१. येता श्रावण
आला नागपंचमीचा सण
आल *माय* च आवतण
केले पुरणाचे धिंडे
भरले हातभर चुडे
खुलला मेंदीचा रंग
सख्यांचा ग संग
सरी आनंदाच्या घेवून
झरझरला हा श्रावण—
लेकी, सुना जमुनी
मंगळागौर मांडूनी
सा-याजणी सजल्या
गौरीई घरादारच्या
घालतील पिंगा सुखदु:खाचा
खेळती झिम्मा आशानिराशेचा
गुजगोष्टी सांगती कानात
मन होते मोकळे मनात
अश्या उत्साहात उधाणून
उधळला हा श्रावण
ऋणानुबंध कोण्या जन्मीचे
भाग्य लाभले भावाचे
कृष्ण जणू द्रौपदीचा
हेवा वाटतो भाग्याचा
नको मानु रे बंधन
तुझे माझे एक मन
राखी बांधते पुनवेला
उभी तुझ्या सावलीला
नात्याची ही घट्ट विण
विणतो हा श्रावण
येता हा श्रावण
गातो निर्झर गाण—–

— रचना : शुभदा डावरे-चिंधडे. ठाणे
२. श्रावण मास (हायकू लेखन)
श्रावण मास
सण सौख्याचा राजा
पूजती खास
नागपंचमी
नागोबाला नैवैद्य
खेळे अंगणी
पाऊस आला
धडाडधूम करी
चिखल झाला
कृष्ण बासरी
गोपाळ खेळे खेळ
शोभे हासरी
नाचण्या दंग
थरीवरचे थर
वाजे मृदंग
हिरवेगार
दिसते वनराई
आनंद फार
हिरवी शाल
उजाडत्या रानात
पेटे मशाल
ढगांची दाटी
पाऊस धुवांधार
भल्या पहाटी
स्वर्ण किरण
भूपाळी पंचारती
नाम स्मरण
रांगोळी सडा
सजवले अंगण
सुगंधी घडा
प्राजक्त फुल
सडा पडे अंगणी
खेळते मुल

— सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई. ह. मु.इंग्लंड.
३. पाऊस
आला पाऊस पाऊस
सा-या जीवांचा विसावा
आला सुखाचा हा काळ
देतो पावशा दिलासा
आगमनाची हो ज्याच्या
फिरवितो वायु द्वाही
झाडाझाडांच्या कानात
गुणगुणे दिशा दाही
ढोल ताशे वाजवित
स्वारी वरुणाची आली
पायघड्या त्या रुपेरी
नभ गुलाल उधळी
लोळ कल्लोकल्लोळती
क्षणी तिमिर भेदिती
असिधाराच की जणुं
आसमंती शलाका ती
टिप् टिप् थेंबांची ती
सुरु झाली बरसात
चिंब चिंब भिजविसी
प्रसन्नता ये मनास

— स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निमिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पावसाळा, श्रावण यावर तिन्ही कविता छान आहेत
पाऊस व श्रावण मास या कविता कुसुमांनी विविध शब्द रंगांनी नटलेलेल्या
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र