Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यशिवजयंती : शपथ घेऊ या !

शिवजयंती : शपथ घेऊ या !

आज सर्वत्र शिवजयंती साजरी केली जात आहे. ३९२ वी शिवजयंती साजरी करताना, आणि आज आपल्या राष्ट्रहिताचा विचार करताना, शिवाजी एक राजा, एक व्यक्तीमत्व म्हणून काही चिंतन करणे गरजेचे आहे असे वाटते.

शिवाजी म्हणजे भारताचा गौरव.
शिवाजी म्हणजे भारतीयांची ओळख.
संस्कृतीचे रक्षक. देशाचे महानायक.

शिवजयंती साजरी करत असताना, प्रथम शिवाजी महाराज समजून घ्यायला हवेत. ते समजण्यासाठी शिवरायांचा इतिहास अभ्यासिला पाहिजे. आणि तो आपल्या जीवनाशी जुळवून घेतला पाहिजे. त्यांच्या व्यक्तीमत्वातील वैशिष्ट्ये जाणून घेतली पाहिजेत. त्यांच्या गुणांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर आयुष्याच्या लढाईला सामोरं जाता येईल..

स्वराज्य स्थापन करताना त्यांना मार्गात अनंत अडचणी होत्या…पण प्रत्येक अडचणींवर मात करुन शिवाजी महाराज पुढे गेले..श्रींचे राज्य..हिंदवी राज्य..
स्वराज्य स्थापना..यासाठी जिद्दीने, चातुर्यांने, बुद्धी वापरून, समस्येवर मात करत त्यांनी यश संपादन केले. आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुलाही ते घाबरले नाहीत.

भय हा शब्द त्यांच्या जीवनात नव्हताच. त्यांची कार्यपद्धती चोख होती. व्यवस्थापन कमालीचे नेटके होते..नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदारी निश्चीत करणे, यातल्या त्यांच्या काटेकोरपणामुळे ते यश संपादन करु शकले.

शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वात एक जादु होती. एक दैवत्व होतं. आपल्या मावळ्यांवर, रयतेवर त्यांनी जीवापाड प्रेम केलं. जातीपातीच्या भिंती तोडून त्यांनी सर्वांचा सन्मान केला. तलवारी धारण करणार्‍यांना मानकरी, भाले फेकणार्‍या पटाईतांना भालेराव अशा गौरवशाली उपाधी दिल्या. जीवावर ऊदार होऊन लढणार्‍यांना सोन्याचे कडे काढून देत..
धारातिर्थी पडलेल्या मावळ्यासाठी त्यांनी
अश्रु ढाळले.त्याच्या परिवाराची काळजी वाहिली.

शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर मावळे मरायला तयार असत..
त्यांना दूरदृष्टी होती. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर त्याचा विकास आणि विस्तार कसा होईल याचा पक्का विचार त्यांनी केलेला होता..खंबीर आणि अविचल असणार्‍या महाराजांनी शत्रुला लुटून त्याच्याच साधनसंपत्तीने त्याच्यावर मात करुन स्वराज्य समृद्ध केले.पण असे करतानाही त्यांनी धार्मिक भावनेचा आणि संस्कृतीचा अनादर केला नाही… त्यांची सकारात्मकता, देवावरची अगाध श्रद्धा ही नेहमीच प्रेरणादायी असायची.

शौर्याचे मूर्तीमंत प्रतीक तर ते होतेच, शिवाय श्रम, साधना, चातुर्य कलाप्रेम आदी कलागुणांचा संगम त्यांच्या ठायी होता. म्हणून हा रयतेचा राजा एक जाणता राजा होता…

शाहिस्तेखानने त्याच्या डायरीत, ज्याला शाहिस्तेखान बुर्जी म्हणत.. त्यात एका घटनेची नोंद आहे.
शिवराय आले तसे तुफानासारखे लालमहाला बाहेर पडले. इतक्यात शाहिस्तेखानची बहिण धावत आली.
म्हणाली, “भाईजान मेरी बेटी लापता है !”
बोटं तुटलेला शाहिस्तेखान मात्र स्मितहास्य करत तिला म्हणाला.. “शिवाजी महाराजाची माणसं तिला पळवणार नाहीत. आणि पळवलीच तर तो शिवाजी राजा आहे.तो तिची पोटच्या लेकीसारखी काळजी घेईल..तू बेफिक्र रहा…” शत्रुलाही शत्रुच्या चारित्र्यावर असणारा विश्वास हे खूप महानतेचे लक्षण आहे..

।।अपकिर्ती ते सांडावी।सत्किर्ती ती वाढवावी।
विवेके दृढ धरावी। वाट सत्याची।।
हा संत रामदासांचा संदेश शिवाजी महाराजांनी तंतोतंत आचरणात आणला…
म्हणून ते युगपुरुष ठरले…
हिंदवी राज्य..हिंदुत्व..यांच्या व्याप्त व्याख्या त्यांनी दिल्या..ज्याचा सखोल अभ्यास आज शिवजयंतीच्या निमित्ताने करणे ही काळाची गरज आहे..

शिवाजी राजे हिंदवी साम्राज्यासाठी, समृद्धीसाठी परकीयांपासून सावध जरुर राहिले. पण त्यांनी धर्मसहिष्णुता सदैव सांभाळली. परकीयांची निंदा केली नाही. अनादर दाखवला नाही. जे चांगले ते अनुकरणीय…ते जतन केले.
म्हणून ते विश्ववंदनीय, विश्वभूषण युगपुरुष ठरले…

महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिवजयंती साजरा करण्याचा पायंडा घातला..तो शिवरायाचे आदर्श गुण पिढ्यापिढ्यांत झिरपले जावेत म्हणून..
केवळ एक सण म्हणून शिवजयंती साजरी केली जाऊ नये.. तर या दिवशी एक निकोप समाज घडविण्याची शपथ प्रत्येकानीच घ्यावी… काळाची ती गरज आहे…

राधिका भांडारकर

– लेखन : राधिका भांडारकर, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर लेखन.प्रत्येकाने वाचलेच पाहीजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments