शिवाजी महाराजांनी कृषी क्रांती, आर्थिक क्रांती, सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती केली त्या आधारावर स्वराज्याची निर्मिती केली, हिंदूंचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले, म्हणून पुढील काळात मराठ्यांनी जवळपास सर्वच भारतावर राज्य केले असे प्रतिपादन इतिहासकार मा पांडुरंग बलकवडे यांनी कल्याण येथे गणेशघाट येथे “शिवराय अभिवादन” कार्यक्रमात वसूबारसेला ९ नोव्हेंबर रोजी केले.
इतिहास संकलन समिती कल्याण जिल्हा व संस्कारभारती कल्याण जिल्हा, अ.भा.कोळी समाज ठाणे जिल्हा यांच्यातर्फे यंदा शिवराजाभिषेकाचे ३५० वे वर्ष, तसेच राजमाता जिजाऊ यांची ३५० वे पुण्यतिथी वर्ष यानिमित्ताने वसुबारसेला हिंदवी स्वराज्याचा आरमार दिवस कल्याण पश्चिमेतील गणेश घाट येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कोळी महिलांसहीत भगिनी वर्ग दुर्गाडी देवीच्या समोर किल्ल्यावर मातृकलश पूजन करून राजमाता जिजाऊसाहेब यांना अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहण्यासाठी भोई ज्ञाती समाज कोळीवाडा, कल्याण येथील भगिनींनी भरत भोपी आणि सहकाऱ्यांनी सजवलेल्या पालखीतून हा मातृकलश दुर्गाडीवर नेला. आणि दुर्गाडी मातेसमोर कलश पूजन करून एक अभिनव आदरांजली राजमाता जिजाऊंना वाहिली. कल्याणचे दिनेश देशमुख यांनी देवीसमोर भगिनींकडून कलश पूजन करवून घेतले. भोईवाडा तर्फे आई दुर्गाडी ची ओटी भरण्यात आली. भगिनींनी धर्म, संस्कृती रक्षणासाठी बल देण्यासाठी देवीची प्रार्थना केली. त्यानंतर पालखी गणेश घाटावर आली. आणि शिवरायांच्या प्रतिमेजवळ स्थापन केली. वसुबारसेच्या पुण्य पर्वानिमित्त गोवत्स द्वादशी निमित्त गाय आणि तिच्या गोंडस वासराचे पूजन पांडुरंग बलकवडे, योगेश सोमण यांच्या हस्ते संपन्न झाले.
प्रति वर्षाप्रमाणे गणेश घाट खाडीमध्ये जाऊन मान्यवरांनी जल पूजन केले. अमोल जोशी गुरुजी यांनी दोन्ही ठिकाणी अत्यंत सुंदर असे पौरोहित्य केले. मोटरमन लोकल रेल्वे, कल्याण सत्यदेव सिंग यांनी लिहिलेल्या हिंदीतील श्री शिवरायांच्या चरित्रा वरील हिंदी खंड काव्याचे प्रथम प्रकाशन, आणि सांस्कृतिक भारत या त्रैमासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. पांडुरंग बलकवडे आणि प्रसिध्द अभिनेते संस्कार भारतीचे योगेश सोमण, इ.सं.समिती कोकण प्रांत प्रतिनिधी सुरेश खेडकर , माजी खासदार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, रा.स्व.संघ जिल्हा संघचालक डॉक्टर विवेक मोडक, संस्कार भारतीचे संजय गोडसे ,त्रैमासिकाचे संपादक प्रविण देशमुख, विभिन्न कोळीवाडे, चंद्रकांत जोशी प्रमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, हिंदू संस्कृतीतील पवित्र पर्व दिवाळीचे सुरू आहे. वसुबारस आहे. व छत्रपतीच्या राजाभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने राज्यभर शिवकार्याचा जागर होत आहे. तसेच राजमाता जिजाऊचे ३५० वे स्मृतीवर्ष आहे. या सर्व पवित्र क्षणांचा संगम साधून हा पवित्र कार्यक्रम होत आहे. शिवरायांचे आरमार शक्तीशाली आहे. शिवाजी राजांनी युरोपयीन अभियंत्यांना आपल्या सेवेत ठेवून पाश्चात्य आरमार बांधणीचे शास्त्र अवगत केले आहे. त्याच बरोबर हिंदुस्थानचे हजारो वर्षापूर्वीचे प्राचीन नौकानयन शास्त्र आहे याचा संगम करून अभियात्य असे आरमार निर्माण केले आहे. संगमश्वेरी नावांच्या जहाजांची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली आहे. इंग्रज सेनापती सांगतात की, शिवाजी महाराजांच्या नौका कमी पाण्यातून येऊन आम्हाला हुलकावणी देतात व पुन्हा सागरी काठावर येतात. त्या नौकाचा पाठलाग करणे कठीण आहे. कारण आमच्या नौकांसाठी खोल समुद्राची गरज आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या नौका चार फूट खोलीतून ही प्रवास करू शकतात. आणि आज आपल्याला अश्या प्रकारच्या आरमारी नौका बांधण्याची आवश्यकता आहे. याला क्रांती म्हणतात असे ही त्यांनी सांगितले.
