आज, १९ फेब्रुवारी, शिवजयंती. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्य कर्तृत्वाचा थोडक्यात घेतलेला हा प्रेरणादायी आढावा. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन.
— संपादक
“महाभाग्यवान मी…
महाराष्ट्र माझी मायभूमी…महाराजांचीच ही महतकरणी !”
शुक्रवारचा दिवस होता, रात्रीची वेळ होती. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद अन् काळजी झळकत होती. साऱ्या गडाचे लक्ष लागले होते…
ते जिजाऊंकडे शिवनेरीत बांधलेला पाळणा मोठ्या प्रतिक्षेत होता. क्षणातच आनंद उधळीत एक बातमी चोही दिशेला वाऱ्यासारखी पसरली. पुत्ररत्न झाले.. पुत्ररत्न झाले !
क्षणात गडावरील सारं वातावरण ढवळून निघालं. गडावर सर्वत्र नागरे-चौघडे वाजू लागले होते. चोहीकडून एकच वार्ता कानावर पडत होती. जिजाऊंच्या उदरी पुत्ररत्न झाला… अर्थातच शिवबाचा जन्म झाला अन् जणू काय भारत मातेच्या रक्षणार्थ.. हिंदवी स्वराज्याचा क्रांतीसूर्यच उदयास आला.
ह्या शुभ बातमीच्या प्रित्यर्थ रयतेचं तोंड गोड करण्यासाठी सर्वत्र साखरेचं वाटप झालं. लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक ठळकपणे दिसत होती. मांसाहेब जिजाऊंच्या मुखावर सोन्यावानी चमक झळकत होती. खरं तर, त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांना आकाशही ठेंगणं वाटत होतं. तो भाग्यवान दिवस म्हणजे १९ फेब्रुवारी. चला तर, शिवजयंतीनिमित्त आपण सर्वधर्मीय लोक शिवछत्रपतींच्या शौर्यगाथेला त्रिवार मानाचा मुजरा करूया, अन् त्याबरोबरच शिव जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करूया ! बोला… छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ! जय🚩भवानी ! जय⚔️शिवछत्रपती !
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीला महाराजांनी भारतातल्या पहिल्या आरमाराची स्थापना करण्याचा मान दिला. शत्रू पक्षाला गाफील ठेऊन गनिमी काव्याच्या युद्धतंत्राद्वारे शिवबाचे सैनिक कल्याण खाडीतून आपल्या आरमाराद्वारे हल्ले करायचे. केवळ भारतातल्या अंतर्गत शत्रूंनाच नव्हे तर, डच, पोर्तुगाल, इंग्रज, मोगल आदींना सुद्धा शिवछत्रपतींच्या आरमार यंत्रणेने जेरीस आणले होते. हिंदुस्थानाच्या इतिहासात सागरी बळाची उपयुक्तता व ताकद ओळखली ती शिवरायांनी. त्यांनी भारतीय आरमाराची या देशात सर्वप्रथम उभारणी केली. त्यामुळे शिवछत्रपतींना हिंदुस्थानी आरमाराचे (इंडियन नेव्ही) आद्यप्रणेते म्हणतात. महाराजांच्या जंगी बेड्यात सुमारे ७४ गलबते होती. अर्थातच शिवकालीन काळात महाराजांच्या आरमार दलाचा सर्वदूर दबदबा होता. दरम्यान दिपावलीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच २४ ऑक्टोबर १६५७ रोजी शिवरायांनी कल्याणला स्वतंत्र करून दुर्गाडीवर आपल्या हिंदुत्वाचा भगवा फडकवला.
मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ कल्याणहून करत शिवरायांनी पुढे युद्धकौशल्याच्या बळावर सलग ४० किल्ले सर केलेत. राष्ट्रभक्तीसह हिंदुत्वाची भावना रयतेच्या मनात बिंबविण्याच्या दृष्टिकोनातून शिवबाने जिजाऊंच्या संकल्पनेतून दुर्गाडी किल्ल्यावर भवानीदेवीची प्रतिष्ठापना केली. यास्तव आम्ही कल्याणकर मांसाहेब जिजाऊ अन् शिवरायांचे ऋणाईत होऊन त्यांना त्रिवार नमन करतो.
मित्रहो, १६७४ साल उजाडलं अन् मराठी राज्याच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. दरम्यानच्या काळात शिवराज्याभिषेकसंदर्भात स्वकियांनी आणि परक्यांनी अनेक वेळा अडथळे आणलेत. त्यामुळे जिजामाता अत्यंत व्यथित झाल्या होत्या. त्या नेहमी शिवबाच्या राज्याभिषेकबाबत चिंतित असायच्या. शेवटी त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं. काशीच्या गागाभट्टांना शिवबाच्या राज्याभिषेकचं पौरोहित्य सोपविण्यात आलं. या कारणास्तव रायगड नटूनथटून उभा होता. जिजाऊंच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी रायगडावर मोठी गर्दी उसळली होती. रायगडाच्या प्रवेशद्वारावर देशी व परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खरेखुरे गजराज उभे ठाकले होते. ६ जून १६७४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. तोफांच्या सलामीनं अन् तुतारींच्या निनादात किल्ले रायगडावरील वातावरण ढवळून निघालं होतं. याप्रसंगी शिवरायांच्या नावाचा सर्वत्र जयघोष होत होता. गुलालाची उधळण होऊन किल्ल्याचा सारा परिसर भगवामय होऊन आनंदाने बहरून गेला होता.
राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी महाराजांच्या नावापुढे छत्रपती अश्या एका अर्थानं नामकरण झालं. जिजाऊंच्या डोळ्यांचे पारणं फिटलं. जीवनाचं अखेरचं स्वप्न साकार झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी जणू एकाएक नाहिशी झाली होती. त्या तृप्त झाल्या. त्या धन्य झाल्या. त्यांना ह्याची देही ह्याची डोळा शिवबाचा राज्याभिषेक पहावयास मिळाला.
राज्याभिषेक झाल्यानंतर शिवबा हे सिंहासनावर विराजमान झाले. त्या आधी त्यांनी गागाभट्ट आणि जिजाऊ मातेचं चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले. जिजाऊ ह्या शिवछत्रपतींची दृष्ट काढत म्हणाल्या, “शिवबा तुम्ही राजा झालात, रयतेचे राजा झालात. महत्वाचे म्हणजे तुम्ही छ्त्रपती झालात. आता तुम्ही आदर्श राजा होऊन पृथ्वीवर किर्तीमान व्हा”. शिवबाचा राज्याभिषेक व्हावा, यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत घट्ट धरून ठेवला होता. कारण हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवबाला छ्त्रपती केल्यावर अवघ्या आठवड्यातच त्यांना देवाज्ञा झाली. धन्य त्या जिजाऊ मांसाहेब ! आम्ही मराठी भूमिपुत्र वंदनीय जिजाऊ माँसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा करतो.
शिवबा हे मातृभक्त होते. ते मातेची आज्ञा शिरसावंद्य मानत असत. शिवबांचे पिताश्री शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारी मोठे सरदार होते. परिणामी मराठी राज्याची संपूर्ण धुरा जिजाऊ माँसाहेबाच्या खांद्यांवर आली होती. दरम्यान जिजाऊंनी शिवबाला युद्धतंत्राचे परिपूर्ण प्रशिक्षण देऊन पारंगत केलं. शिवबाला आदर्श राजा बनविण्याचा जिजाऊंचा मानस होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यकारभाराचे बारकावे ज्ञात करून देण्यात आले होते. शिवबाची मातृभक्ती अपरंपार होती,. तर जिजाऊंचे पुत्रप्रेम अटूट होतं.
शिवबा हे मातेच्या आज्ञेप्रमाणे राज्यकारभार करत असत. विशेष म्हणजे ते मातेच्या आज्ञा शिरसावंद्य मानत असत. एके दिवशी मांसाहेबांनी “मला कोंढाणा हवा आहे”, अशी इच्छा व्यक्त केली असता, शिवरायांनी लगेच आपले शूरवीर विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांना कोंढाणाच्या दिशेने कूच करण्याचा फर्मान सोडले. त्याच दिवशी नेमका त्यांच्या मुलाचा लग्नसोहळा होता.तरी देखील तानाजींनी शिवबाची आज्ञा शिरसावंद्य मानून कोंढाण्यावर स्वारी करून तो सर केला. परंतु तानाजी धारातिर्थी पडले.त्यामुळेच शिवकालीन इतिहासात “गड आला पण सिंह गेला” हे सुवर्णाक्षरात लिहिेलं गेलं. इतकेच नव्हे तर,जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवबा अन् त्यांच्या शुरवीर मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेची आई जगदंबेसमोर शपथ घेतली.
शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजे संभाजी महाराजांनी स्वकियांची बंडाळी मोडीस काढून शंभरहून अधिक युद्धे जिंकली.या पार्श्वभूमीवरच शिवकालीन इतिहासाचा शिवशंभु कालखंड असा उल्लेख केला जातो.
शिवबा हे परस्त्रीला मातेसमान मानत असत.स्री मग ती आपल्या राज्यातली असो वा परक्या मुलखातली, ती मातेसमानच असते,ही शिकवण शिवबांनी सैनिकांसह रयतेलाही दिली.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले असता, ही कृती महाराजांना अजिबात आवडली नाही. त्यांनी त्या परस्त्रीला मातेप्रमाणे आदरतिथ्य करून तिला तिच्या राज्यात सन्मानाने पोहोचविले. या घटनेला शिवकालीन इतिहास साक्षीदार आहे. अशीच एक अप्रिय घटना घडली की, एका गावप्रमुखाने स्त्रीच्या अब्रूची हेळसांड केली.हे कळल्यावर त्या दोषी व्यक्तीचे हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याचा महाराजांनी फर्मान काढला.हे सर्व मांसाहेब जिजाऊंच्या संस्कारांचे फलित होते.
