नरवीर तानाजी मालुसरे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते त्यांच्या सिंहगडावरील शौर्याचे पोवाडे, पाचवी सहावीत असताना मनावर कोरलेलं ऐतिहासिक वाक्य- “गड आला पण सिंह गेला” आणि विशेष म्हणजे त्यांनी कोंढाण्यावर किल्ल्याच्या दगडी कठड्यावर चढण्यासाठी वापर केलेली यशवंती घोरपड, शेलारमामा आणि उदयभान राठौड इत्यादी माहिती.
या पेक्षा आम्हा इतिहास प्रेमींना ही मोहीम कशी फत्ते केली या मागचा इतिहास जाणून घ्यायचा होता. कोंढाणा किल्ला मोहीम मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी शौर्यगाथा आहे, जिथे तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या असामान्य धैर्य, युद्धकौशल्य आणि त्यागाबद्दल ऐकण्यासाठी इतिहास प्रेमी आतुर होते.
महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या इतिहास मंचावर आयोजित केलेल्या “नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील शौर्यगाथा” ह्या विषयावर आयोजित चर्चा सत्रात भारतीय हवाई दलात प्रदीर्घ सेवा केलेले, युद्धनीती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक यांनी युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून सिंहगडच्या ऐतिहासिक लढाईचे विश्लेषण श्रोत्यांसमोर मांडले आणि सर्व इतिहास श्रोत्यांना भारावून टाकले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नियोजन आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या सहकाऱ्यांनी अमलात आणून ही मोहीम कशी यशस्वी केली यावर भारताच्या संरक्षणातील वायुदल, लष्कर आणि नौका दलातील मान्यवर उच्च अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बाबींचा विचार करून या मोहिमेतील बऱ्याच घटनांचे केलेले विश्लेषण आम्हाला ऐकण्यास मिळाले. या युद्धातील डावपेच व युद्ध प्रसंगाचे वर्णन ऐकून श्रोत्यांचे रोमांच उभे राहिले होते. इतिहासाला अनुभवाची जोड मिळाल्यामुळे हे सत्र खूपच आकर्षक वाटले.
या चर्चासत्रात भारतीय हवाई दल व इतर दलातील मान्यवर यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा गोषवारा :
जनरल शिशिर महाजन —
पुरंदरच्या तहात गेलेला सिंहगड परत स्वराज्यात यावा असे छत्रपती शिवाजी महाराजांना बरेच दिवस वाटत होते. तानाजी मालुसरे महाराजांचे खंदे पंचहजारे पायदळ सरदार होते. त्यांनी स्वतःहून ही जबाबदारी घेतली आणि अत्यंत जोखमीची मोहीम त्यांनी आखली.
लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकार —
शिवाजी महाराजांचे नियोजन आणि नरवीर तानाजींची कामगिरी. तानाजींना सिंहगडची खडान खडा असलेली माहिती, पायदळाचे सरदार असल्यामुळे तानाजीकडे खडे 1000 सैनिक उभे करायची ताकद, उदयभान यांना तानाजीने प्रत्यक्ष पाहिले होते. त्याला यमसदनाला पाठविण्यासाठी उदयभानला ते सहज ओळखू शकले असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता.
लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर —
महाराजांच्या गुप्त हेर खात्याचे संचालक बहिर्जी नाईक यांनी या मोहिमेसाठी जमवलेली माहितीचे संकलन. बहिर्जीनी हेरामार्फत काढलेली माहिती, उदय भानूची सैन्य संख्या, टेहळणी बुरुजावरील पाळ्याबदल आणि पहारेकऱ्यांची ठिकाणे व संख्या, नवी बांधकामे, कल्याण दरवाजातील रक्षकांची संख्या, कुठले दरवाजे कसे उघडतात आणि कसे बंद केले जात होते, पुणे दरवाजा आतून लाकडी दाटण्या ओंडक्यांनी मजबूत बंद करत. गडावर कामावर असलेल्या लोकांना फितवून दोरशिड्याची व कासऱ्यांची सोय जनावरांसाठी आहे हे सांगून ते गडावर नेले असण्याची शक्यता, गडाबाहेर असलेल्या सुरक्षा दलाला सोन्याच्या कडे देऊन आपलेसे केले असण्याची शक्यता, कलावंतिणी आणि झुंजार बुरुज यावर सरदारांच्या तुकड्या साप्ताहिक दोन पाळ्यात तटाच्या आतून दोन जणांच्या व रात्रपाळीच्या चार नव्या गस्ती चौक्या तयार केल्या होत्या. सरदारांच्या घराला सदैव तीन पहारेकरी हजर असत. रात्रपाळीत सैनिक कमीत कमी ५० ते ७० असत व रात्री दोन नंतर बहुदा ते गाफील राहत.
लेफ्टनंट जनरल वेंकी पाटील —
तानाजींनी या मोहिमेसाठी काय तयारी केली होती, जंगलामध्ये वाघ गेल्या काही दिवसात दिसलेला नाही, रात्री हरणे फिरत, सशांच्या मागे तरस व कोल्हे फिरतात. फेकलेले उष्टे अन्न खायला रानटी कुत्री व डुकरे येतात. फासेपारध्यांना कामाला लावून त्यांच्याकडून नाग आणि सापांची वारुळे, मुंग्यांच्या घराचे मातीचे डोंगर, गांधीलमाशांची पोवळी यांचा शोध करून ती नाहीशी केली. कारवी, घाणेरीया बोचऱ्या खाजऱ्या झुडपांची तोडणी केली. उदयभान सध्या कसा दिसतो याची घोडेबागेवाल्याकडून माहिती काढली. तो कुठल्या पोशाखात असतो, त्याचे अंगरक्षक कोण व किती आहेत.
ब्रिगेडियर हेमंत महाजन —
मिलिटरी कमांडर घेऱ्याच्या लोकांतून नोंदी कशी ठेवतात. गडावरील उदेभानाच्या मुगल सैनिकात लक्षणीय वाढ झाली आहे. औरंगजेबाशी करार मोडल्याच्या बातम्यांमुळे ते अती सावध असतात. जनावरांना कडबा वगैरे बांधायच्या बहाण्याने पाठवलेले दोरांचे बिंडे गडावर गेले आहेत. ते दोर कड्याच्या बाजूने असलेल्या बळकट खडकांना, झाडाच्या बुंध्यांना बांधायला व रात्री अंधारात खाली दोर टाकलेले दिसावेत म्हणून पांढरे कापड घेऊन जाणे. ४ पैकी २ जण वर गेलेत. उरलेले जाण्याच्या तयारीत रहाणे. रात्री अनेकदा बुधल्यातील तेल संपून चौक्यात अंधार असतो. येत्या काही दिवसात कलावंतिणीच्या बुरुजाजवळच्या पटांगणात काही नायकिणींना नाचवणार आहेत.
नेव्हीतील कमोडर श्रीकांत देशमुख —
तानाजींची अंतर्गत तयारी, लागणारे शस्त्र-सामुग्री, सैन्यबळ – ११०० तलवारी मुठी, म्याने, धार लावून तयार, वाद्या तपासलेल्या ढाली, वाखाचे दोरखंड, नाडेवाल्या दोराच्या शिड्या. चकमकीचे दगड, धूर करणारा नवसागर, गवत पेटवायला तेलात बुचकळलेले पलिते, जखमींना पट्टी, निरगुडीचा पाला, लेप, सैन्याचा हजेरीपट, सोबतच्या सरदारांच्या तुकड्यांची झालेली मोजदाद. राजगड ते सिंहगड वाटेत लग्नाचे वऱ्हाड जाणार आहे, अशी पिकवलेली आवई, गावकऱ्यांतील वाट दर्शक व गडावरील दिवसाकाम करणारे मिळवलेले साथिदार.
