“आला आला पाऊस शोभा सृष्टीची न्यारी डोलू लागली शेतराने गारठली सृष्टी सारी”
अचानक आकाशात काळे ढग दाटून आले पृथ्वीवर जणू काही काळाकुट्ट अंधार पडला. सरसर शिरवे आकाशातून पाझरू लागले. मुसळधार पर्जन्यसरी जमिनीकडे झेपावल्या. काळवंडून गेलेल्या साऱ्या धरित्रीला पुन्हा उन्हाचे कवडशांनी अच्छादून टाकले. टपोऱ्या थेंबांनी सगळीकडे पाणी पाणी करून टाकले. धुवाधार पाऊस पडून गेला आणि झाडं वेली, लतिका सचैल स्नान केल्यामुळे ताजी टवटवीत दिसू लागली. वाऱ्याच्या झोतांनी अंगांगावर शिरशिरी उठली. पाखरांनी आपले भिजलेले पंख फडफडवत रानाचा रस्ता धरला. घरट्यात बसून आपल्या इवलाल्या डोळ्यांनी सृष्टीची शोभा बघत पिले आई-बाबांना टाटा करू लागली.
“जपूया सारं सृष्टीसौंदर्य
देवाजीचं अनमोल देणं
झाड वेली सृष्टी चैतन्य
गवसेला हातात हे सोनं”
पर्जन्यधारांच्या थंड शिडकाव्याने सारे चराचर जणू उल्हासित झाले होते. काळ्या कातळावर पाऊस पडल्यामुळे स्वच्छ धुतलेले कातळ पॉलिश केल्यासारखे चकचकीत दिसत होते. नदी नाले खळाळ खळ ऽ असा आवाज करत वेगाने वाहत होते. कडेकपारीतून झरे, ओहोळ डोंगरातून वाट काढत खालचा रस्ता पकडत जमिनीवर पडण्यासाठी जणू आतुर झाले होते, झुळझुळ करत होते. पाण्याचा सतत प्रवाह पडत असल्यामुळे जमिनीवर खोल खड्डे पडले होते. त्यातच येऊन निर्झर बदाबदा आपटल्यामुळे त्या ठिकाणी धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. गाईगुरे आडोशाला बसली होती. ती पाऊस थांबल्यामुळे रानात फिरायला नव्याने बाहेर पडली. वासरे थंडगार पडलेल्या हवेत कानात वारा भरल्यावाणी मोकाट हुंदडत होती. पिवळ्या तृणपात्यांवर पडलेले दवबिंदू सूर्यप्रकाशाने हिऱ्यामोत्यासम चमकून निघाले होते. सृष्टीचं नवं रुपडं जणू डोळ्यात साठवून घेत सारे पशुपक्षी, माणसं नव्या जोमाने घराबाहेर पडली होती. बळीराजाने नांगर एका हातात आणि ढवळ्यापावळ्याचा कासरा दुसऱ्या हातात धरून शेताचा रस्ता धरला.
“कसूया शिवारात आपूल्या
काळ्या आईची होई कृपा
पिकवूया माणिक नि मोती
होईल प्रसन्न मग देवबाप्पा”

उन्हाच्या तप्त काहिलीने गावातील, जंगलातील सर्वांची लाही लाही होत होती आणि त्यात पावसाचा हा सुखद शिडकावा! धरित्री जणू काही ओलीचिंब होऊन तृप्त समाधानी झाली होती. पिकून पिवळी पडलेली तृणपाती जणू मलूल झाली होती. परंतु आता पर्जन्यवर्षाव झाल्यामुळे त्यांना नवसंजीवनी प्राप्त झाल्यासारखी ती नव्याने डोलू लागली होती. मातीला जणू धुमारे फुटले होते आणि उष्ण मृत्तिका अत्तराच्या दरवळाने मोहरून टाकत होती. त्या सुगंधाने पशुपक्षी जणू बेधुंद झाले होते. झाडे वृक्ष फांद्यांतून लवलवून जणू वरूणदेवाची आळवणी करत होते. तापलेल्या भुईतून जणू वाफा बाहेर पडत होत्या. जणू काही ती बीज पेरण्यासाठी साद घालत होती.
