१. श्रावण
श्रावणाची सर मज भिजवी
रातराणी रात्र नयनी जागवी
गूज मनीचे मौनात ऐकवी
प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलवी ….
भुरुभुरु वारा लता डोलवी
कळ्या कुसुमांना गात जोजवी
दूऽरदूऽर सुगंधा पोहचवी
पाखरांसी खुणावून बोलवी ….
ऊन-पावसाचे चक्र फिरवी
वाळकी कुरणे झाली हिरवी
गवतांची पाती तुरे मिरवी
प्रत्येक पादपे कित्ता गिरवी ….
लक्ष त्रिदलेचि शिवा तोषवी
संधीप्रकाश सांजेस खुलवी
उधाणल्या सागरा शांतवी
किती वर्णू श्रावणाची थोरवी
— रचना : विजया केळकर. हैद्राबाद
२. प्रकार अष्टाक्षरी
जल तुषार
आल्या श्रावणात सरी
आनंदाचे सणवार
वाहे शीतल गारवा
वारा उडवी तुषार -१
श्रावणात घननिळा
बरसती जलधारा
जाई क्षणात येऊन
पावसाच्या शीतगारा -२
आठवण पावसाची
खेळ ऊन सावलीचा
लपंडाव निसर्गाचा
रंग बहार नभीचा -३
ऊन पाऊस संगम
सूर्य किरण सोनेरी
नभी सप्तरंग शोभे
इंद्रधनुष्याची फेरी -४
मेघ नभात दाटता
थुईथुई नाचे मोर
छान फुलवी पिसारा
मनमोही चित्तचोर -५
— रचना : सौ. रोहिणी पराडकर. कोल्हापूर
३. वृत्तबद्ध कविता
वेडा श्रावण
हिरवे हिरवे क्षण मोहाचे श्रावणातले
वय विसरावे, फुलून येते सर्व आतले
वनराईचे तरूण होणे किती भावते
काठ नदी हा तुडूंब जणु की, प्रिया धावते
आभाळाने वरून सारे भाव ओतले
वय विसरावे, फुलून येते सर्व आतले /१/
चिंब मनाच्या चिंब भावना निसरड्या किती
संयम सुटतो, ह्रदयाची मग वाढून गती
अंगावरती सांडत बसतो ढग मनातले
वय विसरावे, फुलून येते सर्व आतले /२/
थेंब टपोरे केसांमधुनी ओघळताना
मयूर सुध्दा रानामध्ये देतो ताना
उष्ण वाटते गीत कसे हे पावसातले
वय विसरावे, फुलून येते सर्व आतले /३/
— रचना : यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800