मुस्लीम आक्रमकानी हिंदूंचा अपमान करण्यासाठीच त्यांच्या घरादारांवरून, वाडी वस्त्यांवरून, जहागिऱ्यांवरून गाढवांचा नांगर फिरवून पहार ठोकली आणि तुटकी चप्पल टांगून ठेवली व गलिच्छ दहशत पसरवली.परंतु जिजाऊ साहेब यांनी जगातील आगळावेगळा प्रयोग घडवून आणला पुण्यातील जहागिरीत सोन्याचा नांगराचा फाळ लावून जमीन नांगरून नवा मांगल्याचा संदेश दिला शेतकरी बलवान केला संपन्न केला त्याच्या मुळेच इतर अठरा कारखाने तयार झाले लोहार सुतार शिंपी सोनार पाथरवट गवंडी यांचे उद्योगचक्र सुरू झाले आणि सर्वच हिंदू समाज समाज समृद्ध, संपन्न, बलशाली झाला अशी मांडणी केली असल्याचे ही बलकवडे यांनी सांगितले.
योगेश सोमण म्हणाले, इतिहास संकलन समिती आणि संस्कार भारती या संस्थांमुळे वसुबारसच्या निमित्ताने गोमातेची पूजा करता आली. माझ्या आयुष्यात मी प्रथमच वसुबारसच्या दिवशी गोमातेची पूजा केली आहे. शाहू महाराज आणि जिजाऊंची राजमुद्रा पार्शियन मध्ये होते. पण त्या कालखंडातील शिवाजी महाराज एकमेव राजे होते त्यांची राजमुद्रा संस्कृतमध्ये आली. त्यावरचा विचार हा दूरदर्शी आहे. इतिहासात शिवाजी महाराज हाच एक चमत्कार होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वाना ताठ कणा दिला आहे. तो कधी ही झुकत नाही. त्यांचे हे देणं आपण लेणंसारखं मिरवावे असे ही त्यांनी सांगितले.
शाहीर अर्जून पाटील यांनी शिवरायांवर पोवाडा सादर करुन सुरुवात केली. सायली फणसे यांनी प्रास्ताविक केले.तर पाहुण्यांचा परिचय डॉ.प्राची दामले यांनी करुन दिला. ओवी मुंडे या शाळकरी मुलीने अत्यंत सुंदर असे संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. या समारंभास सागरी सीमा मंचाचे चंद्रकांत गोसावी स्वा. सावरकर अभ्यासक. दुर्गेश परुळकर, संस्कार भारतीचे उदय शेवडे, नाट्य निर्माते संदीप विचारे, रेखा चौधरी आणि राजन चौधरी इ. अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वाळुंजकर . डॉ . प्रकाश करमरकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भरत भोपी, दिनेश पाटील, विविध कोळीवाड्यांमधील तरुण, संस्कार भारतीचे अविनाश नेवे, श्री कर्णिक, श्री साठे, सौ मेघना कुळकर्णी, रा स्व संघ कल्याण, क्रिडा भारती, चंद्रकांत जोशी इत्यादींनी परिश्रम घेतले.
— लेखन : प्रवीण देशमुख.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800