“बीज पेरण्यास या हो
मृद्गंध झालाय अनावर
कोंब फुटूनीच बीजाला
पेरापेरांत भरली साखर”
‘पेरते व्हा’ ‘पेरते व्हा’ असे किलबिल करत पाखरे निरभ्र झालेल्या आकाशातून घिरट्या घालत होती. साठलेल्या डबक्यांमधून चोचीच्या चमच्याने पाणी चाखत होती. गाईगुरे, वासरे तहानेने व्याकुळ होऊन पाण्याच्या दिशेने ओढ घेत होती आणि पाणी पिल्यानंतर तृप्तीचा ढेकर देत पाण्याच्या डबक्यात आपल्या शरीराला थंडावा देत होती. आयाबाया आपल्या लेकरांना पदराखाली लपवत होत्या. अचानक आलेल्या पावसाने त्यांची धांदल उडाली होती. रानात वस्तीला असणाऱ्या लोकांनी जळण आणि गोवऱ्या यांची झाकापाक केल्यामुळे आता त्यांना काळजी नव्हती.
“जिणं कष्टाचंच आमचं
राहतोय त्यातूनच सुखी
राबतो काळ्या मातीतुन
घास द्याया तुमच्या मुखी”
ओल्या जळणामुळे चुलीतून धुपारे निघून डोळ्यात धुर साठत असायचा. त्यामुळे जळण झाकणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. संध्याकाळच्या स्वयंपाकाची सोय करण्यासाठी बाया तयारीला लागल्या होत्या. कुणी वाळलेल्या कडधान्याला फोडणी देत होत्या तर कुणी पाळलेल्यातलं कोंबडं कापून मसाल्याची तयारी करत होत्या. घराबाहेर थंडगार बोचरी हवा पडल्यामुळे म्हातारी कोतारी अंगावर रजई घेऊन चुलीजवळच्या उबीला गपगार झोपली होती. लहानगी लेकरं पाऊस पडून गेल्यामुळे अंगणात साठलेल्या डबक्यात कागदी नावा करून सोडत होती तर काहीजण डबक्यातलं गढूळ पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत खेळत होती.
रानाची काय अवस्था झाली आहे हे बघण्यासाठी सारी माणसं रानाच्या वाटेने गेली होती. सर्वांच्या हृदयात आनंदाने उर्मी दाटली होती. आता लवकरच आपण बियाणं पेरू आणि नव्या हंगामाला सुरुवात करू अशी चर्चा करत पुन्हा घराच्या दिशेने परतत होती. यंदाचा मोसम बरा व्हावा म्हणून आकाशाकडे बघत वरूणदेवाला आळवणी करत होती. सगळ्यांचं पोट शिवारातल्या पिकांवर अवलंबून असल्यामुळे शेतात पिकलेल्या अन्नधान्याला लक्ष्मी मानून गावाकडची ही माणसं पुजत होती, भजत होती. सृष्टीत अचानक घडलेला हा बदल सर्वांना जणू सुखद पेरणी करणारा ठरला होता. उद्यापासून आता कामाला जुपी करून त्यांना शेताची निगराणी करायची होती. बी बियाण्याची तयारी करायची होती आणि एकमेकांच्या साह्याने आपल्या शेतात सोनं उगविण्यासाठी वाट बघायची होती. शहरातल्यासारखं धकाधकीचे जीवन नसलं आणि खेड्यातलं प्रदूषण विरहित जीवन जगत असली तरी हातावरचं पोट असल्यामुळे कष्ट केल्याशिवाय त्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरणार नव्हती. दिवस-रात्र काळ्या मातीत राबल्याशिवाय त्यांच्या हाताला पैसा भेटणार नव्हता.
“काळ्या आईची ही कृपा
देतसे सोनू मोती नि हिरे
करू काबाडकष्ट रातदिन
जपू नाती अन् सगेसोयरे”

— लेखन : सौ.भारती सावंत. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800