पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी या खेडेगावातील पांडुरंग जाधव यांच्या शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणजे, शुभम जाधव.
घरात आजोबा किर्तनकार, वडील माळकरी. त्यामुळे टाळमृदूंगाच्या गजरातच शुभमचे बालपण गेले. तो तीन चार वर्षाचा असताना पासून किर्तनात शेवटपर्यंत टाळ घेऊन उभा राहत असे. त्यातून बालवयातच त्याची चिकाटी लक्षात येत असे.
शुभम चे प्राथमिक शिक्षण सुरु झाले ते गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत. शुभमची हुशारी आजोबांनी अचूक हेरली. त्यांना शिक्षणाची अतिशय आवड होती. त्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणासाठी फलटणला बंगला बांधला होता. मग आता नातवालाही शिक्षणासाठी बाहेर ठेवले पाहिजे, तरच त्याच्यातील हूशारीला वाव मिळेल असे त्यांना वाटले.
शुभम चे काका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. मावशी, काका दोघेही प्रेमळ होते. घरात शैक्षणिक वातावरण होतेच. असे हे सारे लक्षात घेऊन आजोबांनी शुभमला त्यांच्याकडे, माळीनगर येथे ठेवले. त्याचे माध्यमिक शिक्षण तिथेच झाले. पुढे दहावीला त्याला हडपसर येथे ठेवले.
इथेच शुभमच्या करिअरला खरी सुरुवात झाली. शुभमच्या या आत्त्याचा मुलगा अमोल खऱ्या अर्थाने शुभमचा वाटाड्या ठरला.
त्यावेळी माझाही मुलगा योगेश एमपीएससी च्या परीक्षांचा अभ्यास करीत होता. तेंव्हाच शुभमने ठरवून टाकले की आपल्याला पण असेच काहीतरी बनायचे आहे. तो त्यादृष्टीने अभ्यासही करु लागला.
शुभमला दहावीला खूप छान मार्क्स मिळाले. सगळ्यांनी त्याला सायन्स साईडच घे असे सांगितले. पण त्याने स्पष्ट सांगितले की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यामुळे मी आर्ट साईडलाच जाणार. एवढे चांगले मार्क्स मिळूनही शुभम आर्ट्स ला जाणार म्हणत होता कारण त्याचे ध्येय निश्चित होते. अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता तसेच याला फक्त ‘लाल दिवा’!
इथे अमोल ने श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली. त्याने समजावले आता तू सायन्स साईडच घे. पुढचे पुढे बघू. त्यामुळे शुभम ने विज्ञान शाखा निवडली. त्याला बारावी विज्ञान शाखेतही उत्तम गुण मिळाले. तरीही शुभम ने इंजिनिअरिंगला वगैरे न जाता आर्ट्सला प्रवेश घेतला, का तर डिग्री बरोबरच यू पी एस सी चा ही अभ्यास करता यावा म्हणून.
विशेष म्हणजे, शुभम पहिल्याच प्रयत्नात, वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी डिग्री बरोबरच यूपीएससी ची लेखी परीक्षा पण पास झाला. अर्थात ग्रामीण भागातील असल्याने त्याला खूप मेहनत घ्यावी लागली होती.
सर्वांना आनंद झाला. सगळीकडे शुभम कलेक्टर झाल्याची बातमी पसरली. अजून मुलाखत बाकी आहे हे त्यांना कुणालाच माहीत नव्हते. २०१६ मध्ये शुभम मुलाखती साठी दिल्लीला गेला. पण केवळ तीन मार्कांसाठी त्याची निवड हुकली. शुभमला फार वाईट वाटले. पण हार मानेल तो शुभम कसला ? जवळच्यांनीही त्याला धीर दिला. तू वयाने लहान आहेस म्हणून तुझं सिलेक्शन झाले नसेल. पुढच्या वेळी नक्कीच होईल, असे सांगितले.
