पन्नाशी, साठीतच हातपाय गाळणाऱ्यानी आदर्श घ्यावा असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे जेष्ठ विचारवंत, लेखक श्री शेषराव चव्हाण हे होत.त्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या “नाईंटी नॉट आऊट”, “नेहरू – पटेल रिलेशन्समिथ अँड रियॅलिटी”, “डॉ.बी.आर. आंबेडकर डिसअपॉईंटेड अँड डिसइल्युशण्ड इन दि इव्हनिंग ऑफ हिज लाईफ”, “कलप्रिट्स ऑफ पार्टीशन” या ४ पुस्तकांचे प्रकाशन पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम तर मंचावर खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी. एम. जाधव आणि सचिव अंकुशराव कदम उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री शरद पवार म्हणाले की, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांचे देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान असून हे महापुरुष आपल्या देशाला लाभले हे आपल्या देशाचे भाग्य आहे.महात्मा गांधी यांनी या नेत्यांचे व्यक्तिमत्व हे या देशाच्या एकजुटीला आणि उभारणीला उपयुक्त पर्याय असल्याचा दृष्टिकोण स्वीकारला होता. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासंदर्भात बरेच लिखाण लिहिले गेले आहे. हा देश एकसंध करण्याकरीता पटेलांनी टाकलेली पाऊले हा या देशाच्या ऐक्याच्या इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ते शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हिताची जपवणूक करणारे नेते होते. आधुनिक विज्ञानावर लक्ष केंद्रित करणारे नेतृत्व आणि संपूर्ण विश्वामध्ये भारताचे एक स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एकसंध ठेवण्याची कामगिरी संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. पाण्याच्या बाबतीत त्यांनी घेतेलले तत्कालीन निर्णय देशाला समृद्धीच्या मार्गावर नेणारे होते. राष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाची कामगिरी करणारे एक अत्यंत महत्वाचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला मिळाले, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे.
लेखक श्री शेषराव चव्हाण यांचा गौरव करताना श्री पवार यांनी सांगितले की, शेषराव चव्हाण हे सतत काहीतरी लिहीत असतात. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या जीवनावर अनेक व्यक्ती लिहीत असतात मात्र, शेषराव यांनी काश्मीर विषयासह पक्षांच्या जीवनावर अभ्यास करणाऱ्या सलीम अली यांच्याबद्दलही त्यांनी लिहिले आहे. या आज प्रकाशित झालेल्या ग्रंथात आलेल्या व्यक्तींनी देशाच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले असल्याचे आपण मान्य करतो. या लेखनामध्ये वेगवेगळे दृष्टिकोण लेखकाने आपल्यासमोर मांडले आहेत. त्यांनी आपले लिखाण यापुढेही चालू ठेवावे, अशी अपेक्षाही श्री पवार यांनी व्यक्त केली.
एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यावेळी बोलताना म्हणाले, महापुरुषांच्या जीवनातील वैयक्तिक बाबी या इतिहासाचा भाग होत नसून त्यांनी केलेल्या कामाचा समाज जीवनावर होणारा परिणाम तो इतिहासाचा भाग होऊ शकतो. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशभरात अतिशय लोकप्रिय नेते होते. लोकांच्या डोळ्यात नेता दिसतो आणि ते नेतृत्व, कौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. देशाचा नेतृत्व करणारा नेता हा देशाचा नेता असला पाहिजे म्हणून महात्मा गांधी यांनी जवाहरलाल नेहरू यांचे नाव सुचवले. शेषराव चव्हाण हे सतत वाचत राहतात त्यांची आज प्रकाशित होणारी चारही पुस्तके ही दिशादर्शक आहेत. तरूण मुलांना वाचण्यास ही पुस्तके प्रवृत्त करतात. बहुजन समाजातील प्रत्येक माणसांनी ही पुस्तके वाचली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
शेषराव चव्हाण साहेब यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच होईल. अतिशय प्रेरणादायी कार्य त्यांनी या वयात केले आहे. त्यांना अभिवादन आणि आरोग्य यासाठी शुभेच्छा कळवाव्यात ही न्युज टुडे वाहिनीला विनंती. त्यांची पुस्तक कुठे मिळतील? धन्यवाद सौ अलका मॅम
ज्येष्ठ विचारवंत, लेखक श्री. शेषराव चव्हाण ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या साहित्यिक व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचे अतिशय उत्तम वृत्त निवेदन केल्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन 🙏💐