छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन.
– संपादक
शिवूप्रभुंचा जन्मच मुळी शिवनेरी किल्ल्यावर शके 1551 शुक्लनाम संवत्सरी फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवारी, 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. आणि अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी तोरणा किल्ला ताब्यात घेऊन हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधिले.
श्री शिवछत्रपतींची दुर्गाविषयीची संकल्पना विशद करताना रामचंद्र अमात्य शिवरायांच्या शब्दात लिहीतात “संपुर्ण राज्याचे सार ते दुर्ग होय. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रभाभग्न होऊन देश उध्वस्त होतो. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामीनी गडावरूनच निर्माण केले”. असे आज्ञापत्रात पृष्ठ 61 व 62 वर रामचंद्र अमात्यांनी दुर्गाविषयीचे महत्त्व सविस्तरपणे कथन केले आहे.
सुरूवातीस हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडावरून शिवाजीमहाराजांनी राज्यकारभार पाहिला.
पुढे 1670 साली स्वराज्याची अंतिम राजधानी म्हणून रायगडाची निवड करून तेथे राजधानीला अनुरूप अशा साजेशा इमारती बांधल्या. राजदरबार, राजसिंहासन, राणीवसाचे राजवाडे, महाराजांचे निवासस्थान, गजशाळा,अश्वशाळा, भव्यदिव्य अशी आखीव रेखीव प्रशस्त बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, गंगासागर तलाव, त्यावर साक्षीदार म्हणून उभे असलेले वैभवशाली मनोरे, बालेकिल्ला, टांकसाळ, खलबतखाना, स्वराज्याच्या ऐतिहासिक दप्तरखान्यासाठी प्रशस्त इमारत, कैद्यांसाठी अंधारकोठडी, शिरकाई देवीचे मंदिर अशा अनेक इमारती सुप्रसिद्ध शिवकालीन स्थापत्यशास्त्रज्ञ हिरोजी इंदूलकर यांच्या अधिपत्याखाली निर्माण केल्या. जगदीश्वर मंदिरात प्रवेश करतानाच्या पायरीवर “ सेवेच्या ठायी तप्तर, हिरोजी इंदूलकर “ अशा ओळी तेथे कोरलेल्या आहेत.
याच रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक 6 जून 1674 रोजी संपन्न झाला आणि मराठ्याचा राजा पातशहा झाला. सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या “शिवाजी आणि शिवकाळ” या ग्रंथात लिहीतात, “राष्ट्र निर्माण करणे, राज्य स्थापणे, शत्रूचा पराजय करणे व स्वता:चे रक्षण करणे, या सर्व गोष्टी करण्यास हिंदु जाती समर्थ आहेत. इतकेच नव्हेतर हिंदुच्या राज्यात वाङ्मय, कला, उद्यम, व्यापार, यांचे संरक्षण व भरभराट होऊ शकते. अनेक वर्षांच्या गुलामगिरीच्या शृखंला आणि शेकडो वर्ष चालत आलेली मुसलमानी दडपशाही एका “ शिवाजीमहाराज “ नावाच्या म॔त्रानी दूर फेकून देऊन स्वतः राज्याभिषेक करून कलसाध्याय चढविला.”
सुरतेहून इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून आलेल्या हेन्री ऑक्झिडेन यांने या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन तपशीलवार लिहून ठेवला आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाची, कर्तृत्वाची, युध्दनीतीची, प्रशासकीय पध्दतीची, गडकिल्ले व्यवस्थापनाची आज जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. त्यांची महत्ती 1672 च्या “ लंडन टाईम्स ” या वृत्तपत्रात पहिल्याच पृष्ठावर इंग्रजांनी प्रशंसोद्गार काढले आहेत.फादर लॅन्ये यांनी 1707 साली लॅटिन भाषेत लिहीलेल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे कि, अखिल हिंदुस्थानात शिवाजीमहाराजांचा धाक वाटतो. औरंगजेबच्या पदरी सेवेत असणारा इटालीच्या मनुची याने तसेच अनेक परकिय इतिहासकारांनी शिवाजीमहाराजांच्या विषयी महत्त्वपूर्ण नोंदी लिहून ठेवल्या आहेत.
सिकंदर, अलेक्झांडर दि ग्रेट, हाॅनीबाळ, सरोटियस, नेपोलियन या सर्वापेक्षा महारांजाच्या चारित्र्याची आणि लौकिकाची झेप अत्युच्चम असल्याचे जगाने मान्य केले आहे. शिवाजीमहाराजांचे स्वराज्य प्रस्थापनेचे जे स्वप्न होते त्याची विशाल कक्षा समजून घेण्यासाठी इतिहासकारांनी ज्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी धर्म, प्रांत, यांच्या चाकोरीबाहेर जाऊन शिवचरित्राचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
शिवछत्रपतींनी हिंदु, मुसलमानातील साधू , फकीरांना सारख्याच पूज्य भावनेने वागविले. आपल्या सैन्यदलामध्ये धर्म अथवा जातीची दखल न घेता गुणवत्तेनुसार नेमणूका केल्या. संत तुकारामांचे ज्या प्रमाणे आशीर्वाद घेतले त्याप्रमाणे बाबा याकूत या मुसलमान संताचेही घेतले. सुरत स्वारीच्या वेळी धर्मगुरू रेव्हरंड अमाग्रस भेटीस आल्यावर त्यानी चर्चेला अभय देण्याची विनंती करताच ती मान्य करून जरासुध्दा धक्का लावू दिला नाही.
आपल्या आरमारात दौलत खान, अब्राहम खान, मायनाक भंडारी, सिद्दी इब्राहिम, आग्रा भेटीच्या वेळी मदारी मेहतर हा अठरा वर्षाचा तरुण मुसलमान मुलाची अंगरक्षक म्हणून सोबत नेला होता.
औरंगजेबच्या पदरी असलेल्या इतिहासाच्या नोंदी लिहून ठेवणारा खाफीखानने महारांजाविषयी लिहितो,“ शिवाजीमहाराजांना युध्द मोहिमेत कुराणाची प्रत सापडली तरी तिचा ते आदर करीत व आपल्या मुसलमान सैनिकांस देत. स्त्रिया मुसलमान असोत अथवा हिंदु त्यांना सन्मानपुर्वक त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करीत.
शिवछत्रपतींनी फक्त पन्नास वर्षाचे आयुष्य लाभले. अगदी दिवसांच्या आकड्यात सांगायचे झाल्यास महाराजांना एकूण 18306 दिवसांचे आयुष्य नियतीने त्यांच्या वाट्याला दिले. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना प्रेरणादायक, स्फूर्तिदायक, राष्ट्रवादाची, असिम त्यागाची शिकवण देणारी ठरली आहे.
अशा युगप्रवर्तक युगपुरुषांनी आपल्या आर्दशव्रत जीवनाचे उत्कृष्ट उदाहरण ठेवून आपला अखेरचा श्वास रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी घेतला. निश्चयाचा महामेरू अनंतात विलीन झाले.
या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजीमहाराजांना मानाचा कोटी कोटी मुजरा ! प्रणाम! जय शिवराय !
— लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800