डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटना, संघर्ष, चळवळी आणि दीन – दलीत, उपेक्षीत – वंचित समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी उभ्या केलेल्या जन आंदोलनांनी ओतप्रोत भरलेले आहे. त्यामुळे बाबासाहेबांची महती छत्रपती शाहू महाराजांच्या राजदरबारांपर्यंत पोहोचली होती.
त्याकाळात लोकनायक छत्रपती शाहू महाराजांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य आपल्या कोल्हापूर संस्थानात सुरु केले होते. त्यासाठी दलित मुलांसाठी शाळा सुरु करून त्यांना राहण्यासाठी मोफत वसतीग़ृह बांधले होते. दीन – दलित आणि उपेक्षित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार तसेच गुलामीविरुद्ध बहूजनावर शिक्षा करण्याचे कायदे अवलंबले होते. या समाजामधील विषमता, अंधश्रद्धा, अंधविश्वास, अशाच मिथ्या गोष्टीं आणि विषयाविरुद्ध जनजाग़ृती करण्यासाठी अनेक उपाययोजना करत होते.

बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातही दीन दलित, उपेक्षित, वंचित, अछूत समाजाला मानवाधिकार मिळवून देण्यासाठी कायदे करून त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राजे सयाजीराव सुद्धा काम करत होते.

त्याप्रमाणेच छत्रपती शाहू महाराजही आपल्या संस्थानात या समाजातील लोकांसाठी अनेक योजना राबवत होते. शाहू महाराज तर त्याही पुढे जावून या दीन – दुबळ्या समाजातील मुलांना त्यांच्या संस्थानात छोट्या मोठ्या नोक-या, व्यवसाय सुरू करून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत होते.
त्याकाळात त्यांनी गंगाराम कांबळे नावाच्या महार समाजातील व्यक्तीला हॉटेलचा व्यवसाय सुरू करून देऊन ते स्वत: त्यांच्या हॉटेलात बसून चहा घेत असत. कारण, त्यांना या समाजाचा इतिहास आणि त्यांच्यावर अन्याय करणा-या सवर्ण तथा प्रस्थापित–बहूजन समाजाकडून होणा-या अन्याय – अत्याचाराच्या घटनांची ऐतिहासिक जाणीव होती. त्यामुळे, त्यांच्या राज्यात सर्वांना न्याय व समानतेची संधी व न्याय कसे देता येईल ? हा विचार शाहू महाराजांच्या मनात येत असे.

