हरि:ओम…..!
नर्मदे हर……..!
सादर स्नेह वंदन……!
सज्जन हो……..
आपले विश्व म्हणजेच आपली पृथ्वी किंवा हे ब्रम्हांड अनेक अलौकिक, अतर्क्य, व विस्मयकारक गूढ रहस्यांनी भरलेले आहे. या विश्वात अनेक गूढ रहस्य असल्यामुळे मानवी मनाला व त्याच्या बुद्धीला नेहमीच या गूढाचे आकर्षण राहिले आहे. हे गूढ उकलण्याचा त्याने सदैव प्रयत्न केलेला दिसतो.
बुद्धीच्या पल्याड असलेल्या अतर्क्य व विस्मयकारक गोष्टींचा शोध घेणे हा तर विज्ञानाचा अभ्यासविषय व मुळ हेतु आहे. त्यातील अनेक गूढ रहस्यांचे उद्घाटन आधुनिक विज्ञानाने परयोगातुन व प्राचीन अध्यात्माने प्रचितीतुन केलेले आहे. या सर्व गूढ रहस्यांमध्ये अतिशय प्राचीन, सर्वाधिक गूढ, तरीही रम्य, एकाच वेळी आस्तिक व नास्तिक, सश्रद्ध व अश्रद्ध, ज्ञानी, अज्ञानी व विज्ञानी मानवी मनाला नेहमीच आकर्षित करणारे, आव्हान वाटणारे एक अतिशय सुरम्य गूढ आहे……..
आणि ते म्हणजे परमेश्वर किंवा भगवंताचे अस्तित्व……..!
अतिशय गूढ असलेल्या भगवंताचा युगानुयुगे शोध घेण्याच्या मानवी प्रयत्नाच्या अनेकानेक कथांनी इतिहासाची कीती तरी पाने खर्ची पडली आहेत. अप्रकाशिताचा किंवा अज्ञाताचा शोध घेणे, त्याचे रहस्योद्घाटन करणे हे जर विज्ञानाचे ध्येय असेल तर जगातील सर्वाधिक गूढ असलेल्या भगवंताचा शोध घेणे हेही विज्ञानाचे अंतिम इप्सीतच म्हटले पाहिजे.
स्टीफन हॉकिंग्ज् सारख्या अलीकडील शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांच्या अभ्यास, निरीक्षण व प्रयोगातून या भगवंताला शोधण्याचा किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विज्ञानाच्या माध्यमातून विश्वात भगवंत शोधण्याचा प्रयत्न करतो तो शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक……!
सिद्धांताच्या प्रचीतीतुन आत्मानुभवाच्या पातळीवर भगवंताला अनुभवतो तो तत्त्वज्ञ, सिद्ध किंवा संत……!
“या उपाधी माजी गुप्त। च्यैतन्य असे सर्वगत ।
ते तत्वज्ञ संत । स्विकारिती ।।” (श्री.माउली)
भगवंताला भारतीय अध्यात्म शास्त्रांनी सर्वव्यापी, सर्वगामी, सर्वांतर्यामी व सर्वसाक्षी मानले आहे. अशा भगवंताची अनुभूती भारतीय अध्यात्मशास्त्रातल्या हजारो संतांनी घेतल्याची उदाहरणेही आपल्याकडे आहेत.
“शिवोभूत्वा शिवम यजेत” या धारणेतून आत्म देवाचे पूजन हीही एक आमच्याकडील एक मान्यता आहेच. “आत्मवत सर्वभूतेषु” अशाप्रकारची भगवंताची विश्वव्यापकता मान्य करून चराचरातून त्याला अनुभवणे ही संतांची अनुभवनिष्ठ व अनुभवसिध्द पद्धतच आहे.
आपल्याकडील चारही वेदातील महावाक्यातून आम्हाला क्रमशः हेच शिकवण्याचा आमच्या पूर्वसुरींनी प्रयत्न केलेला आहे. “अहं ब्रह्मास्मी” “तत्वमसि” “अयमात्मा ब्रह्म” “सर्वं खलुमिदं ब्रह्म” या सूत्रातून आमच्यावर हेच बिंबवण्याचा आमच्या आचार्यांनी, पूर्वसुरींनी, संस्कृतीने प्रयत्न केलेला आहे. “विश्वीविश्वंभर” किंवा “जनी जनार्दन” पाहणे हा तर संतांचा स्वभावच आहे.
