आज शिवजयंती निमित्ताने काही काव्यांजली सादर करीत आहे. शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन. आजच्या या काव्यांजलीचे एक विशेष म्हणजे आपल्याला जेष्ठ लेखिका,कवयित्री म्हणून परिचित असलेल्या सौ स्वाती वर्तक या किती चांगल्या चित्रकार आहेत, हे त्यांनी त्यांच्या शिव काव्या बरोबर पाठविलेल्या शिवाजी महाराजांच्या सुंदर चित्रावरून आपल्याला दिसून येईल. आपली मान हा आपला अभिमान असतो पण नेमका त्यांना मानेचा त्रास असूनही त्या त्रासावर मात करीत त्या कार्यरत आहेत, या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
– संपादक
१. न्यायप्रिय राजा
सह्याद्रीचे डोंगर गर्जती तुझ्याच आवाजाने
कडे कपारी दऱ्या पूजती तुज रानफुलांने
मोघल राजे थरथरले तुझ्याच डरकाळीने
काय वर्णू मी, शौर्य पराक्रम माझ्या शब्दाने
उत्तुंग झेप तुझी गरुडासम हिमालयावरी
योद्धा तू, तांडव करणाऱ्या क्रुद्ध रुद्रापरी
डोळ्यातील तेज, धगधगत्या अग्नीजेवी
शारदेचा वरदहस्त तू, चतुर, बुद्धीजीवी
भगवा फडकविण्यासाठी जन्मला तो सूर्य
भवानीने दिले खड्ग ते करण्या पुण्यकार्य
तळपलास तू, वैरीला, होई घोर आश्चर्य
हो पावन मावळे मिळता, तुझे थोर साहचर्य
स्वराज्याचे स्वप्न दाविले, केले तू साकार
ध्वज आपुला अभिमानाने, नेलास अटकेपार
जात, धर्म सोडूनी केला सर्व स्त्रियांचा आदर
नभातुनी जणू उतरुनी, आला कुणी अवतार

अफजलखान, औरंगजेब वा असो शाहिस्तेखान
लढले सैनिक, हातावरी घेऊन आपुले प्राण
देह झिजविला, रयतेसाठी होऊन तू तूफान
न्यायप्रिय राजासाठी, गाती सारे कौतुक गान
— रचना : सौ.स्वाती वर्तक. खार (प)
२. श्री शिवराय
मराठमोळ्या मायभूमीचा मराठीच बाणा
मानबिंदू तो शिवछत्रपती अमुचा हा राणा
काळरात्र आली, अवनी थरथरली
माय मराठ्यांची, भगिनी भ्रष्ट केली
कुणी पुसेना कुणी उठेना वीर नष्ट झाला
मांड ठोकूनी महारुद्र जणुं पुढे उभा ठाकला
माय उभी पाठी, जगदंबा माऊली
स्वये जिजाऊ ती तुजला जागविती
रक्षण करिते आई भवानी, घे हाती तलवार
कराल दाढापुढे ठकूनि रिपुवर करी तूं वार
फत्ते ही झाली, गडे बहु जिंकिली
आदिल पातशाही अवघी डळमळली
ताना, येसा, प्रताप, बाजी कितीक रणी झुंजले
गर्जुनि हरहर महादेव ते पावन हो झाले
अफजुल्या वधिला, शास्ता शासिला
यवनांच्या हाती तुरी तुम्ही दिधल्या
शंभूबाळासवे प्रकटला चरणस्पर्श केला
शिवबा आला भुवनी परतला मोद मनी झाला
गोब्राह्मण पालक श्री शिवछत्रपती
दुरितांचे जगती तिमिर कसे हरती
काळरात्र ती सरली आतां अरुणप्रभा फाकली
स्वराज्य आले सुराज्य झाले आनंदवनभुवनी
— रचना : स्वाती दामले. बदलापूर (पूर्व)
३. रयतेचा राजा
शिवाजी महाराजांची महती सांगावी किती ?
मित्रा, रायगडावर दरवर्षी मावळे मोजू किती ?
छत्रपतींच्या मनात भिने जिजाऊ मातेची गोष्टाई
त्यांना असे आशिर्वाद
तुळजा भवानी माताई
केली सोळाव्या वर्षीच स्वराज्याची प्रतिज्ञाई
मिळे सवंगड्यांस ऐक्कीस पावती किती ?