याच दरम्यानच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बडोदे संस्थानचे राजे सयाजीरावजी गायकवाड यांच्याकडे कार्यरत होते. सन १९१८ च्या सुमारास लोकनायक छत्रपती शाहू महराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जेंव्हा कळले, तेंव्हा ते स्वत: बाबासाहेबांच्या मुंबईस्थित घरी गेले. अशाप्रकारे एका लोकनायकांची भेट विद्यानायकाशी झाली.
ही ऐतिहासिक भेट शाहू महाराजांचे एक विश्वासू व निष्ठावंत सहकारी दत्तोपंत पवार यांच्या माध्यमातून १९१९ मध्ये झाली व त्यांनीच सर्व व्यवस्था केली होती.
मुकनायकांप्रती आस्था :
ज्यावेळी एका विद्या वाचस्पतीची लोकनायकांशी अर्थात शाहू महाराजांशी भेट झाली, त्यावेळी त्यांनी दलित, दिनदुबळ्या, वंचित, अछुत समाजाच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी या दलितोधारांच्या उत्थांनाच्या अनेक प्रश्नांवर बोलणे झाले. प्राचीन काळी ही सर्व मंडळी अछुत नव्हते, तर त्या काळातील क्षत्रिय नागवंशीय होते, ज्यांनी बौद्ध धर्म स्विकारला होता. तथापि, त्यांना बहूजन समाजापासून वेगळे व प्रतिक्रांती करून त्यांना वेगळे करून अस्प्रूश्यत्व लादण्यात येऊन त्यांना चातुर्वर्ण्य तथा हिंदू धर्मात समावेश करून त्यांचा दैदीप्यमान इतिहास विसरण्यास भाग पाडले.
या सर्व ऐतीहासिक गोष्टींची शाहू महाराजांना कल्पना होती. याच वंचित व अछुत वर्गातील लोकांनी पेशवाई उद्धवस्त करण्यासाठी महान कार्य केले होते. त्यानंतरही तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांची दख़ल घेतली नाही, तथापि तत्कालीन लालची बहूजन वर्गातील मंडळींनी त्यांचा स्वार्थ साधुन आपला अनेक वर्षाचा इतिहास विसरून आपली चूल या महारांपासून वेग़ळी पेटवली ही फार मोठी शोकांतीका असून ज्या बहूजनांचे पान महारांशिवाय हलत नव्हते, त्यांचे ५२ अधिकार विसरून त्यांच्याशी घृणा आणि इर्षेची भावना मनात ठेऊन त्यांचेशी वंचित व अछुतची भावना मनात ठेऊन वागत होते. त्यामुळे या सर्व गुण संपन्न महार जातीतील जवानांच्या मनात हजारो वर्षापासूनची असंतोषाची भावना खदखदत होती आणि या अन्यायाची वर्तणूक करणा-या सरकारच्या विरुद्ध ती भावना तीव्र झाली होती.
अशा अन्यायाची भावना असलेल्या समाजासाठी काम करण्यासाठी योजना आखून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून नवचैतन्य भरून पुर्ण करण्याचे स्वप्न लोकनायक छत्रपती शाहू महाराजांनी पाहिले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाला भूषणभूत असलेले, प्रजाजनांचे हित चिंतणारे, दलित – वंचित, दीनदुबळ्या समाजाबद्दल कणव असलेले कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्शी शाहू महाराज हे अलौकिक राज्यकर्ते होते. दीन-दुबळ्यांचा उद्धार करणे हेच आपले महत्वाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे, आणि हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या खांद्यावर घेऊन पूर्ण करतील असा त्यांना विश्वास होता. म्हणूनच शाहू महाराजांनी त्यांना आग्रहाचे निमंत्रण देऊन आपल्या संस्थानात बोलावून घेतले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंच्या भेटीसाठी गेले. यावेळी राजेंनी बाबासाहेबांना दलितोद्धाराच्या कामासाठी सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले.
महाराजांची इच्छा पाहून बाबासाहेबांनी, आपल्या दलित बांधवांचे प्रबोधन करण्यासाठी एखादे स्वतंत्र नियतकालिक असणे ही पहिली गरज असल्याचे बाबासाहेबांकडून ऐकल्यावर दानशूर शाहू महाराजांनी आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्याचे मान्य केले.
मुकनायक पाक्षिकाची निर्मिती :
छत्रपती शाहू महाराजांनी स्वत: होऊन बाबासाहेबांना रुपये २५०० एवढी आर्थिक मदत दिली. त्यानंतर काही हितचिंतकांकडून मदत मिळवून बाबासाहेबांनी ज्ञानरूपी दिव्याने अज्ञानरुपी अंधार नाहीसा करण्यासाठी ३१ जानेवारी १९२० रोजी
“मूकनायक“ या पाक्षिकाची निर्मिती केली. या पाक्षिकाचे लेखक, व्यवस्थापक, संपादक, आणि वितरक ही सर्व जबाबदारी बाबासाहेबच होते.
त्यानंतर या दलित – दीनदुबळ्या समाजात जनजागृतीचे वारे वाहू लागले. हीच खरी “आंबेडकरी चळवळीची“ ऐतिहासिक सुरुवात होती की, ज्याचे प्रेरणास्त्रोत्र शाहू महाराज होते.
डॉ. बाबासाहेबांच्या प्रखर लेखणीतून व्यक्त झालेले विचार आणि उपदेशाने ज्वलंत स्वरुपाच्या लेखांमुळे गाढ झोपी गेलेला दलित समाज थोडा जागा झाला. तरी पण तो खडबडून उभा राहिला नाही. पुढे याच काळात डॉ. बाबासाहेब सिडेनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे या कार्याला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते, म्हणून या जनजागृतीच्या कार्यात चिकाटीने काम करणारे आपले सहकारी, पांडूरंग सखाराम भटकर यांचेकडे “मुकनायकाचे” संपादक म्हणून जबाबदारी सोपवली. त्यावेळी श्री भटकर यांच्या घरगुती कारणास्तव तसेच वैयाक्तिक स्वरुपाच्या अनेक अडचणी आल्यामुळे हे पाक्षिक पुढे चालवणे कठिण झाले. याशिवाय शाहू महाराजांच्या कडून मिळालेले पैसे संपल्यामुळे सदर पाक्षिक शेवटी बंद पडले.
डॉ. बाबासाहेबांनी “मूकनायक” पाक्षिकातून फक्त चौदाच अग्रलेख लिहीले होते.
डॉ. बाबासाहेबांचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी छ. शाहू महाराजांना जेंव्हा कळले, तेंव्हा त्यांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत सुद्धा केली. त्याचे कारण असे की, बाबासाहेब जेंव्हा बडोदा संस्थांनचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक मदतीने अमेरिकेतील उच्च शिक्षण पुर्ण होताच त्यांना भारतात परत बोलावून घेतले होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या मनातील काही उच्च शिक्षण अर्थात बॅरिस्टर होण्याचे स्वप्न होते, मात्र ते अपूर्ण राहिल की काय ? असे त्यांना वाटू लागले होते. परंतू म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग, अशा विचाराने ते गढले असता ही गोष्ट छत्रपती शाहू महाराजांना कळल्यावर त्यांनी बाबासाहेबांना बोलावून घेतले आणि त्यांनी लंडनस्थित संस्थेत जावून “बॅरिस्टर” चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढी आर्थिक मदत दिली आणि बाबासाहेबांचे “बॅरिस्टर“ होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
असा हा रयतेचा लोकनायक राजा, ज्यांच्या मनात जनतेचे कल्याण, दीनदुबळ्या – दलित – वंचित समाजाला यथायोग्य न्याय देण्याची इच्छा असलेला राजा आता होणे नाही, अशा उच्च विचाराने प्रेरित लोकनायक आणि विद्यावाचस्पती – प्रगाढ पंडीत, दलितोद्धाराची कणव असलेले बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्यक्ष भेटीतून आणि वैचारिक भूमिकेमुळेच दलितोद्धाराचे महान ऐतिहासिक कार्य झाले नाही काय ? अशा या महान सामाजिक क्रांतिच्या दोन्ही महानायकांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शतश: प्रणाम !!
जय भिम जय संविधान जय शाहू जय भारत !!

– लेखन : राजाराम जाधव.
निवृत्त सहसचिव, महाराष्ट्र शासन.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800