लेफ्टनंट जनरल सतीश सातपुते —
दोणागिरचा कडा हेच ठिकाण वर चढण्यासाठी का निवडले, दोणागिरीकड्या बाजूच्या दरीकडून चढून येण्याला कठीण होता म्हणून हा भाग उदयसिंहाच्या सेनेने दुर्लक्षिलेला होता. चढून गेल्यावर लपायला सोईचा खोलगट भाग होता. हनुमानगढीतून उरलेले सैनिक चढवणे सोईचे होते. अंधुक चंद्रप्रकाशात कामगिरी पार पाडायला व रात्रीचे किती वाजले याचा अंदाज यायला सोईचा होते. कल्याण दरवाज्याकडे जायला सोईचा मार्ग होता. शत्रूच्या सैन्याला अडवायला चिंचोळा पट्टा होता.
लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी —
वेळ आणि गतीचे महत्त्व काय व त्याचा गड चढण्यासाठी कसा उपयोग केला याबद्दल लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी गणिताचा आधार घेऊन आपले विचार मांडले. युद्ध हे ‘गती आणि वेळ’ या दोन पायांवर उभे असते. त्यात पराक्रम, शस्त्रे, नव नवीन युद्धप्राविण्य, डाव-प्रतिडावपेच यातून ते जय आणि पराजय या लंबकावर हेलकावते. चढायला लागणारी उंची १५ मीटरच्या आसपास धरली तर सुरवातीला वरून सोडलेल्या २ दोरशिड्यांवरून २० मिनिटात १० जण दोणागिरी चढून जायची गती शक्य असेल तर पहिल्या तासात ६० जवान तर पुढील ३ तासात दोरशिड्यांची संख्या ६ पर्यंत वाढवून ताशी ९० जवान असे २७० + ६० = ३३० वर जाऊ शकले तर पुढच्या भागाची आखणी केली जाईल. उरलेल्या २०० सैनिकांनी हनुमान गढी सर केल्यावर झुंजार बुरुजाची ‘चिकन नेक’ वाट चढून वर यायचे आहे.
एअरमार्शल भूषण गोखले —
यांनी रात्री दोन नंतरची वेळ का निवडली याबद्दलचे विश्लेषण केले. रात्री २ ते ४ ही माणसाची गाढ झोपेची वेळ असते. हातात आत्तासारखी घड्याळे नव्हती. अशा परिस्थितीत किती वाजले हे कळणे कठीण. म्हणून हल्ल्याची वेळ चंद्राच्या गती व दिसण्यावरून ठरवावी लागली असेल. अष्टमीच्या रात्रीचा चंद्र १२ नंतर डोक्यावर येतो. तो दोणागिरी कड्याच्या बाजूला दिसायला लागला की तोवर आपले २०० सैनिक वर पोचले तर समजायचे की आणखी १०० वर गेले की हल्ला करायला सुरवात करायची. त्याआधी तेलाच्या बुधल्या, चकमकीचे दगड, कापसाचे बोळे, जादाच्या तलवारी, ढाली, दरवाजे फोडायला पहारी, घण, मोठे हातोडे, करवती, सामान वर आले पाहिजे. डोळ्याला चष्मा, दुर्बिणी नाहीत, पटकन आग लावायला लायटर किंवा आगपेट्या नाहीत. याचे भान आजच्या कमांडरांना राखले पाहिजे.
