“आपल्या देशाचा इतिहास धर्माधर्माच्या लढाईचा कधीच नव्हता व नाही कारण मुघलांकडे जसे हिंदू सरदार होते तसेच छत्रपती शिवरायांकडेही अत्यंत विश्वासू मुस्लीम सैनिक प्रमुख सरदार होते. तो लढा स्वातंत्र्य व स्वराज्याचा होता. पारतंत्र्याच्या विरोधातील होता. त्याला जाती, धर्मात अडकवणे गैरच. छत्रपती शिवरायांचे विचार, कार्य जाती धर्मापलीकडील होते. ते खरे महापुरुष होते” असे प्रतिपादन रिड ॲन्ड लिड फाउंडेशनचे मिर्झा अब्दुल कयुम नदवी यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या शिवजयंती समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना नदवी यांनी विविध ग्रंथातील संदर्भ देत धर्मनिरपेक्ष शिवराय व शिवराज्याचे, स्वराज्याचे दाखले दिले. गोविंद पानसरे यांनी शिवरायांचे विचार, कार्य खऱ्या अर्थाने बहूजनात रूजवल्याचे सांगत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकांनंतर पहिला सत्कार गोवलकोंड्याच्या कुतुबुद्दीन शहानी केल्याचे स्पष्ट केले. मदारी मेहतर, सिद्दी हिलाल, नूर खान, दौलत खान, काझी हैदर यांचे कार्य स्वराज्यासाठीच होते हे विसरून चालणार नाही. आज आम्ही प्रत्येक महापुरूषास त्या त्या जातीत अडकवून टाकतो हे धोकादायक असल्याचे सांगत मानवतेसाठी कार्य करा. आम्ही शिवराय व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उर्दूतून पुढे नेत असल्याचे त्यांनी नोंदवले.
डाॅ. राजेंद्र शेलार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय समारोपात डाॅ.व्ही.जी.पिंगळे यांनी बहुजनांचे राजे छत्रपती शिवराय विविध उदाहरणे देत अधोरेखित केले.

मिर्झा नदवी यांच्या हस्ते अश्विनी खंडारे, मयुरी वाघ, संध्या हुंडे, ऋतुजा धनवटे संपादित संविधान साक्षरता या भित्तिपत्रकांचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सतीश वाघमारे यांनीतर आभार डाॅ. संघरत्न गवई यांनी केले.

यावेळी डाॅ.आर.व्ही. मस्के, डाॅ.एस.पी. खिल्लारे, डाॅ. बी.एन. शिंदे, आयोजक डाॅ.एस.पी. बुधवंत, प्रा. नवनाथ गोरे, प्रा.अंबादास कायंदे, डाॅ. प्रज्ञा रूईकर साळवे, अधिक्षक राजू पट्टेकर, डाॅ. गणेश खिल्लारे, डाॅ.विजय आडे, डाॅ.प्रेमराज वाघमारे, डॉ.अशोक केवटे, डाॅ.वैजनाथ सुर्यवंशी, डाॅ. उमेश मालपाणी यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800