मित्रा, रायगडावर……
छत्रपतींना लाभे
शूरवीर पराक्रमी सरदार
मुस्लिम असे खजिनांचे
सच्चे ईमानदार
मावळे करी आया- बहिणींचे खरे रक्षणदार
म्हणून स्वराज्यात
शत्रूंना ही वाटे भिती
मित्रा, रायगडावर……
छत्रपती ना करी मुहूर्त पुजा
ते अंधश्रद्धेस करी दुजा
करी ते माणुसकीची आपुलकीने पुजा
त्यांनी शत्रूंना हि दिली माणुसकी किती ?
मित्रा, रायगडावर……
छत्रपती देत
जसा गुन्हा तशी शिक्षा
म्हणून घेई विरोधक
सावध दिक्षा
पण आपलेच मागे
पद लोभ भिक्षा
आपल्या सैन्यात विश्वासू मुसलमान असे किती ?
मित्रा, रायगडावर……
छत्रपती करी उत्तम न्यायनिती
त्यांनी केली समाज परिवर्तनात गती
त्यांचे दिसे नियोजन वेळेवरती
तेंव्हाच्या महाराष्ट्रात असे समाधानी सर्व धर्म जाती
मित्रा, रायगडावर……
— रचना : विलास देवळेकर. मुंबई
४. जल प्रेमी राजे ..
जल संपदा महत्व
शिवबा असे जाणुन
जल संवर्धनासाठी
करी योजना म्हणून
किल्ले बांधणेआधी
बावडी घेती खणून
नाले ओढे ते संपन्न
दुरुन पाणी आणून
अन्नधान्य पाणीसाठे
साठवले रे भरभरुन
प्रतापगडा तो वेढा
सहजपाडला हाणून
झाडी झुडपे जंगले
ठेवला वारसा जपून
इतिहास देतो साक्ष
कर्तृत्व गेले व्यापून
रयते कुणीन उपाशी
झोपे सुग्रास खाऊन
स्वराज्य योजनाबध्द
दुष्काळ पळे भिऊन
बळीराजा खरासुखी
स्वराज्याघास भरवून
असाराजा होणे नाही
सांगे जगाला मिरवून
राजेंच्या मनी निर्झर
जनप्रेम वाहे ओसंडून
शिवरायजयघोष गर्जे
क्षितीजपार ओलांडून
— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
५. स्वराज्याचे स्वप्न
छत्रपती शिवाजी जपती रयत
पाहती हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ।।धृ।।
माता जिजाऊ कोंडदेव तुकाराम
गुरु आदर्श रामदास निष्काम
हिंदू राष्ट्र निर्मिती मनी ध्येयासक्त ।।1।।
गुर्जर बाजीप्रभू हिरोजी तान्हाजी
पिंगळे मोहिते मुरारबाजी नेताजी
अष्टप्रधान मानती शिवबांचा शब्द ।।2।।
प्रजाहित द्रष्टे घेती योग्य निर्णय
भगवा हाती गर्जती भवानी माय
जाणता राजा शिवाजी करी सचेतन ।।3।।
निश्चयाचा महामेरू जनासी आधार
यशवंत नितीवंत शिवअवतार
राजे शिवाजी किर्तीवंत योगी श्रीमंत ।।4।।
— रचना : अरुण गांगल. कर्जत-रायगड
६. उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
बहु शतकांची रात्र संपली
शिवनेरीवर प्रभा फाकली
सकल आर्यभू हर्षित झाली
सह्याद्रीला पुत्र जाहला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
ज्वालामुखिचा पुत्र सह्यगिरी
ज्वालाग्राही वीर्य अंतरी
जव वर्षे महाराष्ट्र धरित्री
वर्षतो महाराष्ट्र भूवरी
त्या संयोगे वीर जन्मला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
पुत्र जाहला जिजाबाईंना
पुत्र शहाजी महाराजांना
पुत्र भोसले कुलवंतांना
पुत्र जाहला महाराष्ट्राला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
घृष्णेश्वर अन् भीमाशंकर
गिरिजात्मक गणपती, विघ्नहर
चौघे आले शिवनेरीवर
ओज तेज द्याया बाळाला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
सुखमय झाले मावळ खोरे
गगनी घुमले ढोल नगारे
दौडत सुटले प्रपात वारे
यवनांना त्यां सांगायाला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
रावण मर्दन करावयाला
रामचंद्र जन्मासी आला
कंस, चाणुरा मारायाला
श्रीहरी भूवरती अवतरला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
माय शिवाई प्रसन्न झाली
माय जिजाऊ प्रसूत झाली
वसंतात की दिवाळी आली
शिव आला तांडव करण्याला
महारुद्र तांडवा पातला
उष:काल जाहला, भारती उष:काल जाहला !!
— रचना : कवि सुमंत.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800