एअर मार्शल सुमित सोमण —
मिलिटरी कमांडर तानाजींचे आपल्या सैनिकांना आदेश कसे असतील यावर आपले विचार मांडले – हे मावळ्या शूरांनो कोंढाण्याला आपल्या राज्यांच्या मुखत्यारीत परत आणायचे आहे. सुर्याजीची आपल्याला कल्याण दरवाजाकडून कुमक मिळवण्यास ते तीन दरवाजे आतून उघडायला आपण कड्याच्या बाजूने हिकमतीने वर जायचे आहे. आपण एकूण हजारापेक्षा कमी असलो तरी १५०० पेक्षा जास्त शत्रूला भारी आहोत. उदेभान ठार झालाच पाहिजे. येत्या अष्टमीच्या आधी सर्वांनी गटागटाने राजगडावरून कूच करून घेराच्या खालच्या वस्तीपाशी जमायचे आहे. तुकडीच्या हवालदारांनी किती जण जमलेत याची नोंद देणे. गडावरचे लोक खाली उतरले की अंधार व्हायच्या आत दोन्ही बाजूच्या मावळ्यांनी लपून राहाणे. वरून दोर खाली आले तर ते पकडून त्यांना आपल्या कडील दोर बांधून वर चढायच्या जादा वाटा तयार करणे.
स्टाफ कॉलेजचे आर्मी विभाग मुख्य मेजर जनरल अमरदीप भारद्वाज —
धुर्त युद्धतंत्र म्हणजे काय आणि या मोहिमेत ते कसे उठून दिसले यावर अभ्यास करून म्हणाले, Manoeuvre Warfare – मराठीत ‘धूर्त युद्ध तंत्र’. ते विविध घटकांतून साध्य होते. त्यांनी जगातल्या नामी मिलिटरी कमांडराच्या लढायांचा आढावा घेऊन शिवाजी महाराजांना (१० पैकी १० गुण देण्याची प्रथा नाही म्हणून) १० पैकी ९ मार्क देऊन प्रथम क्रमांकाने गौरवले आहे. या लढतीत त्यांच्या विचाराने धक्का तंत्र, गोंधळ उडवणे, चकवणे, लपून मोठा हल्ला करून लढा जिंकणे या चारही तंत्राचा वापर केला असेल.
विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सादरीकरणानंतर शिकागोच्या इतिहास प्रेमींनी विचारलेले प्रश्न आणि झालेली चर्चा अतिशय रंगतदार होती.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने नाही तर “धूर्त युद्ध तंत्र” वापरून हे सर्व विजय मिळवले होते. गनिमी कावा हा शब्द महाराजांच्या युद्धनीतीसाठी कधीच योग्य नाही. गनिम म्हणजे चोर किंवा शत्रू. अनेकांना ह्या शब्दाचा अर्थच माहीत नसल्याने उगीचच ते या शब्दांमध्ये मोठी हुशारकी आहे, असे समजून सर्रास वापरत आहेत यावर विंग कमांडर शशिकांत ओक यांनी सुंदर विवेचन केले. हे सत्र तानाजींची शौर्यगाथा “युद्ध तंत्र” या दृष्टिकोनातून वर्णिलेले अधिक सत्य प्रतीत झाले. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा ऐकून आपण त्या मोहिमेत सामील झालो असतो तर कोणत्या तुकडीत भाग घेतला असता यावर श्रोत्यांनी निश्चितच विचार मंथन केले असेल.

या सत्राचे आयोजन महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या इतिहास मंचाचे आयोजक – चेतन रेगे, मी स्वतः (माधव गोगावले), विशाल नवलकर, शलाका रेगे, वैष्णवी नवलकर, आणि नमीता वेदक यांनी केले.
प्राजक्ता जोशी यांनी आकर्षक परिपत्रक केले.
न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी विंग कमांडर शशिकांत ओक यांची आमच्याबरोबर ओळख करून दिली. विंग कमांडर शशिकांत ओक यांनी आयोजकांचे आणखी काही व्याख्यानाच्या मालिका करण्याचे आमंत्रण स्वीकारले. शिकोगातील इतिहास प्रेमी त्यांच्या व्याख्यानांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सौजन्याने वरील माहिती देत आहे.
हर हर महादेव
जय भवानी जय शिवाजी

— लेखन : माधव ना. गोगावले. शिकागो, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 969484800