काल मुलाची वही चाळतांना नजर शेवटच्या पानावर जाऊन स्थिरावली. पानावर असलेला अक्षरांचा, आकड्यांचा आणि रेघोट्याचा गोंधळ पाहून मला आमच्या शाळेतील वहीच शेवटचं पान आठवलं.
शेवटच पान !!
आमचं पण वहीचं शेवटचं पान असच कित्येक अनुभवांनी भरलेलं असायचं.
शेवटचं पान मग ते वहीचं असो की आयुष्याचं या पानावर सगळं कस माफ असतं.
या पानाच्या नंतर जशी वही संपते ना तसंच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातपण नंतर सगळे संपलेले असते, सगळे माफ असते.
या पानावर सारांश असतो सगळ्या वहीचा, आकडेमोड केलेली असती अगदी गरजेची, नोंदी केलेल्या असतात कामाच्या, बेरीज वजाबाकी असते झालेल्या हिशोबाच्या, रेघोटया असतात. बिनकामाच्या, झालेल्या चुका असतात. खंत करायला लावणाऱ्या जीवनाचं ही अगदी तसंच असते.
तरीही किंमत अगदीच शून्य कारण ते असते शेवटचे पान. !!!
वास्तविक पाहता पहिल्या पानाइतकीच किंमत असलेले हे पान का कोणास ठाऊक एखाद्या शापित व्यक्तीसारखे सर्व दुःख भोगत असते. त्याचीही तेवढीच मूल्य असतात जेवढी पहिल्या पानाची मग हा भेदभाव का ? जर तुम्ही शेवटाला असाल म्हणून तुम्हांला ती वागणूक द्यायची का ?
अहो शेवटचे पान म्हणून आपण त्याला हिणवतो, खरं तर तेच पहिल्या पानाचा अर्धा भाग असते हे ज्याला उमजलं तो तेवढ्याच काळजीने शेवटच्या पानाची काळजी घेतो.
सुंदर अक्षराची वाट बघत असलेले हे पान त्या स्वप्नामध्ये असतांना नियती जणू त्यावर अचानक आघात करून स्वप्नभंग करते आणि त्याच्या वाटी येते ते कष्ट, निराशा आणि विस्कळीतपणा.
असंच काही तरी आपल्या जीवनाबद्दल पण घडत. शेवटाला मनुष्य सुख शोधतो आणि त्याच्या वाट्याला येते ती नात्यातील दुरावा, हेवेदावे आणि आप्तस्वकीयांची मानधरणी.
शाळेतील वह्यामध्ये आम्ही खूप काही ठेवायचो. त्यात सगळ्यात आधी आठवत ते पिंपळाचं पान !!!
हिरवंगार पान त्या कोंडलेल्या आयुष्यात केव्हा म्हातारे होऊन जायचे याचा आम्हालाही विसर पडायचा.
मनुष्याचेही कोंडलेले आयुष्य असेच निघून जाते आणि आमचे पान केव्हा पिकते ते आम्हालाही कळत नाही.
जीर्ण होऊन गेलेले त्या पानाचे खरे आयुष्य सुरु होते तेव्हाच. तेव्हाच त्याची किंमत वाढते. आमच्याही आयुष्याची किंमत त्या जीर्ण पानासारखी शेवटी कोणाला कळाली तर, वाढते नाही तर शेवटी एक पिकलेलं पान म्हणून जगायचं हेच आमच्या हाती !!!
आमच्या वहीमध्ये आणखी एक सुंदर वस्तू असायची ती म्हणजे मोरपंख !!
मोरपंख आमच्याकडे कोठून यायचा आणि कोण द्यायचं हे कधी कधी लक्षात राहत नव्हतं पण तो वहीत सुरक्षित असायचा.
मोरपंख म्हणजे आनंद !!
बघितला की आनंद व्हायचा.
स्पर्श केला की आनंद व्हायचा.
जीवनातले आनंदाचे क्षण ही असेच मोरपंखा सारखे !! हे क्षण असले की जीवन कसे पिसाऱ्यासारखे फुललेले असायचे.त्याचा हळुवार पणे होणारा स्पर्श कित्येक आल्हाददायक भाव मनात निर्माण करत असे. त्याला निरखून बघण्यात आम्ही कित्येक वेळ वाया घालवत.
पुस्तकातील कोणत्याही पानात ठेवा मोरपंख नेहमी ताजातवाणा असायचा, मनमोहक दिसायचा. कदाचित जीवनातील प्रत्येक दिवस आणि क्षण असाच सुंदर आणि मनमोहक असतो. आपल्याला तो शोधून आनंद घेता आला पाहिजे म्हणजे जीवन कसे सुंदर बनते जणू हेच तर तो मोरपंख सांगत नसावा का ?
सापाची कातिन ही एक आम्हा मुलांची पुस्तकामध्ये ठेवण्याची एक वस्तू !!
मुली ठेवत असतील असं मला तरी वाटत नाही !
ही कातिन ठेवण्याचे धाडस आम्ही त्या वेळी करायचो हे वाचून आता आम्हाला भीती वाटते.
सर्पाला जेव्हा नवीन कात येते तेव्हा जुनी झालेली कात सोडून तो पुन्हा वेगवान होतो, चपळ होतो.
ही जुनी झालेली कात मग कोणाला सापडली की तो शाळेत घेऊन आम्हाला वाटायचा. त्या कातिनी वरून बहुतेक सर्पाची जात समजत असावी. कारण त्यावर दिसणारी खवले आणि पापुद्रेदार जाळी दिसायला खूप सुंदर दिसायची.
आपल्या आयुष्यातही खरंच ठराविक वेळेला, ठराविक वयात काही गोष्टी या कातिनी सारख्या टाकून द्याव्यात आणि नवीन सुरवात करावी. जुने वाद, जुनी भांडण, जुने गैरसमज असेच कातिनी सारखे टाकत जावे
आणि जीवनाच्या नव्या उमेदीने आयुष्य जगावे हेच खरं आयुष्य जगणे !!
जर सगळेच दुःख, क्रोध कातिनी सारखे जमा करत गेलो आणि वेळीच ती फेकून दिली नाही तर जसे जगणे अवघड होऊन जाते हेच काय ते या गोष्टी पासून शिकण्यासारखे. !!!
फुलांच्या पाकळ्या सुद्धा आम्ही वहीत किंवा पुस्तकात ठेवायचो कोमजून गेलेल्या एखाद्या फुलाची आठवण सतत आपल्या सोबत असावी हाच बहुतेक हेतू त्या मागे असावा.
एखादा आनंदाचा क्षण नेहमी आपल्या बरोबर असावा आणि त्यालाही जिवंत स्वरूप देता यावं हाच विचार त्या वेळी बहुतेक मनात येत असेल पण या वस्तूंचे असे नाते आपल्या जीवनाशी असेल असं नक्की कुठंतरी मनात येते. !!

– लेखन : प्रकाश फासाटे, मोरोक्को
सुंदर लेख. वास्तवता दाखवणारा. धन्यवाद