Saturday, July 5, 2025
Homeपर्यटनशाश्वत ‘कृषी पर्यटन’

शाश्वत ‘कृषी पर्यटन’

सध्याच्या कोरोना व इतर विषाणु संसर्गाच्या काळात जगभरात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून कृषी पर्यटनातूनच पर्यावरण सुलभ आणि शाश्वत पर्यटन साध्य केले जात आहे.

वाढते नागरिकीकरण, कोरोनासारख्या आजारातून वाढत जाणारा मानसिक ताणतणाव या पार्श्वभूमीवर कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात मोठी संधी असणार आहे. स्वच्छ मोकळे वातावरण, ग्रामीण- जीवन अनुभव, विविध परंपरा, सण-उत्सव, खाद्यपदार्थ याबरोबरच ‘हुरडा पार्टी’ यासारख्या नवीन एकदिवसीय पर्यटन आणि ग्रामीण अनुभव देणारी संकल्पना मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात लोकप्रिय होताना दिसते.

मराठवाड्यात उद्योग व पर्यटना बरोबरच कृषी पर्यटन हा व्यवसाय नव्याने उभारी घेत आहे. मराठवाडा विभागात जागतिक वारसा स्थळे व पर्यटन केंद्र, लेण्या, किल्ले, वास्तू आहेत, देशात कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे ‘महाराष्ट्र हे पहिले राज्य’ आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व कृषी विभाग पर्यटन विषयातील माहितीचा व ज्ञानाचा उपयोग करुन महिला शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात चालना देण्यासाठी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने राबवित आहे.

कृषी पर्यटन ही एक नवी संकल्पना असून, कृषी पर्यटनामुळे अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होत आहे. शेती आणि पर्यटनाच्या संगमातून केवळ रोजगार संधीच निर्माण होत नाहीत तर ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला चालना मिळते. कृषी पर्यटनाला चालना देताना या क्षेत्रातील घटकांचे, विशेषत: महिलांच्या कौशल्य विकास, प्रशिक्षण करण्यावर भर देण्याचे शासनाचे धोरण आहे. येत्या काळात कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार 2021 च्या चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आला असुन तो कृषी पर्यटनाला नक्कीच उभारी देणारा ठरणार आहे.

पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीसह देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भर टाकण्याची क्षमता असल्याने त्या अनुषंगाने राज्यात पर्यटनाच्या विविध क्षेत्रांना चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण जाहीर केल्यानंतर राज्यात काही कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांना रोजगाराची प्रेरणा मिळाली.

मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यात एकूण 28 कृषी पर्यटन केंद्र आहेत. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 14 कृषी पर्यटन केंद्र असून यातील आठ पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. प्रामुख्याने सृष्टी कृषी पर्यटन केंद्र मिर्झापूर नगर रोड औरंगाबाद, चैतन्य कृषी पर्यटन केंद्र, वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र वडगाव जाधव, याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

कृषी पर्यटनाच्या विकासासाठी यापुढील काळातही व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असून शेतीचा जोडव्यवसाय म्हणून कृषी पर्यटन विकसीत होत आहे.

कृषी पर्यटन धोरणाने महाराष्ट्रात कृषी पर्यटन विकसित व्हावे यासाठी होतकरू शेतकऱ्यांना उत्तम मार्ग दाखवला असुन धोरण राबवल्यापासून संबंधीत शेतकऱ्यांनी आपल्या रोजगारात २५ टक्के वाढ झाल्याचे अनुभवले. राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांवर २०१८, २०१९ आणि २०२० साली अनुक्रमे ४.७ लक्ष, ५.३ लक्ष आणि ७.९ लक्ष पर्यटक भेट देऊन गेले. या पर्यटक भेटींमधून शेतकऱ्यांना ५५.७९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.

पुणे, रायगड, सातारा, औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यांमध्ये कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनावर नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत बदल झालेला आहे.

राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटन विकासासाठी प्रायोगिक तत्वावर ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’ नेमण्याबाबत कार्यवाही कऱण्यात येत आहे, तसेच पर्यटन विकासासाठी खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

राज्यात कृषी विभागाच्या ३० टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर करुन राज्याने या क्षेत्रात आघाडी घेतली. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे कृषी पर्यटनाला देशात व राज्यात मोठा संधी आहे. इटली, स्पेनसह विविध युरोपीयन देश, अमेरिका आदी ठिकाणी कृषी पर्यटनात विविध प्रयोग केले जात आहेत. गावाचे गावपण, संस्कृती, विचार परंपरा, उत्सव, खाद्यपदार्थ हे ग्रामीण पर्यटनाचे घटक बनले असून निस्वार्थी शेतकरी स्थायीभाव, आदरातिथ्याची जोड, शिक्षण व तंत्रज्ञानाची साथ, महिलांचा सहभाग यामुळे ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव आहे.

कोरोनोत्तर काळात या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली आहे. यामुळे कृषी पर्यटन हे पर्यटन विकासात शाश्वत योगदान देणारे पर्यटन म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे.

– लेखन : मीरा ढास. माहिती अधिकारी, औरंगाबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments