Monday, December 23, 2024
Homeलेखशिक्षणाचे पसायदान

शिक्षणाचे पसायदान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी सार्‍या विश्वासाठी आर्ततेनी भाकलेली प्रार्थना म्हणजे पसायदान ! सार्‍या विद्यार्थी समूहांसाठी शिक्षकांकडे मागितलेले असेच मूल्यशिक्षणाचे दान म्हणजे ‘चपराक’ने प्रकाशित केलेल संदीप वाकचौरे यांचे ‘शिक्षणाचे पसायदान.’ या पुस्तकाची मांडणी तीस प्रकरणात केली आहे. शिक्षणाबद्दलचा दूरदृष्टीपणा व शिक्षकांकडून नेमके कोणते वर्तन अपेक्षित आहे, याचे प्रभावी विवेचन या पुस्तकात आहे.

एखादा शिक्षक चुकला तर तो भावी पिढी सार्थतेने घडवू शकणार नाही, हे लेखकाचे विधान महत्त्वाचे आहे. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ याप्रमाणे एखाद्या शिक्षकाने ज्ञानदानाचे काम चोख बजावायचे ठरवले तरच त्यांच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडेल. अब्दुल कलामांना त्यांचे प्राथमिकचे शिक्षक जास्त आठवतात कारण याच वयात त्यांच्यात संशोधनाची बिजे पेरली गेली. याचा दाखला देत वाकचौरे लिहितात, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा न करता वेळप्रसंगी धीर देत, खंबीरपणे त्याला हात देण्याची आवश्यकता असते. शिक्षक व विद्यार्थ्यांत प्रेमाचा बंध निर्माण होणे गरजेचे आहे. खरेतर कोणीही कोणाला शिकवू शकत नाही. प्रश्न असतो तो फक्त त्या विद्यार्थ्यांत आंतरिक प्रेरणा निर्माण करण्याचा व त्याच्यातील कुतुहलात्मक लहान मूल जागवण्याचा.

माउलींनी ज्ञानेश्वरीत जगण्याचे तत्त्वज्ञान उलगडून सांगितले आहे. लहानपणीच जर आध्यात्मिकता आत्मसात केली तर जीवनात येणार्‍या कटू प्रसंगासाठी आपण सज्ज राहू, हे लेखकाने यात सांगितले आहे. संतांनी सांगितल्याप्रमाणे आनंद हा आपल्या आतच आहे, त्याला बाहेर धुंडाळण्याची गरज नाही. अनेक शिक्षक निरपेक्षपणे कर्म करीत ज्ञानदानाचा हा आनंद द्गिगुणीत करत असतात. त्यांना चिरंतन समाधानाची अवस्था प्राप्त होते. सध्या वाढलेल्या स्पर्धा, त्यासाठीची चढाओढ व येनकेनप्रकारेन यश मिळवायचंच, या वृत्तीमुळे शिक्षण हे मनभेदाकडे वळत चाललंय का? असं वाटतं. शिक्षणाने चांगला माणूस बनण्याची आवश्यकता आहे.
विद्यार्थी हा शिक्षकांच्या शिकवण्यापेक्षा त्यांच्या वागण्याचे अनुकरण करतो, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी खूप मोठी आहे हा अनमोल संदेश या पुस्तकातून मिळतो. शिक्षक सागरासारखा भरलेला असतो.

लेखक आयझॅक न्यूटन यांचे उदाहरण देताना सांगतात, त्यांच्या तासाला एकही विद्यार्थी नसताना ते 21 वर्षे शिकवत राहिले. याचं कारण ज्ञानदान करणं त्यांना आवडायचं. एखादी भाषा शिकायला ठरावीक वेळ पुरेसा असतो पण त्या भाषेचा वापर करायला, त्यातील ज्ञान मिळवायला संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं, हे लेखकाने यात उलगडून सांगितले आहे.

संदीप वाकचौरे यांनी लोकमान्य टिळकांच्या मुलाचे उदाहरण सांगताना लिहिले आहे, त्यांच्या मुलाच्या निधनानंतरही ते केसरीचा अग्रलेख पूर्ण करूनच आले. यातून टिळकांना आत्मतत्त्वाची जाणीव झालेली दिसते. त्यामुळेच त्यांचे जीवन उजळून निघाले. कोणतीही लढाई ही मनाच्या पातळीवर जिंकली जाते. कोणतीही नवीन गोष्ट शिकायला मनाचं आत्मबळ महत्त्वाचं असतं. मनाचं खच्चीकरण झालं तर सगळंच अवघड होऊन बसतं. ‘हे भाजलीया बिजे अंकुरणार कसे ?’ ते या प्रकरणातून स्पष्ट होते. पूर्वी ऋषी गुरूकुल शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांची निष्ठा, धीर सगळे तपासून मग उत्तम शिष्य ठरवायचे.

आजकाल शिक्षणाचा शॉर्टकट फॉर्म्युला बाजारात मिळतोय.
आपली कर्मे फळाची अपेक्षा न ठेवता निष्कामपणे केली तर तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही. सत्याची वाट खडतर असते पण त्या वाटेवरून गेल्यास पश्चातापाची वेळ कधीही येत नाही. म्हणूनच, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आपुलकीचे, विश्वासाचे नाते निर्माण झाले की त्यांना अभ्यासाचे दडपण येत नाही व तो स्वच्छंदीपणे शाळेत रमू लागेल, हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे.
जीवन जगताना प्रत्येकाला विद्यार्थी दशेत असल्यासारखे वाटायला हवे म्हणजे तो कधी पूर्णावस्थेत न जाता रोज काहीतरी अभ्यास करायला लागेल. माणसातील माणूसपण ओळखायला लावणारेच खरे शिक्षण! व्यक्ती कधीच वाईट नसते. तिच्या भोवतालची परिस्थिती, तिच्यावर झालेले संस्कार यांचा परिणाम त्या व्यक्तिच्या आयुष्यावर होत असतो. शिक्षणाचे मुख्य ध्येय हे अंतःकरणातील परिवर्तन व सुख, समाधानाचा रस्ता गवसणे हे होय, याची शिकवण या पुस्तकातून मिळते.

‘चपराक प्रकाशन’ने शिक्षण विचार या विषयावरील संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकांची जी माला सुरू केलीय त्यातील हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. ज्ञानेश्वरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी जो शिक्षणविषयक विचार दिलाय तो आजच्या परिप्रेक्ष्यात मांडल्याने आध्यात्माची आवड असणार्‍याबरोबरच प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक झाले आहे.

— परीक्षण : प्रियंका केदुंरकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९
गोविंद पाटील on अंदमानची सफर : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” १७