पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात नुकत्याच झालेल्या तीन दिवसीय शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या संमलेनावर आधारित “शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित” हा वृत्तान्त आपण काल वाचला असेलच. तो वृत्तान्त लिहीत असतानाच “या संमेलनामुळे माझा व्यक्तिगत लाभ काय झाला ?” यावरही त्या वृत्तांतात लिहावेसे वाटू लागले. पण शेवटी लक्षात आले की एकच खूप मोठा वृत्तांत लिहिण्यापेक्षा आणि या संमेलनामुळे माझा झालेला व्यक्तिगत लाभ हे दोन्ही विषय वेगळे असल्याने, या वर स्वतंत्रपणे लिहिणे योग्य ठरेल. म्हणून हा लेखन प्रपंच. असो.
माझा स्वभाव असा आहे ना की, मला लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, हितगुज करणे आवडते. म्हणून मी काय करतो की, कुठल्याही गावात जाणार असेल तर त्या त्या गावातील नातेवाईक, मित्रमंडळी, स्नेही, परिचित आणि आता गेल्या चार वर्षांपासून आपल्या पोर्टल चे लेखक, कवी, वाचक, हितचिंतक यांना व्हॉट्स ॲपवर एक संदेश पाठवून त्या गावात कुठे, किती दिवस असणार आहे इतकेच कळवितो. त्यामुळे ज्यांना शक्य असते, अशी मंडळी फोन वर बोलून भेटण्याची वेळ ठरवून घेतात आणि मग छान गप्पागोष्टी होतात. असेच मी पुण्याच्या संमेलनाला जाताना केले आणि कोण कोण भेटले, विशेषत: निवृत अधिकारी, सहकारी, पोर्टलचे लेखक, कवी यांचा लेखाजोखा मांडत आहे.
खरं म्हणजे, संमेलनाच्या तीनचार दिवस आधीच मी उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात आठवडाभर राहून आलो होतो. त्यामुळे लगेचच परत तीन दिवस बाहेरगावी राहण्याची माझी इच्छा नव्हती. पण आपल्या मिशन आयएएस चे प्रमुख प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांचा फोन आला की, ते या संमेलनासाठी अमरावती येथून निघाले आहेत आणि मी पण तिथे यावे. त्यामुळे मी ही ठरविले की आपण ही जाऊ या आणि फक्त जाण्यापेक्षा आपण लिहिलेली, प्रकाशित केलेली पुस्तकेही तेथील पुस्तक प्रदर्शनात ठेवू या. म्हणून मग तिथे काय व्यवस्था आहे, कुणाशी बोलले पाहिजे, यासाठी माझे सहकारी जिल्हा माहिती अधिकारी श्री रवींद्र ठाकूर यांच्या कडे चौकशी केली. त्यांच्या कडून आमचे माजी सहकारी आणि आता बाल भारतीचे संपादक श्री किरण केंद्रे यांचा संपर्क क्रमांक मिळाला. अनायासे ते संमेलन आयोजन समितीचे सदस्य ही होते त्यामुळे काम खूपच सुकर झाले. त्यांच्या कडून पुस्तक प्रदर्शन आणि विक्री बघणारे श्री अनिकेत यांचा संपर्क क्रमांक मिळाला. ते ही मनापासून सहकार्य करणारे निघाल्याने पुढील सर्व बाबी सहज मार्गी लागल्या.
पहिल्या दिवशी पोचेस्तोवर संध्याकाळचे सात वाजले. रंगमंदिरातील कला दालनात पाऊल आणि पुस्तकांची मोठी बॅग ठेवताच सात वाजले म्हणून लाईट बंद करण्यात आली. त्यामुळे ती रात्र कुणालाच न भेटण्यात गेली.
दुसऱ्या दिवशी मी पुस्तके लावण्यासाठी कला दालनात गेलो तर तिथे माजी सनदी अधिकारी, चाणक्य संस्थेचे प्रमुख श्री अविनाश धर्माधिकारी यांची भेट झाली आणि माझ्या “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाविषयी छान बोलणे झाले.
मुख्य सभागृहात आल्या वर तिथे मी अलिबाग येथे १९९१ ते १९९३ दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी असताना, तेव्हाचे जिल्हा पुरवठा अधिकारी असलेले, अतिशय निस्पृह, शिस्तप्रिय असे श्री माधव चिमाजी साहेब आणि माझी अलिबाग हून मुंबई येथे बदली झाल्याने, माझ्या जागी आलेले श्री विजय पवार या दोघांची एकत्रच भेट झाली. जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही चहा घेतला, एकत्रित फोटो काढला आणि सभागृहात संमेलनाच्या शुभारंभासाठी जाऊन बसलो. कार्यक्रम सुरू व्ह्यायचा, तितक्यात मी नगर कॉलेज ला शिकत असतानाचे मित्र, पुढे उपजिल्हाधिकरी झालेले श्री प्रल्हाद कचरे यांच्याशी नजरानजर झाली आणि मग आम्ही दोघेही संमेलन सुरू होईपर्यंत छान बोलत बसलो. नंतर उद्धाटन सत्र संपल्यावर यशदा चे अतिरिक्त महासंचालक, संमेलनाचे सह आयोजक श्री शेखर गायकवाड यांची भेट घेऊन बोलणे झाले.
