महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक भीमराव भोयर यांचे ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ हे पुस्तक म्हणजे एका मनस्वी शिक्षकाचे खुले आत्मचिंतन आहे. पुस्तकाच्या प्रारंभी आपल्या मनोगतात श्री. भोयर यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वाटखेडा गावातून ते कसे आले आणि त्यांनी पुढील शिक्षण सेवाग्राम येथील बुनियादी शाळेत कसे घेतले याचे अत्यंत संवेदनशीलपणे वर्णन केले आहे.
सेवाग्राम येथील शाळेतील शिक्षकवर्ग समर्पित ध्येयाने प्रेरित असलेले, अत्यंत काळजीने शिकविणारे, पुस्तकाशिवाय अध्यापन, उद्योगांवर आधारित गणित, इतिहास, भूगोल, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तोंडपाठ असणारे , प्रात्यक्षिकांसाठी स्थळभेट आयोजित करणारे असे होते आणि या शिक्षणाचा श्री. भोयर यांच्या विचारांवर आणि पुढच्या वाटचालीवर कसा कायमचा परिणाम झाला याचे त्यांनी अतिशय सुरेखपणे वर्णन केले आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीच्या काळातील ३५ वर्षे ग्रामीण भागातील शाळामध्ये व्यतीत करताना विद्यार्थी हाच त्यांच्या शिक्षणाचा व अन्य कार्याचा केंद्रबिंदू राहिला. विद्यार्थ्यांना येणारे अडथळे, त्यांच्या सर्वांगीण विकासातील बाधा कशा दूर करता येतील हा आशय-शोध करता करता ते मार्गक्रमण करत राहिले.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. भोयर यांचे वर्गमित्र, प्रख्यात डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी हे पुस्तक ‘एका अस्वस्थ विचारी शिक्षकाच्या विचारांचे प्रतिबिंब आहे,असे सांगून भीमराव शिक्षणाच्या क्षेत्रातला अंधार दूर करायला धडपडणारी एक पणती आहे, त्या पणतीचा प्रकाश म्हणजे हे पुस्तक आहे.’ अशा शब्दात भीमराव भोयर यांचा आणि या पुस्तकाचा गौरव केला आहे. तर प्रख्यात लेखक वसंत आबाजी डहाके आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, ” जेव्हा सगळेच मूल्यांचे, आदर्शांचे दिवे विझल्यासारखे वातावरण असते, डोळ्यांना पुढचे भवितव्य दिसत नाही असा मूल्य विहिनतेचा काळोख असतो, तेव्हा विचाराची एक बारकी काडी उजळणे ही गोष्ट महत्त्वाची ठरते. या पुस्तकातल्या लेखांनी आपल्या आसपासच्या गोष्टी दिसण्याइतपत उजेड दिलेला आहे, पण माझ्या मते या उजेडाच्या वर्तुळापलीकडे काळोख किती दाट आहे याची जाणीव करुन दिलेली आहे. हे या पुस्तकातील लेखांचे यश आहे,” असे म्हटले आहे.
या पुस्तकात लेखकाचे ४३ लेख आहेत. लेखांच्या नेमक्या शिर्षकावरुन लेखांचे विषय व स्वरुप स्पष्ट होते. दिवे-पणत्या जागवताना, तणावात घेरलेलं बालपण, हरवलेली कणव, आजोळची कन्या, एक उद्रेक : शिक्षण संकटाचा, संघर्ष शिक्षणासाठीचा, शिक्षण-कुपोषण : एक यक्षप्रश्न, बालमनाची धावपळ, नेमकं चुकतंय कुठे… अशा लेखांमधून लेखकाची विद्यार्थ्यांच्या कल्याणाविषयीची, त्यांच्या मोठं होण्याविषयीची तळमळ आणि तगमग दिसून येते.
लेखकाला विविध शाळेत आलेले विविध अनुभव, त्यातून दिसून येणारे प्रश्न त्यांनी अत्यंत निर्भिडपणे मांडले आहेत. शिक्षकांनी केवळ शिक्षक न राहता पालक म्हणून मुलांकडे पाहावे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. काही शिक्षक कसे होते, शिक्षकांचे वरिष्ठांशी असलेल्या लागेबांध्यामुळे त्यांच्यात कधीच सुधारणा न होता ते अधिक मुजोर आणि कामचुकार कसे बनतात, याचेही वर्णन लेखकाने अत्यंत परखडपणे केले आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांची जबाबदारी केवळ शिक्षकांचीच नसते तर आईवडिलांनी देखील मुला-मुलींना कसे समजून घेतले पाहिजे, त्यांच्याशी आपले संबंध कसे ठेवले पाहिजेत याविषयी लेखक मार्गदर्शन करतात. पालकांकडूनही मुलांच्या कल्याणाची रास्त अपेक्षा व्यक्त करतात. बालक, पालक, शिक्षक आणि शासन यांचा परस्परांशी सुसंवाद साधण्यात आपण कमी पडलो आहोत, असे निरीक्षणही ते नोंदवतात.
भारतात ७०-८० टक्के कृषी प्रधान जनजीवन असताना श्रमाला शिक्षणातून पारखं करणे कसे शक्य आहे ? अन्यथा १३० कोटींची ही जनसंख्या निष्क्रिय होण्याकडे वळेल, असा इशारा देऊन ते महाराष्ट्रातील दुर्गम, आदिवासी भागात कुपोषण, मागासलेपणा ही समस्या संपविण्यासाठी शासनाने सोयी सवलती पुरविल्या तरी आतून काम करणारी मनुष्यशक्ती हवी, वंचितांपर्यंत त्यांना सहभाग करुन घेणारी यंत्रणा हवी अशी अपेक्षा व्यक्त करतात.
एकंदरीतच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या शाळांमधून आलेल्या अनुभवांना डोळसपणे सामोरे जाऊन स्वत:कडून होतील ते प्रयत्न करुन समस्या सोडविण्याचा, त्यातून मार्ग काढण्याचा काटेकोर प्रयत्न श्री. भोयर यांनी आयुष्यभर केला आहे. त्यामुळे त्यांचे स्वानुभव, विचार आपल्या मनाला भिडतात. दिवसेंदिवस विद्यार्थी हा परीक्षार्थी बनत चालला असताना, शिक्षक व पालकही त्यांच्याकडून केवळ अधिकाधिक गुणांची अपेक्षा करीत असताना तो खऱ्या अर्थाने जीवनात उभे राहण्यासाठी कशा पद्धतीने घडला पाहिले, याविषयी श्री. भोयर यांनी केलेले मार्गदर्शन हे सर्व शिक्षक आणि पालकांना आत्मपरिक्षण करायला लावणारे आहे.
हे पुस्तक लिहिण्यासाठी श्री. भोयर यांना प्रेरित केल्याबद्दल त्यांचे चिरंजीव पत्रकार मनोज भोयर यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत. अन्यथा हे अनुभवाचे बोल आपल्यापुढे आलेच नसते. पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांच्याहस्ते मुंबई मराठी पत्रकार संघात मोठया थाटात झाले होते. श्री गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटलेले
पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यन्त बोलके,लक्षवेधी आहे.
श्री भीमराव भोयर यांना त्यांच्या पुढच्या लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
-देवेंद्र भुजबळ,
9869484800.
*शिक्षण वाटा चोखळतांना*या पुस्तकाची प्रस्तावना मनस्वी भावली. हे पुस्तक निश्चित मार्गदर्शन करणारे असे अनुभवू देणारे ठरणार.
प्रत्येक विद्यालयातील ग्रंथल्यात या पुस्तकाचा समावेश करून त्याचे वाचन केल्यास अनेकांना लेखन करण्याची प्रेरणा मिळेल असे वाटते… धन्यवाद 💐💐🙏
तुम्ही हि वेबसाईट सुरु खूप चांगला निर्णय घेतला आहात.त्यामुळे तुमचे व्यापक जगभरातले अनुभव आम्हाला वाचायला मिळेल . समाजातल्या चांगल्या लोकांवर फिरून तुम्ही जे लिहता आणि त्यांना एक व्यासपीठ देता ते खूपच महत्वाचं काम आहे ते फारसं होत नाही..
Thank you
sir thanks a lot..