शुभम चे आईवडील , इतर नातेवाईक, आत्त्या आत्त्येभाऊ यांनी सतत त्याला प्रोत्साहनच दिले. तू लढ, आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोत, असेच सर्व त्याला म्हणत.
योगेश नेहमी शुभमच्या चिकाटीचे कौतुक करीत असे. त्याने सांगितलेला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. तो नेहमी म्हणायचा मी होईल न होईल, पण शुभम नक्कीच कलेक्टर होईल.
एकदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकामुळे अभ्यासिका दोन दिवस बंद राहणार होती. ते दोन दिवस वाया जावू नयेत म्हणून शुभमने बिस्किट पुडे व केळी घेऊन तिथेच मुक्काम केला. शुभमच्या दोन आत्या पुणे स्थित असून शिवाय शुभम चे आजोळ पुण्यातील सदाशिव पेठेतील असूनही शुभम कधीही कुणाच्या घरी गेला नाही. तब्बल दहा वर्षे त्याने चक्क अज्ञातवास स्विकारला होता. कुणाच्याही कोणत्याही कार्यक्रमात तो जात नसे. १५/१६ तास तो अभ्यास करीत असे.
खचून न जाता शुभम परत नव्याने अभ्यासाला लागला. स्पर्धा परीक्षा म्हणजे सापसीडीचा खेळ असतो. परत पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे चिकाटी व धैर्य, पेशन्स हे हवेतच. त्या बरोबरच आवश्यक असते, ते म्हणजे घरातील इतरांनीही धीर धरणे.
शुभमच्या पप्पांना याबाबत मानलं पाहिजे ते शेतकरी असूनही त्यांनी मुलाच्या सर्व मागण्या वेळोवेळी पूर्ण केल्या व सतत त्याला प्रोत्साहनच दिले.
शुभम पहिल्या प्रमाणेच पुढे तीन वेळा मुलाखतीतून परत आला. दरम्यान लॉक डाऊन पडले. २०२० साल उजाडले होते. सारेजण तुरुंगात कैद असल्याप्रमाणे घरातच बसून होते. कशाचाही भरवसा राहिलेला नव्हता. कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. माणसाच्या जीवाचाच जिथे भरवसा नव्हता तिथे परीक्षा नी दुसरे काही काहीच महत्त्वाचे राहिले नव्हते. मोठी मोठी शहरे ओस पडली होती. लोक, जीव वाचवण्यासाठी खेड्यात येऊन राहिली होती.
शुभम पण घरी, शिंदेवाडीत येऊन राहिला. आता त्याचा अभ्यास घरूनच सुरू झाला. परीक्षा कधी होईल, याचाही भरोसा नव्हता. तरी शुभमचा अभ्यास चालूच होता.
शुभम समृद्ध घरातील आहे. चौसोपी चिरेबंदी वाडा, नोकरचाकर सारी सुखं होती. तरीही त्याने स्वतः चे स्वप्न जराही नजरेआड होवू दिले नाही.
शुभमने पाच वेळा युपीएससी परीक्षा दिली. पाचही वेळी तो चांगले मार्क्स मिळवून लेखी परीक्षा पास झाला. पण चार वेळा मुलाखतीतून परत आला. पाचव्या वेळी मुलाखती ला जाण्यापूर्वी त्याने जाहीर केले, मी हा शेवटचा प्रयत्न करणार. नाही तर शेती करणार.
काही जण त्याला एमपीएससी करण्याचाही सल्ला देत. पण तो आपल्या निश्चयावर ठाम होता.
त्याच्या चौसोपी वाड्यात १० बाय १२ चे प्रशस्त देवघर होते. पण शुभम पुर्ण नास्तिक होता. तो चुकूनही कधी देवघरात जात नसे. त्याचा स्वतःवर फार विश्वास होता.
