Friday, November 22, 2024
Homeलेखश्रावणातला निसर्ग

श्रावणातला निसर्ग

अनेक कवींना, लेखकांना, चित्रकारांना खुणावणारा, व्यक्त करायला लावणारा, निसर्गाच्या ऋतु चक्रातला, अतिशय सुंदर महिना… म्हणजे श्रावण !

मला काय वाटतं सांगू? एखाद्या खोडकर मुलाकडे ह्या महिन्याचं व्यवस्थापन सोपवलं असावं! बघा ना, सारखा दिव्याशी खेळत असतो. उघडमीट करत असतो.त्यामुळे घटकेत उजेड, घटकेत काळोखी येते. रंगांच्या बाटल्या घेऊन, तो धडपडत असावा सारखा! सगळे रंग सांडून ठेवतो. मग रंगीत शिंतोडे, छोट्या फुलांसाखे, हिरव्या कॅनव्हासवर पडलेले दिसतात. वाऱ्याबरोबर पळापळी खेळतांना, तो वाटेतले दुधाचे हंडे सांडत असावा!डोंगरावरून पांढरे शुभ्र, ओघळ ओघळतांना पाहून, मग टाळ्या वाजवत असावा ! कधी ते हंडे एकदम रिकामे होत असावेत. मग धबधब्या सारख्या कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसांत, नहायचा मोह, छोट्या मोठ्यांना नाही झाला, तरच नवल!खोड्या काढत, ढगांना तो पुढे हाकलत असावा किंवा त्यांना हळूच, फुग्याला टाचणी लावावी तशी टाचणी लावत असावा. त्याच्या खाली चाळणी धरत असावा ! अशा पडणाऱ्या सरीत मग भिजावेसे वाटणारच ना सगळ्यांना ? आपल्याप्रमाणेच, सर्वांना खेळकर बनवणारा आहे हा श्रावण !

मागे एकदा या काळात विमानानी प्रवास करायचा योग आला. विमानातून खाली पाहिलं, तर सगळीकडे हिरवे शेतातले चौकोनी तुकडे ! काही ठिकाणी कोवळा पोपटी रंग तर, काही ठिकाणी मातीचा गढूळ तपकिरी रंग!काही ठिकाणी पाणी भरलेलं, तर काही ठिकाणी, सळसळणाऱ्या पातींचा गडद हिरवा रंग! हिरव्या रंगाच्या अगणित छटा!वरून एखादी अशा हिरव्या चौकोनांची गोधडी हंतरली आहे धरतीवर, असंच वाटत होतं. वर आकाशात, पांढऱ्या रंगापासून काळ्या रंगापर्यंतच्या ११ छटा, अंगावर मिरवणाऱ्या ढगांचे दर्शन तर विलोभनीय होते.

गॅलरीत उभं राहिलं की झाडांच्या पानांवर मिरवणारे मोती आपले लक्ष वेधून घेतात, हिरवा कंच गुलमोहोराचा पिसारा मन प्रसन्न करून टाकतो. गोकर्णच्या पदरावरचे निळे बुट्टे, रेनलिलींचे मान उंचावून करत असलेले स्वागत, सदाफुलींचे जास्तच हसत फुलणे, गुलबाक्षी, कोरांटी, गुलाब, मोगरा, जाई ह्यांच सुवास आणि रंग उधळत डोलणं… कुठे आणि किती नजरेत साठवू, असं होऊन जातं!खाली अंगणात बहरलेली मधुमालती, चाफा, सोनटक्का, जास्वंद, तेरडा, अनंत, तगर, पारिजातक या मैत्रिणींचा आनंद, तर ओसंडून खाली सांडत असतो!कोणी तोडून, ओंजळीत घेतला, तरी त्यांच गिरक्या घेत नाचणं आणि देणं काही कमी होत नसतं ! ह्या फुलांवर रूंजी घालणारे भुंगे, शिंजीर पक्षी, फुलपाखरं पाहूनआपले मन ही फुलांभोवती रूंजी घालायला लागतं आणि हे सर्व पाहून आपण इतकं भारावून जातो, कि ह्या निसर्गाकडून दान देणं, आपसूक शिकत जातो. रान फुलं आणि रान भाज्या ही तर श्रावणातली मेजवानीच असते. निसर्गाचा हा दुर्मिळ खजाना, फक्त श्रावणातच पहायला मिळतो. तो पहायची संधी आणि प्रसन्न मनाची श्रीमंती, दर श्रावणात घेतलीच पाहिजे !

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. श्रावणाच्या विविधांगी मनमोहक छटा या लेखातून तरलपणे मांडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments