिक क्षमता वाढत नाही त्यांना फार काही येत नाही अथवा जे ऑनलाईन शिकवले ते समजत नाही. आणि हो, हे स्वतः मुलं अगदी प्रांजळपणे, निरागसपणे कबुलही करत आहेत. आपल्याला काही येत नाही या विचाराने अनेक मुलं खूप निराशावादी झाली आहे जणू त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. तो पुन्हा जागृत करण्यासाठी शिक्षक हेच मार्ग दाखवू शकतात. या महामारीमुळे जणू शिक्षणाचे महत्त्व कमी झाले आहे !
लहान मुलं एका जागेवर तास भर ही स्थिर बसत नाही. सर्व वेळ रडण्यात जात असेल तर मग त्यांची अक्षर ओळख व पुढील शिक्षणाचे काय ? हा दिवसेंदिवस गंभीर होणारा प्रश्न आहे.
तर…….. काही मोठी मुलं अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल हातात घेऊन तासनतास अनेक गेम्स व व्हिडिओस पहात आहे. जणू त्यांना या मोबाईलचे व्यसन लागले आहे. त्यांना त्यातून बाहेर काढणे जिकीरीचे झाले आहे.
पालक हतबल झाले आहेत. ते तरी किती लक्ष देणार ?त्यांना देखील त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यांची कामं आहेत. आधीच या महामारीमुळे सर्वांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसायही आधी सारखा राहिलेला नाही आणि त्यात भर म्हणजे मुलांची शैक्षणिक चिंता.
मध्यंतरी शाळा चालू झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा तेच……पहिले पाढे पंच्चावन !
अनेक मुलांना तर साध्या गोष्टी लिहिता अथवा वाचता ही येत नाही. अक्षरशः तिसरीतील मुलांना पहिलीचे शिक्षण द्यावे लागत आहे. ते आधीच्या अनेक गोष्टी विसरून गेल्या आहेत. मग सांगा शिक्षकांनी कसे शिकवायचे ? जर मुलांचा पाया पक्का नसेल, लहान गोष्टी जमत नसतील तर भविष्यात त्यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे व पुढे कितीही प्रयत्न केले तरी ही दरी वाढत जाणार आहे. आपण वेळीच सावध झाले पाहिजे.
या परिस्थितीमुले मुलांचे फक्त शैक्षणिकच नव्हे तर मानसिक व शारीरिक नुकसानही झाले आहे व होत आहे.सतत त्या मोबाईल मुळे डोळ्यांवर ताण येत आहे. अनेक तास एकाच जागी बसल्यामुळे पाठ व मानेचेही दुखणे मागे लागले आहे.
आजची मुलं हीच तर उद्याचे भविष्य आहे.जर त्यांच्यातील आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, अभ्यासाची गोडी, शिक्षकांचा धाक व शिस्त नाहीशी झाली तर याचा सारासर व विचारपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतला पाहिजे.
ज्या मुलांनी आजपर्यत कधी शाळाच पहिली नाही त्यांना जणू शाळेची उद्या भीती बसू शकते. मोठी मुलं देखील शाळेत जाण्याचा कंटाळा करत आहेत.कधीही न मिळालेल्या एवढ्या मोठया सुट्टीचे त्यांना दडपण जाणवत आहे. त्यांची एकाग्रता कमी झाली आहे.
सतत त्या मोबाईल मध्ये अडकून स्वतःचे त्यांचे एक वेगळेच विश्व निर्माण झाले आहे. त्यांचे बालपण जणू हरवून गेले आहे.
ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षकांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे अशक्य आहे. ज्या मुलांना समजत नाही ते आपल्या अडचणी, शंका विचारू शकत नाही. त्याचा त्यांना प्रचंड मानसिक त्रास होतो पण ते बोलू शकत नाही. शब्दात व्यक्त करता येत नाही अथवा कोणालाही स्पष्ट सांगू शकत नाही. मनात चाललेली घालमेल त्यांना ही कळत नाही त्यामुळे ती अतिशय चंचल, बिनधास्त, बेफिकीर अथवा काही मुलं खूपच शांत, अबोल झाली आहेत असा विरोधाभास दिसत आहे.
मित्र मैत्रिणीच्या संपर्कात राहिल्यामुळे शाळेत मनावर कोणते ओझे नसते. फारसा ताण जाणवत नाही. शाळेत हसत खेळत, हलके फुलके वातावरण असते अशा वेळी शिक्षणाचे ओझे वाटत नाही.
या ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे खेळ व शारीरिक हालचाल राहिलेली नाही. तो संवाद, त्या खोड्या, तो निरागसपणा हरवत चालला आहे. अनेक मुलं स्वतःच्या तंद्रीत असताना आजूबाजूला काय चालले आहे हेही त्यांच्या लक्षात येत नाही व त्याचे गांभीर्य ही नाही. त्यांच्या त्या गप्पा गोष्टी, दंगा मस्ती, ते चिडवणे, ते बोलणे, ते भांडणे, एकत्र बसून डब्बा खाणे सर्व बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्या भावना व्यक्त होत नाही व ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. भविष्याची चिंता नाही, स्वप्न नाही त्यामुळे आज त्यांच्या क्षमतेचा विकास होत नाही.
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शिकवण्यात खूप फरक असतो. प्रत्यक्ष शिकवल्यामुळे शिक्षकांचे व मुलांचे नाते पक्के होते. एक अदृश्य नाळ जोडलेली असते व मुलं शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांना वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे उल्लेखनीय कामगिरी करत असतात. एका सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते जी मुलांच्या शैक्षणिक दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे.
शिक्षक हे एकमेव माध्यम आहे जे मुलांकडून अभ्यास करून घेऊ शकतात. त्यांच्या कलेने त्यांना समजून सांगू शकतात. ही एकमेव ज्योत आहे जी मुलांना त्यांच्या आभासी दुनियेतून मानसिक परिवर्तन घडवू शकतात. त्यांना नैराश्याच्या अंधकारातून मुक्त करू शकतात.
या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे नाहीतर फक्त वय वाढेल. पुढील वर्गात प्रवेश देखील मिळेल मात्र मुलांच्या बुद्धिमत्तेत कोणतीही वाढ दिसणार नाही.
ही मुलं म्हणजे उद्याचे वृक्ष आहे जर त्यांची मुळं पक्की नसतील तर ते भविष्यात स्पर्धेत कसे टिकतील ? संकटांचा सामना कसे करतील ? जर त्यांच्याकडे सामान्य ज्ञान नसेल तर ते असामान्य कामगिरी कसे साधू शकतील ? स्वतःचे यशस्वी विश्व, निरोगी शारीरिक व मानसिक आरोग्य कसे मिळवू शकतील ?
या सर्व गोष्टींमध्ये एक सुवर्ण मध्य काढण्याची गरज आहे. हळूहळू का असेना पण मुलांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने समतोल साधला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना मुलांचे हित कशात आहे फक्त याच गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अतिशय चिकित्सक आणि सखोल अभ्यासपूर्ण लेख, शिक्षण व्यवस्था, शिक्षकांची गरज, शाळेची गरज आणि देशाचे भवितव्य ज्यांच्या हाती उद्या पोहोचणार आहे त्या विद्यार्थ्याच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण लेख आहे. मॅडम आपले हार्दिक हार्दिक आभार….*****💐💐💐