चौथ्या वेळी अपयश आले तेंव्हा तो माझ्या गळ्यात पडून फार रडला. मी त्याला समजावले, शुभम तुझी थोडी श्रध्दा कमी पडतेय. यावेळी आपण थोडासा देवाचा ही आधार घेऊन बघू. जास्त कर्मकांड करत बस असेही मी तुला म्हणत नाही. पण तुझ्या दिवसातील फक्त पाच मिनिटे गणपती स्तोत्र नी मारुती स्तोत्र म्हणून देवघरातील देवांना नमस्कार कर. बस एवढंच कर. मारुतीने प्रभू रामचंद्राचे काम केले आहे. तुझ असे काय अवघड आहे ? शुभम नम्र झाला. ‘भूता तेने कोंडीले अनंता हेची शुरत्वाचे अंग हरी आणिला अनंत’ ही तुकोबांची निती वापरून तू देवाला शरण जा. त्याला ते पटले. तो आता देवाला नमस्कार करूनच अभ्यासाला बसू लागला.
शुभम पाचव्या वेळीही लेखी परीक्षा पास झाला. पण यावेळी त्याने मुलाखतीतील तृटींवर विशेष फोकस केला.
मुलाखत पण छान झाली. आणि तो दिवस उजाडला २४ सप्टेंबर २०२१ ! शुभम चे बाबा माझ्याकडेच आले होते. आणि पुण्याहून परेशचा फोन आला शुभम, यशस्वी झाला म्हणून !
शुभम पुण्यातच होता. आम्हां साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बघता बघता बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली.
दुसऱ्या दिवशी शुभम गावात येणार म्हणून समजले. सारे गाव स्वागताला सज्ज झाले. सडा, रांगोळी, ढोल, ताशा सारे गावकरी आनंदाने गावाच्या शिवेवर आले. शुभम गाडीतून उतरला. पहिल्यांदा त्याने गावच्या मातीला नतमस्तक होऊन नमस्कार केला. माती कपाळाला लावली आणि मग बापाच्या गळ्यात मिठी मारली. जमलेल्या समुहाला कोणालाही अश्रू आवरता आले नाहीत.
हे चित्र अनेक कॅमेऱ्यात कैद झाले. रस्त्यावर सुहासिनी शुभम ला औक्षणा करिता उभ्या होत्या. खाल्ल्या खस्तांचे चिझ झाले होते. चिरबंदी वाडाही रांगोळी, फुला, तोरणांनी सजून शुभमची वाट पहात होता.
वाजतगाजत शुभमची मिरवणूक वाड्यात आली. शेकडो किर्तने, हजारो ज्ञानेश्वरी गाथा, पारायणे झालेल्या या वाड्याचे आज खऱ्या अर्थाने पांग फिटले.
आता झाली शुभमच्या सत्कारांना सुरुवात. सोलापुरात कलेक्टर साहेबांनी सत्काराला बोलविल्यानंतर आम्हाला आयपीएस ही पोस्ट इतकी मोठी असते ते समजले. प्रत्येक गावात शुभम चा सत्कार झाला. पुणे,सांगली, सातारा, चेन्नई, बेंगलोर, सगळीकडे सत्कार झाले. नंतर तर त्याला सत्कारांचा कंटाळा आला.

पुढे ट्रेनिंग साठी तो मसूरी, उत्तर प्रदेश येथे गेला. तेथेही शुभम ने चेअरमन शिप मिळवून मराठी झेंडा फडकविला.
ती वेगळी स्टोरी होईल आता थांबते…

– लेखन : आशा दळवी.
शुभमची आत्त्या. दुधेबावी, सातारा.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खरोखरच शुभमची अविरतपणे कष्ट करण्याची तयारी सर्व जणांना प्रेरणादायी
संयम चिकाटी आणि जिद्द कष्ट करण्याची मानसिकता हेच गुण त्यांच्या यशाचे गमक
खरंच मनापासून अभिनंदन आणि भावी जीवनप्रवासासाठी शुभेच्छा