शिवबा हे खऱ्या अर्थानं स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्त्रियांना स्वरक्षण करता यावे, या उद्देशाने शिवरायांनी आपल्या राज्यातील महिलांना तलवारबाजीचे प्रशिक्षण देण्याची सोय केली होती. तात्पर्य, असेही शिवरायांना स्त्रियांबद्दल नितांत आदर होता. वास्तवात शिवकालिन काळात स्त्रीला देव्हाऱ्यातली देवता मानायचे.
शिवबा हे शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, हा विचार त्यांनी रयतेला दिला. शिवरायांच्या उच्च सैनिकांत सर्वाधिक शेतकऱ्यांची मुलं होती, हे जाणून त्यांनी शेतकऱ्यांचे हित जपण्यास नेहमी प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात बळीराजाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, सर्वाधिक उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन ते गौरवित असत. तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिवकाळात मोफत बी-बियाणे पुरविली जायची. तसेच शेतसारा किफायतशीर प्रमाणात आकारला जायचा. पडीक जमिनीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्याकडून अर्थसहाय्य दिलं जायचं. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला जात असे.
“वृक्ष तोड करू नये”, असे कडक आदेश शिवरायांनी राज्यात काढले होते. शिवबा हे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यास अग्रक्रम देत असत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली तर, राज्याला संपन्नता येईल, असे त्यांचे ठाम मत होते. “शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही”, असं सक्त फर्मान त्यांनी काढलं होते. शेती हा हिंदवी स्वराज्याचा पायाभूत उद्योग असल्यानं, युद्धकाळात उभ्या पिकांची नासाडी करणे, हा दंडनीय अपराध मानला जायचा. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर शिव छत्रपती हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, हे दृष्टोत्पत्तीस येते.
मोगल बादशहांच्या तुलनेने सैन्यदल व युद्धसामग्री कमी असूनही शिवछत्रपतींनी गनिमी कावा युद्धतंत्राचा अचूक प्रयोग करून शत्रूपक्षांना नामोहरम केलं. वास्तवात शिवरायांचे युद्धनैपुण्य अद्वितीय होतं. अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, आग्राच्या नजरकैदेतून शिताफीने केलेली सुटका, शाहिस्तेखानवर हल्ला करत त्याच्या हाताची बोटं छाटणं, कोंढाण्याचा विजय या सर्व ऐतिहासिक घटनांमधील यश हे शिवबाच्या गनिमी कावाचे फलित होतं. त्यामुळेच आजही महापराक्रमी राजा म्हणून रयतेच्या मनावर त्यांचे अधिराज्य आहे
राज्याची मदार ही गडकिल्ल्यांवर आहे, हे जाणून शिवछत्रपतींनी राजगड, शिवनेर, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, विशालगड,
प्रतापगड आदी किल्ले, कोट, जंजिरे उभारून राज्याची तटबंदी मजबूत केली. शिवकालीन राज्यव्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध होती. राज्यकारभार पारदर्शक व गतिशील व्हावा, यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ नेमले होते.
शिवकालीन नोकऱ्या अन् सैन्यभरती ही जाती -धर्मावर आधारित नव्हे तर, वैयक्तिक गुणवत्ता व युद्धनैपुण्यावर होत असे. राजाप्रती सरदार व सैनिकांची अपार निष्ठा तर, शिवबाचा त्यांच्यावरील दृढविश्वास असं एकमेकात अटूट बंध होतं. सैन्यदलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरदार अन् सैनिकांना शिवबाच्या हस्ते बक्षिसे व उच्च पदे बहाल केली जात असत. यामुळेच शिवरायांची कुशल प्रशासक म्हणून रयतेत ख्याती होती. आजही त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्राचा राज्यकारभार हाकला जात आहे, याचा आम्हा मराठी जनमानसाला सार्थ अभिमान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९५ वी जयंती साजरी होत आहे. शिव जयंती दिनानिमित्त शिवनेरी कि्ल्यासह राज्यभर वाजतगाजत, गुलाल उधळत ढोलताशांच्या निनादात छत्रपतींचा जयंती महोत्सव साजरा होणारच, हे त्रिकाल सत्य आहे.
मित्रहो, शिवरायांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला अन् ते छ्त्रपती झाले या किल्ल्यावरील शिव छत्रपतींच्या भव्यदिव्य पुतळ्याला अन् अन्य पवित्र देवस्थळांना कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून अखंड पुष्पहार सेवा हा नाविन्यपूर्ण व अद्वितीय उपक्रम गेल्या ५ वर्षांपासून अविरत चालू आहे. सदर उपक्रमाला उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रेरणा आहेच. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शिवाजी महाराजांचे वंशज छ्त्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या उपक्रमाचे नियोजन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, उप मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तनमनधनानं केलं जात आहे ही गोष्ट शिवरायांचे ऐतिहासिक वैभव वृद्धिंगत करणारी असून, महाराष्ट्राच्या दृष्टीने खचितच गौरवास्पद आहे. वास्तवात शिवजयंतीनिमित्त हीच छ्त्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली आहे.चला तर, आपण सकल मराठी भूमिपुत्र वंदनीय शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करूया.
जय🚩महाराष्ट्र !

— लेखन : रणवीरसिंह राजपूत.
निवृत जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800