याच अनुभूतीतून श्री ज्ञानोबा माऊली भगवंताला “विश्वात्मक देव” म्हणून संबोधतात.
याच अनुभुतीच्या आत्म प्रत्ययानेच श्री. संत सावता माळी…….
“कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी”
अशी भक्ती प्रचिती मांडतात.
याच विश्वात्मक देवाची अनुभूती आल्यानंतर श्री संत नामदेवराय भाकरी घेऊन पळणाऱ्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावतात.
भगवंताच्या सर्व व्यापकत्वाच्या अनुभूतीतुनच संत श्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराज कावडीतील गंगाजल नि:शंक मनाने गाढवास पाजतात व तेवढ्याच हळुवारपणे व संवेदनशीलतेने रणरणत्या उन्हात वाळवंटात भाजणार्या अंत्यजाच्या लेकरास प्रेमाने उचलून हृदयाशी लावतात.
भगवंताच्या याच विश्व व्यापकत्वाची अनुभूती घेऊन समर्थ रामदास “सदा सर्वदा देव सन्निध आहे” अशी आत्म प्रचिती मांडतात व “नुपेक्षी कदा राम दासाभिमानी” असा द्रुढतापूर्ण विश्वास व्यक्त करतात.
भगवंताच्या याच विश्वव्यापकतेचा अनुभव संत मुकुटमणी श्री तुकोबारायही घेतात.
“देव पहायासी गेलो देव होऊनीया ठेलो” ही त्यांची आत्मानुभूती असते. या आत्मानुभूती च्या पायावर कठोर साधना व रात्रंदिवस अभ्यास करून तुकोबाराय “अणुरणिया थोकडा” असलेल्या परमात्मा पांडुरंगाची अनुभूती “आकाशापेक्षा व्यापक स्वरूपामध्ये” घेतात. चराचरातील भगवंताच्या अनंत रुपातुन त्यांना भगवंताची पदोपदी प्रचिती येत राहते. सहजगत्या त्यांच्या अमृतवाणीतून आत्मानुभूतीचा हुंकार बाहेर पडतो…..
“अवघे ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव
प्रतिमा तो देव कैसा नोहे………?
विश्वव्यापक परमेश्वराची जाणीव व अनुभूती आमच्या सर्वच संतांनी पदोपदी घेतली. अलीकडच्या काळातील बंगालमधील सिद्धपुरुष श्री. रामकृष्ण परमहंस भगवतीची पूजा करता करता ते फुल स्वतःच्या डोक्यावर वाहून घेत असत ही कथा तर सर्वश्रुतच आहे.
अशाच अनुभुती तुनच महायोगी अरविंद……
” YES, I EXPIRIANCE IT ”
असा विश्वप्रसीध्द उद्घोश करतात.
अशा प्रकारची भगवंताची आत्म स्वरूपातील पूजा व पूज्य प्रभुपाद श्रीमत् शंकराचार्यांनी मांडलेली भगवंताची विश्वव्यापक स्वरुपातील “मानस पूजा” या वरकरणी जरी भिन्न वाटत असल्या तरी त्याचा पोत, दर्जा, अनुभुती व सत्यता सर्वच संतांची भावानुसारी व समानआहे असे आपल्याला ध्यानात येते.
अशाप्रकारचे चिंतन श्री तुकोबारायांच्या संदर्भात करीत असताना तुकोबारायांना भगवंताच्या त्या अनन्यसाधारण विश्व व्यापकत्वाचे दर्शन झाल्यावर त्यांच्या मुखातून भगवंतासाठी काय भाव व्यक्त झाले असतील ? असा विचार मनात आला व त्याची कल्पना करित असताना हे अष्टक शब्दांत उतरले.
आपणा सर्वांच्या ह्रदय सिंहासनात विराजित असलेल्या भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाला हे माझे सश्रद्ध तुलसी दल रुचेल या श्रद्धेने हे अषःटक त्याचे समचरणावर सम्रपित आहे. तसेच ते आपणासहि रुचो व प्रिय होवो ही परम कृपालु परमात्मा पंढरीशाचे चरणी विनम्र प्रार्थना……!
………….. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
स्नेह प्रार्थी,

।।। अक्षर योगी।।। राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य,
ह.भ.प. योगेश्वर उपासनी महाराज
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
भगवंत शोधातित भाव भावना ! उत्सुकता ! कुतुहल !