या संमेलनामागील भूमिका समजून घेण्यासाठी निमंत्रक श्री सुनील महाजन यांची भेट घेतली असता, ते चहा घेण्यासाठी अतिथी कक्षात घेऊन गेले. चहा झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात करताच मी फोटो काढण्यासाठी मोबाईल बाहेर काढला. गंमत म्हणजे फोटो मोड एवजी तो व्हिडिओ मोड वर गेला आणि नकळत त्यांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले. मी पण विचार केला, आता होतेच आहे रेकॉर्डिंग तर सुरूच ठेवू या आणि अशा रितीने माझ्या मोबाईल मधून पहिलेच रेकॉर्डिंग झाले. विशेष म्हणजे ते रेकॉर्डिंग मला कालच्या वृत्तांतात प्रसारित करता आले ! हा अनुभव एक वेगळाच आनंद देऊन गेला.
मध्यंतरात श्री रवींद्र ठाकूर, किरण केंद्रे, निवृत माहिती अधिकारी श्री दिलीप कुलकर्णी यांच्या भेटी झाल्या. तर संध्याकाळी माझे मित्र श्री दीपक भिरुड आणि पोर्टल चे लेखक तथा मी पुणे येथे १९८३-८४ दरम्यान पत्रकारिता अभ्यासक्रम करीत असताना मैत्री झालेले, पुढे इंग्रजीचे प्राध्यापक झालेले प्रा डॉ आनंद महाजन यांच्या समवेत संध्याकाळ छान गेली.
तिसऱ्या दिवशी १९८५-८६ दरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांमुळे मैत्री झालेले, मराठी भाषेवरील संवादात सहभागी होणारे श्री सुनील पाटील यांची भेट झाली. ओझरते बोलणे झाले. एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.
दुपारचे सत्र संपल्यावर पोर्टलचे कवी श्री मधुकर नीलेगावकर आणि लेखक प्रा डॉ सतीश शिरसाठ हे भेटायला आले. कलादालनात पुस्तके पहात असताना, माझी पुस्तके पाहून, ती खरेदी करून त्यांनी माझा आनंद द्विगुणित केला.
त्यानंतर माझा चित्रकार पुतण्या आणि त्याची चित्रकार पत्नी सौ संगीता हे दोघेही भेटायला आले. कला दालनात मांडलेली चित्रे, छायाचित्रे, काष्टशिल्प, खडू आकृत्या पाहून दोघेही अक्षरशः हरखून गेले.
तिसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक ला निघालो. फिरता फिरता हॉटेल श्रेयस मध्ये पोहचलो. तिथले जेवण, नाश्ता छान असतो, म्हणून आत गेलो तर समोर हास्य कवी श्री अशोक नायगावकर दिसले. ते दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यांच्याशी छान बोलण्याची संधी मिळाली. अर्थात कविता ते ज्या पद्धतीने सादर करतात, तसे बोलत मात्र नाही. बोलणे त्यांचे गांभीर्यपूर्ण असते, असा अनुभव आला.
ज्यांच्या अती आग्रहामुळे मी या संमेलनास उपस्थित राहिलो, त्या मिशन आयएएस चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी स्पर्धा परीक्षांविषयक लिहिलेल्या एका पुस्तिकेचे प्रकाशन ही माझ्या हस्ते करण्यात आले.
विविध सत्रांच्या अधेमधे रंगमंदिरातील पुस्तकांच्या स्टॉल वर उभे राहिल्याने वाचकांशी माझा चांगला संवाद झाला. त्यातील काही विद्यार्थी होते, काही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे होते, काही डॉक्टर, उद्योजक होते. अशा या सर्वांशी ओळखी झाल्या. या सर्वांनी माझी पुस्तके केवळ विकतच घेतली नाही तर त्या त्या प्रतींवर ते माझी आवर्जून सही घेत राहिले, त्यावेळी तर खूपच भारी वाटत होते.
या संमेलनात झालेल्या भेटीगाठी, त्या सोबतच झालेली चांगली पुस्तक विक्री यामुळे हे संमेलन माझ्यासाठी तरी विशेष लाभदायक ठरले.
त्यामुळे संमेलन आयोजकांचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि आभार. आता वाट पहात आहे, पुढील संमेलन कधी, कुठे होते याची. तो पर्यंत अलविदा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
संपादक भुजबळ साहेब आपण आठवडाभर उरुळी कांचन उत्साह, एनर्जी घेऊन साहित्य संमेलनाला जाऊन अनुभव संपन्न लेखन करून आम्हा वाचकांना ते उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून अभिनंदन..
धन्यवाद सर
गोविंद पाटील सर जळगाव.
देवेंद्र जी भुजबळ साहेब सुंदर फोटो ग्राफी आणि त्या खालील उत्तम लेखन , त्यातून संमेलन ची व्याप्ती दिसून आली आहे शासनाचे कर्मचारी , अधिकारी सेवेत कार्यरत असताना त्यांचे कामकाजाचे वेळा सोडून इतर त्यांचे हक्काचे वेळी वेळ काढून जी साहित्य निर्मिती केली आहे त्यांचे कार्यासाठी व त्यांचे हे कार्य आणखी प्रकाशमान होणे करिता संमेलन चे व्यासपीठ खूपच छानच आहे आणि उत्तम मार्ग आहे असे वाटते
व्वा खूपच छान.